थेरेसा मे यांना दुसऱ्यांदा धक्का
महा एमटीबी   13-Mar-2019

 

 
 
 

ब्रेग्झिट करारावरील मतदानात पुन्हा पराभव

 

लंडन : युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबतच्या ब्रेग्झिट समझोत्यावर ब्रिटनच्या प्रतिनिधीगृहात मंगळवारी मतदान झाले. हा करार प्रतिनिधीगृहाने पुन्हा एकदा फेटाळल्यामुळे ब्रिटिश संसदेत पंतप्रधान थेरेसा यांना दुसऱ्यांदा हादरा बसला. ३९१ विरुद्ध २४२ मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

 

ब्रिटनच्या जनतेने २०१६ मध्ये ब्रेग्झिटच्या बाजूने निसटता कौल दिला होता. पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या थेरेसा यांनी दोन वर्षे युरोपीय महासंघाशी वाटाघाटी केल्या. मे यांच्या हुजूर पक्षाच्या ७५ खासदारांनी ब्रेग्झिटविरोधात मतदान केले. जानेवारी महिन्याच्या तुलनेत यावेळी थेरेसा मे यांना कमी मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. जानेवारीमध्ये झालेल्या मतदानात थेरेसा मे यांना ४३२ विरुद्ध २०२ म्हणजे २३० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. २३ जून, २०१६ रोजी झालेल्या सार्वमतात ब्रिटनच्या नागरिकांनी ५२ टक्के विरुद्ध ४८ टक्के, अशा बहुमताने २८ देशांच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने कौल दिला. यामुळे युरोपीय महासंघात कायम राहण्याच्या मोहिमेचे नेतृत्व केलेल्या आणि सार्वमत पुकारलेल्या हुजूर पक्षाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दुसर्या दिवशी राजीनामा दिला. कॅमेरून यांच्या उत्तराधिकार्‍याच्या शर्यतीत, ब्रेग्झिटचे प्रमुख समर्थक बोरिस जॉन्सन यांनी अपेक्षेप्रमाणेच स्वत:चे नाव पुढे केले नाही. त्यामुळे युरोपीय महासंघात राहण्याला पाठिंबा दिलेल्या गृहमंत्री थेरेसा मे या पंतप्रधान झाल्या.

 

सरकारने ठरविलेल्या दोन वर्षांच्या वेळापत्रकानुसार, ब्रिटनला येत्या २९ मार्चला महासंघातून बाहेर पडावे लागणार आहे. त्यापूर्वी ब्रिटन पार्लमेंटमध्ये हा करार मंजूर होणे आवश्यक होते. आता ब्रिटनने विनंती केल्यास मुदतवाढ दिली जाईल, पण त्यासाठी ब्रिटनला महासंघातील २७ सदस्य देशांना समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे लागेल, असे महासंघातील सूत्रांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat