पवार-विखे वाद पुन्हा उफाळला
महा एमटीबी   14-Mar-2019

 

 
 
 

पवारांच्या मनात विखे कुटुंबीयांबाबत द्वेषराधाकृष्ण विखे-पाटलांनी व्यक्त केली नाराजी

 

मुंबई :राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनात विखे कुटुंबीयांबाबत असलेला द्वेष अजूनही कायम आहे,” अशा शब्दांत काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपली नाराजी गुरुवारी व्यक्त केली. मुंबईतील काँग्रेस मुख्यालयात गुरुवारी काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. त्या बैठकीनंतर विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना पवारांच्या वक्तव्यामुळे आपण दुखावलो असल्याचेही सांगितले.

 

शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल वक्तव्य करणे दुर्दैवी असल्याचे सांगत आपले वडील बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबद्दल पवारांच्या मनात असलेली कटुता क्लेशकारक आहे,” अशी तीव्र नाराजीची भावना यावेळी विखे यांनी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता शरद पवार म्हणाले होते की, “विखे घराण्यातील बाळासाहेब विखे यांना आम्ही यापूर्वी या मतदारसंघातून पराभूत केलेले आहे. हा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यावेळी बाळासाहेब विखे यांनी माझ्याविरोधात खटलाही भरला होता. मी त्यांच्यामुळे काही काळ निवडणुकीतून अपात्रही झालो होतो. मात्र सर्वोच्च न्यायालयात मला दिलासा मिळाला. त्यामुळे विखे यांना कुणी पराभूत करू शकत नाही, असे अजिबात नाही.” पवार यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात तब्बल अठ्ठावीस वर्षांपूर्वीच्या आठवणी कायम असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनच विखे यांनी नाराजी व्यक्त केली.

 

पवार यांचे बाळासाहेबांबाबतचे विधान आल्यावरच सुजय यांनी भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय होता,” असेही यावेळी विखे यांनी स्पष्ट केले. “मी येत्या दोन दिवसांत काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटणार असून त्यांच्यापुढे माझी भूमिका सविस्तर मांडेन,” असेही त्यांनी सांगितले. एकूणच राज्याचा विरोधी पक्षातील प्रमुख नेता कमालीचा नाराज झाल्याचे चित्र समोर आल्याने आता प्रचाराच्या सुरुवातीलाच आघाडीत बिघाडी होण्याची दाट शक्यता आहे.

 

अहमदनगरमध्ये प्रचाराला जाणार नाही!

 

मी लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदनगर मतदारसंघात कोणाच्याच प्रचाराला जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. “अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात माझ्यासहित सर्व विखे कुटुंबीयांबाबतच द्वेष आहे, हे त्यांच्या वक्तव्यावरून दिसले. असे असताना मी त्यांच्या पक्षाच्या प्रचाराला कसा जाईन?,” असा उलट सवाल विखे यांनी यावेळी केला. विखे राज्यातील अन्य मतदारसंघातही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचाराला जाण्याची शक्यता कमी असल्याचे समजते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat