ललित कलेचे ‘जेजे’तील उत्तम उपक्रम
महा एमटीबी   15-Mar-2019ललित कलेचे ‘जेजे’तील उत्तम उपक्रम मार्च महिना मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रातील कलाकारांसाठी पर्वणीचा महिना. यावर्षी ललित कला अकादमी, नवी दिल्ली आणि सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई यांच्या सहयोगातून मुंबईमध्ये कलाविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. नुकतेच म्हणजे २२ फेबु्रवारी ते २ मार्च या कालावधीत सर ज. जी. स्कूलमध्ये एका राष्ट्रीय कला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आता येणार्‍या २५ मार्चपासून पुढील पंधरवडा किंवा अधिक काळ हाही या दोन आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या संस्थांच्या सहयोगाचे दर्शन घडविणारा आहे. मग सहज मनात विचार आला, महाराष्ट्रातील कला व सांस्कृतिक जगतात कलाविषयक उपक्रमांची मांदियाळी नवी दिल्लीच्या ललित कला अकादमीबरोबर कशी काय सुरू झाली?


तसं पाहिलं
, तर महाराष्ट्र राज्य हे कलाक्षेत्रासाठी अत्यंत वैविध्यपूर्ण, ऐतिहासिक, कलेची पार्श्वभूमी असलेले भारतातील अग्रेसर राज्य आहे. या राज्याने देशाला आणि जगाला अनेक महान व्यक्तिमत्त्वे दिली आहेत. नुसत्या नावांची यादी जरी करायचे ठरविले तरी, मोठा ग्रंथ निर्माण होईल. असो. विषय असा आहे की, ललित कला अकादमी, नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील विश्वविख्यात सर जे. जे. स्कूल यांच्यातील कलासौहार्द या वर्षी का बहरले? तर त्याचं उत्तर आहे, सुप्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकार उत्तम पाचरणेयांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १७ मे, २०१८ रोजी ललित कला अकादमी, नवी दिल्लीचे नियमित अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. नावाप्रमाणेच कलाविश्वात उत्तम योगदान असलेल्या चित्रकार उत्तम पाचारणे यांना १९८५ ला महाराष्ट्र सरकारकडून ‘राष्ट्रीय ललित कला पुरस्कार,’ १९८५ मध्येच ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार,’ १९८६ मध्ये ‘ज्युनिअर राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘प्रफुल्ल डहाणूकर फाऊंडेशन’कडून २०१७ मध्ये ‘जीवन गौरव पुरस्कार’ असे विविध सन्मान मिळालेले आहेत. कामातील वक्तशीरपणा, त्वरित निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची कार्यपद्धती आणि उचित कला तसेच मानवातील सुप्त गुण जोपासण्याची हातोटी, यामुळे सात-आठ महिन्यांतच ललित कला अकादमीने कात टाकली आणि याचे श्रेय अर्थातच ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार उत्तम पाचारणे यांना जाते. त्यांच्या इच्छाशक्तीचा भाग म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे काही दिवस अशी सुमारे ९० दिवसांची कलाविषयक उपक्रमांची आयोजने होय.मुख्य व्यक्ती सकारात्मक असेल, तर हाती घेतलेले कार्य स्वप्नवत पूर्ण होते. सहकारातून केलेल्या कामात कष्ट कमी आणि लाभ अधिक असतात. चित्रकार पाचारणे यांच्या पारदर्शी आणि भ्रष्टाचाराला भीक न घालणारी व्यक्ती ललित कला अकादमीच्या अध्यक्षपदी म्हणूनच नियुक्ती करावीशी वाटली असावी, भारताच्या माननीय राष्ट्रपती महोदयांना...!

 

 

त्याच पाचारणे यांच्या समर्थ कला दिग्दर्शनातून ‘जेजे’त २२ फेब्रुवारी ते २ मार्चला ‘राष्ट्रीय कॅम्प’ आयोजित केला होता. सार्‍या भारतातून ५९ प्रथितयश चित्रकार, शिल्पकार आणि ग्राफिक अर्थात प्रिंट मेकिंग क्षेत्रातील कलावंतांच्या कल्पनाशक्तीच्या विकासाला गती देण्यात आली आणि पाहता पाहता विविध शैलींच्या, विविध प्रतिभाशक्तींचा सौंदर्याविष्कार लाभलेल्या आणि विविध तंत्रांचे दर्शन घडविणार्‍या कलाकृतींनी जेजेच्या प्रांगणात जन्म घेतला. कलाध्यापक पा. रा. पाटील, शशिकांत काकडे (पेंटिंग), अनंत निकम, सीमा गोडांबे (प्रिंट मेकिंग) आणि सचिन चौधरी, प्रशांत ईप्ते (शिल्पकला) या जे. जे. स्कूलच्या कलाध्यापकवृंदांना या राष्ट्रीय कार्यशाळेचे समन्वयक म्हणून अनुभव तर मिळालाच; तथापि यांच्यासह जे. एस. खंडेराव, वसंत सोनवणी, रवि मंडलीक, रवींद्र साळवे, प्रमोद रामटेके, शुभा गोखले, विजय बागुडी, दत्तात्रेय आपटे, अजित सील, किशोर ठाकूर, कृष्णमूर्ती अजिंक्य चौलकर अशा एक नव्हे, ५९ कलाकारांनी कलाइतिहास रचला.

 

 

याकला कॅम्प’चे राष्ट्रीय स्तरावरील आयोजन यशस्वी करण्यासाठी सर जे. जे. स्कूलचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे आणि ‘जेजे’चे वर उल्लेख केलेला कलाध्यापकवृंद यांचा सहभाग हा सिंहाच्या वाट्याप्रमाणे ठरला. आता पुढील उपक्रम म्हणजे दि. २५ मार्चला ’छॠचअ’ आणि सर जे. जे. स्कूल या संस्थांमध्ये त्यांच्याच संयुक्त विद्यमाने ललित कला अकादमी, नवी दिल्ली यांच्यामार्फत राष्ट्रीय प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन होत आहे. कलाक्षेत्रातील महनीय धुरिणांसह विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या व्यक्तींची उपस्थिती या प्रदर्शन उद्घाटनाच्या काळात राहणार आहे. याशिवाय ‘जेजे’च्या विशाल परिसरात ललित कलेच्या संयुक्त विद्यमाने एका कलाभिरूचीपूर्ण कलामेळ्याचे आयोजन केले आहे. सुमारे १०० ते १२५ स्टॉल्स असून कलाकार, कलासंस्था, कलासंकुले, कलाविषयक उपक्रम राबविणार्‍या सर्वच इच्छुकांचा सहभाग या स्टॉल्सद्वारे दिसणार आहे. आणखीन एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन याच कालावधीत आहे. त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कविता वाचन, नाटक-एकांकिका गायन, गझल वा तत्सम प्रमोशनल आणि कलांचे लालित्य नेत्रदीपक करणारा असा सप्ताह असेल. एकूणच या महिनाअखेर आणि एप्रिलचा शुभारंभ म्हणजे कलाविषयक उत्तमोत्तम कार्यक्रमांची-उपक्रमांची जणू जत्राच आहे आणि याचं श्रेय जातं ज्येष्ठ चित्रकार, शिल्पकार उत्तम पाचारणे आणि त्यांच्या सर्व ज्ञात-अज्ञात सहकार्‍यांना...!


- प्रा. गजानन शेपाळ 

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat