भावभावनांचे झाले अश्रू
महा एमटीबी   11-Mar-2019
आपण माणूस म्हणून नैसर्गिकपणे रडतो, दुःखात रडतो, आनंदात रडतो, हसताहसता रडतो, रडतारडता हसतो. कधीकधी भावनिक हिंदोळ्यातून रडतो, तर कधीकधी डोळ्यांत काहीतरी गेले म्हणून रडतो. पण जेव्हा रडण्याचा विषय निघतो तेव्हा तेव्हा आपण सर्वसामान्यपणे भावनांशी निगडित असलेल्या रुदनाबद्दल किंवा अश्रूंबद्दल बोलत असतो.

 

दोन सहस्त्र वर्षांपूर्वी हिप्पोक्रेट्स या शास्त्रज्ञाने आपल्या शरीरात असलेले रोगट द्रव्य मेंदूमधून अश्रूंच्या रूपाने बाहेर पडते, असा सिद्धांत मांडला होता. अ‍ॅरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने तत्त्वज्ञानविषयक सिद्धांतातून असे म्हटले होते की, अश्रू मनाला शुद्ध करतात. अर्थात, या तत्त्ववेत्त्याला स्वत:चे पाप समजून घेणार्‍या व पुढे भविष्यात पापाचे क्षालन करून उत्तम माणूस बनणार्‍या व्यक्तीच्या मनातील अपराधीपणाच्या अश्रूंबद्दल बोलायचे असेल कदाचित. अर्थात, अश्रूंचा उगम हा विविध भावनांशी निगडित आहे हे निश्चित. तरीही मनाची भावनिक स्थिती ही सापेक्ष आहे.

 

आपल्याला जीवनात आनंद केव्हाही हवा असतो. आनंदाचे क्षण आपल्याला जपून ठेवता आले असते, तर ते आपण जपून ठेवलेच असते. पण तसे आपण कल्पनेतच करू शकतो. जडवादाच्या जगात आपल्याला आनंदाला पकडून ठेवता येत नाही. अर्थात, आपल्याला आनंद काय आहे हे समजून घ्यायचे असेल, तर दु:ख काय असते हे अनुभवायला हवे. ग्रीक संस्कृतीत रडण्याबद्दल विशेष संकल्पना सांगितलेली आहे. रडण्याच्या प्रक्रियेतून आपण दु:खाकडे लक्ष केंद्रित करू शकतो. दु:खाकडे लक्ष केंद्रित करता आल्यामुळे आपण दु:खाचा शारीरिक व भावनिक पातळीवर प्रत्यय घेऊ शकतो. दु:खाचा अनुभव आपल्या रुदनातून अनुभवत असताना कळत-नकळत आपण आपल्याला तसे का वाटत आहे, याचे विश्लेषणही करू लागतो. त्यामुळे आपल्याला एक खास संधी मिळते. एक विशेष अवसर मिळतो तो दु:ख आजमावयाचा, पुन्हा पुन्हा दु:खाला जोखायचा आणि त्यातून आपल्या सहनशीलतेने आणि कौशल्याने बाहेर यायचा. म्हणजेच क्वचित आपल्याला त्रास अनुभवायची गरज आहेच. कारण, त्यामुळेच आपल्याला सुख साजरं करता येते. सुखाचं मूल्य वा महत्त्व आपल्याला आपण दु:खाचे क्षण अनुभवल्यामुळेच पटते.

 

अनेक वर्षांपासून आपण जीवाची उत्क्रांती कशी होत जाते, यावर जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. हे माणसाच्या रडण्याविषयीसुद्धा तितकेच खरे आहे. आपल्या पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा (प्राणिमात्रांसह) आपला मेंदू ज्या पद्धतीने विकसित झाला आहे, ते पाहता आपले मन इतर प्राणिमात्रांपेक्षा खूप विकसित आहे हे लक्षात येते. यामुळेच आपल्याला दुसर्‍याचे मन समजून घ्यायची कला उमजली आहे, परानुभूतीची कल्पना समजली आहे. दुसर्‍याच्या मनाचे भाव समजता समजता स्वत:च्या मनाचे परीक्षण करण्याची गरज आज माणसाला कळली आहे. आज संशोधन खूप झाले आहे तरी, भावनांना अचूक समजणे, त्यांना संबोधने वा त्यांची व्याख्या करणे आजही खूप अवघड आहे, क्लिष्ट आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांतून येणारे अश्रू इतरांच्या डोळ्यांतून पाहता येतात. त्या अश्रूंतून आपल्याला दुसर्‍यांच्या व आपल्याही मनातील विचार, भावना यांची दखल घेता येऊ शकते. ‘हसू’ आणि ‘आसू’ हे खरे तर पृथ्वीतलावरील माणसाच्या मनातले सत्य प्रतिबिंब आहे, म्हणायला हरकत नाही.

 

अश्रू गाळत रडण्याची प्रक्रिया तशी गुंतागुंतीची आहे. मनुष्यप्राणी खरे तर ढसाढसा वा शांतपणे रुदन करत अश्रू ढाळतात. इतर प्राणिमात्र विव्हळतात, पण ढसाढसा रडताना दिसत नाहीत, तरी अश्रू मात्र ढाळतात. आपल्या मालकाच्या वा पिल्लांच्या मृत्यूने डोळ्यांतून अश्रू ढाळणारे प्राणी आपण पाहिले आहेत. रडणे ही जशी व्यक्तिगत प्रक्रिया आहे, तशीच ती बर्‍याच व्यक्तींमध्ये पारस्परिक होणारीही प्रक्रिया आहे. एखादी व्यक्ती रडत असताना ती जर जवळच्या जीव व्यक्तींच्या सहवासात रडत असेल, तर त्या रडण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. पण जिथे सहानुभूती नसणारी माणसे आजूबाजूला उभी असतील, तर रडण्याचा परिणाम नकारात्मक होऊ शकतो. तरीही इतरजनांना काय वाटते याचा भावूक विचार करण्याचे आपण टाळले तर खरेखुरे रडण्याच्या कृतीने माणसाला स्वत:ला मात्र हायसे वाटते. असो, या जगात तसे सगळेच रडतच येतात. साहीर लुधियानवी म्हणतात तसे ‘कभी खुदपे कभी हालात पे रोना आया।’


- डॉ. शुभांगी पारकर 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat