मातृतूल्य येसूवहिनी
महा एमटीबी   09-Feb-2019क्रांतिवीर गणेश दामोदर उर्फ बाबाराव सावरकर यांच्या पत्नी सरस्वतीबाई सावरकर उर्फ येसूवहिनी सावरकर यांची आज तिथीनुसार (वसंत पंचमी) १०० वी पुण्यतिथी. त्यानिमित्त येसूवहिनींच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख...


'प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ ही म्हण आपण आज अनेक वर्षे ऐकत आलो आहोत. त्यापैकी क्रांतिवीर गणेश दामोदर सावरकर म्हणजे बाबाराव सावरकर यांच्या सुविद्य धर्मपत्नी म्हणजे येसूवहिनी होय. आपल्या संसाराची राखरांगोळी झाली तरी एकतत्व, एकनिष्ठा या मुल्यांचा स्वीकार करून आपल्या पतीच्या क्रांतिकारी कार्यात संसाराचा, जीवाचा त्याग करून स्वातंत्र्यदेवीला प्रसन्न करण्यास त्या जणू सती गेल्या. येसूवहिनी या पूर्वाश्रमीच्या त्र्यंबकेश्वर येथील फडके कुटुंबातील. त्यांचे माहेरचे नाव ‘यशोदा’ असल्याने घरात सर्वजण त्यांना ‘येसू’ म्हणायचे. त्यांचे सर्व कुटुंब म्हणजे अविभक्त कुटुंबपद्धतीचा जणू एक आदर्शचा होता. अशा या सर्वगुणसंपन्न कुटुंबात शके १८०५ म्हणजे इ. स. १८८३ मध्ये त्यांचा जन्म झाला. बालपणापासून त्या अगदी हुशार. खूप सुंदर गोड आवाजाची, भरपूर गाणी पाठ असणारी, नम्र, व्यवस्थितपणाने राहणारी, टापटिपपणे घरकाम करणारी मुलगी म्हणून तिचा परिचय होता. त्यांचे संपूर्ण बालपण त्र्यंबकेश्वर येथे गेले. सन जानेवारी १८९६ मध्ये भगूर गावचे इनामदार दामोदरपंत विनायकराव सावरकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेश दामोदर उर्फ बाबाराव सावरकर यांच्याशी फडके कुटुंबीयांची सोयरिक जुळली व ‘कु.यशोदा फडके’या ‘सौ. सरस्वतीबाई गणेश सावरकर’ झाल्या. ज्यावेळी त्या सावरकर कुटुंबात दाखल झाल्या, त्यावेळी त्या निरक्षर असून बाबाराव व तात्यारावांनी त्यांना लिहायला-वाचायला शिकवले. त्या सावरकर कुटुंबात आल्याने बाबारावांच्या मातोश्री राधाबाई दामोदरपंत सावरकर यांच्या निधनाने घरात जि पोकळी निर्माण झाली होती, ती भरून निघाली. त्यामुळे आपल्या मातोश्री गेल्याची कोणतीही उणीव तात्याराव व बाळाराव या धाकट्या बंधूसमान दिरांना येसूवहिनींनी कधीही भासू दिली नाही. त्यामुळे त्या ‘मातृतुल्य येसूवहिनी’ झाल्या! माहेरी आई-वडील, काका-काकू, चुलतभाऊ, दोन सख्या बहिणी, शिवाय मावस, मामे, आत्येभावंड तर सासरी दामोदरपंत यांच्यासारखे प्रेमळ सासरे, बाबारावांसारखे कर्तव्यनिष्ठ पती. विनायक उर्फ तात्याराव, नारायण उर्फ बाळ यांच्यासारखे लहान दीर व एक विवाहित नणंद अशी भाग्यवान माणसं त्यांना लाभली. सन १८९९ मध्ये भगूरमध्ये प्लेगची साथ आली व या साथीत दामोदरपंत व त्यांचे बंधू बापूराव यांचे निधन झाले व धाकटे दीर तात्या व बाळ यांना बाबाराव व येसूवहिनींनी मोठ्या आजारातून बरे केले. त्यामुळे भगूर गाव सोडून सर्वजण नाशिकला आले.

 

दि. १ जानेवारी १९०० मध्ये तात्यारावांनी नाशिकला ‘राष्ट्रभक्त समूह’ या सशस्त्र क्रांतिकारी गुप्त संघटनेची स्थापना केली. या संस्थेचे पुढे ‘मित्रमेळा’ असे रुपांतर करण्यात आले. या संस्थेचे सभासद देशभक्तीविषयी, स्वातंत्र्याविषयी जनमानसात प्रचार करत असत. सावरकरांनी रचलेले ‘सिंहगड’, बाजीप्रभू देशपांडे यांचे पोवाडे, चाफेकर यांच्यावरील फटका आणि देशभक्तीची पदे सार्वजनिक सभांतून सादर करत असत व ही पदे आपल्या कुटुंबातील स्त्रियांकडून पाठ करून घेत असत. ही पदे येसूवहिनीही म्हणत असत. येसूवहिनींची पाठांतर शक्ती दांडगी असून त्यांना त्या काळातील उभी गजगौरी पाठ होती. त्या गजगौरी म्हणायला लागल्या की, त्या गाण्यातील अद्भुत गोष्टींची ती सरस वर्णने, त्या पदांची पल्लेदार मंजुळ चाल याची सर्वांना ऐकताना भुरळ पडत असे. तात्यांना काव्याची जणू उपजत देणगी होती व ते स्वतः ओव्या, आर्या, पोवाडे रचत असत व येसूवहिनींना शिकवत असत. त्यामुळे त्याही दुपारच्या वेळी कामे आटोपल्यावर इतर समवयस्क महिला-मुली ओव्या-पोवाडे शिकवत. सावरकर कुटुंबाचे देशभक्तीचे प्रेम पाहून त्याचा प्रभाव नकळत येसूवहिनींवरही पडला होता. क्रांतिकारकांच्या पत्नींच्या नावांनी आपणही काहीतरी संघटना काढावी, अशी कल्पना त्यांच्या मनात आली व ती बाबाराव व तात्याराव यांच्या भक्कम पाठिंब्याने कृतीत आली. या संस्थेचे नाव ‘आत्मनिष्ठ युवती समाज’ असे होते. क्रांतिकार्यात सहभाग घेणाऱ्या मित्रमंडळींच्या कुटुंबातील महिलांमध्ये स्वदेशीचा व क्रांतिकार्यात पुरुषमंडळींना प्रोत्साहन देण्याचा प्रचार करणे हा त्या संस्थेचा मूळ उद्देश होता. सन १९०१ मध्ये तात्यारावांचा विवाह झाला व यशोदा उर्फ येसू चिपळूणकर या सावरकर कुटुंबात आल्या व ‘सौ. यमुनाबाई’ सावरकर झाल्या. त्यांना सर्वजण ‘माई’ म्हणत असत. त्यामुळे येसूवहिनींना ‘माई’ यांच्या सारखी धाकटी प्रेमळ जाऊप्रमाणे बहीण मिळाली व या ‘आत्मनिष्ठ युवती समाजा’ला आणखीन एक चांगली कार्यकर्ती मिळाली. या मंडळातील लक्ष्मीबाई खरे, लक्ष्मीबाई रहाळकर, लक्ष्मीबाई दातार, सौ. वर्तक, गोदामाई खरे, लक्ष्मीबाई भट, सौ. तिवारी, पार्वतीबाई गाडगीळ, उमाबाई गाडगीळ, जानकीबाई गोरे, पार्वतीबाई केतकर (लोकमान्य टिळक यांच्या कन्या) या भगिनींकडून तात्यांनी रचलेले पोवाडे व आर्या येसूवहिनी व माई पाठ करून घेत असत. तसेच लोकमान्य टिळक यांच्या ‘केसरी’ या साप्ताहिकातील इंग्रज सरकारच्या अन्यायकारक राजवटींवरील लेख मंडळातील भगिनींना वाचून दाखवत असत. स्त्रियांमध्ये राजकीय परिस्थितीचे ज्ञान प्राप्त करून देण्याच्या व राष्ट्रीय वृत्ती निर्माण करण्याच्या हेतूने या संस्थेमार्फत कार्य चालत असे. या संस्थेचे सभासद होताना प्रत्येक भगिनीला आपली निष्ठा जागृत करण्यासाठी मातृभूमीची आणि युद्धाच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी लागे. त्या वेळेस सुमारे १०० ते १५० भगिनी या संस्थेच्या सभासद होत्या. लोकमान्य टिळक यांच्या पत्नी सत्यभामाबाई टिळक या एकदा नाशिक येथे आल्या असता ‘आत्मनिष्ठ युवती समाजा’तर्फे त्यांना रौप्य करंडकातून मानपत्र व खणा-नारळाने ओटी भरून त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी येसूवहिनी, लक्ष्मीबाई रहाळकर, गोदुमाई खरे यांची भाषणे झाली. या संस्थेसाठी येसूवहिनींनी गृहसौख्याचा त्याग करून आपले सर्वस्व जणू वाहिले होते. त्या घरकाम उरकून दुपारी अनवाणी हिंडत, स्त्रियांना कळकळीने स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्व सांगत, स्वदेशीचा प्रचार करीत. त्यामुळे त्यांचा हा प्रेमळ आग्रह त्यांना संस्थेत घेऊन येई. दुसऱ्यांसाठी कायम उपयोगी पडणे, दुखले-खुपले पाहणे, अंग मोडून सर्वांसाठी मूकपणे खपणे या सद्गुणामुळे येसूवहिनी लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी कधीही कोणत्या गोष्टीचा मोह, लोभ कधीही न ठेवता आपले अंगावरचे उरलेले एक-एक अलंकार अगदी सहजपणे आलेल्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी काढून देऊन सोनेरी वैभवावर कुटुंबाच्या स्वत्वासाठी तुळशीपत्र ठेवले.

 

पुढे क्रांतिकार्याचा कुंड धगधगत्या ज्वालेने पेटून उठला व क्रांतिकारकांचे घरी येणे-जाणे वाढले. अशाही परिस्थितीत येसूवहिनींनी मोठ्या धीराने सर्वांचा पाहुणचार केला. सकाळपासून राबणाऱ्या या परोपकारी वृत्तीच्या स्त्रीस भांड्यातील साधी खरपुडीही उरत नसे. तशातही उपाशी असून त्यांनी कधीही उपासमारीचा आव आणला नाही. सावरकर कुटुंबातील खालावात चाललेल्या दारिद्य्राच्या उतरत्या आलेखाची त्यांनी पतीराजांसह घरातील कोणत्याही व्यक्तीला कधीही जाणीव होऊ दिली नाही.अगदी एकच नऊवारी लुगड्याची जोडी त्या दोन वर्षे वापरत असत व जर कुठे ती लुगडी फाटली तर, त्यांना ठिगळे लावत असत. त्या संसाराप्रमाणे राजकारणातही कर्तव्यकठोर होत्या. दि. ८ जून १९०९ मध्ये बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली व जप्तीचा हुकुम आला.त्यावेळी येसूवहिनी दातारांच्या घरात राहत असत. घरात पोलिसांच्या झडती होत असत.अशाच एका वेळी येसूवहिनींनी प्रसंगावधान दाखवून मुंबईच्या एका विश्वासू क्रांतिकारकाला कोठूरला पाठवले व तेथील बर्वे (कोठूरचे बर्वे हे माई सावरकर यांचे आजोळ) यांच्या घरात असलेल्या काही बॉम्बची विल्हेवाट लावण्याचे काम सोपवले. अशी दूरदर्शीपणाची योजना आखून येसूवहिनींनी पोलिसांना हातोहात चकवले. येसूवहिनींना दोन कन्या झाल्या, पण त्या अल्पायुषी ठरल्या. येसूवहिनींचे तात्यांवर व डॉ. नारायणरावांवर वात्सल्याचे जणू छत्र होते. बाबारावांना व तात्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यावर येसूवहिनी निराधार झाल्या. पण, त्या मनाने खंबीर राहिल्या. इतर क्रांतिकारकांच्या पत्नी नैराश्याच्या महासागरात बुडत असताना येसूवहिनी त्यांना धीर देत होत्या. त्या निराशाग्रस्त भगिनींना प्रेमाने पाठीवरून हात फिरवून धीर देत असत. रात्री एकत्र जमून स्वातंत्र्याची देशभक्तीपर गाणी सर्व भगिनींसह गात असत. या गीतात कवी गोविंद यांच्या ज्वालाग्राही कविता व तात्यांचे रणशूर पोवाडे असत. नाशिकच्या कट अभियोगात अटक झालेल्या कै. सखारामपंत गोरे या तरुण क्रांतिकारकाच्या पत्नी जानकीबाई गोरे यांना नैराश्याने ग्रासले होते. पण, कारागृहात सखारामपंतांचा अमानुषपणे मृत्यू झाल्याची दुख:द वार्ता आली व जानकीबाई गोरे झुरणीला लागल्या. त्यांना अशा परिस्थितीत समाजाने जरी झिडकारले तरी येसूवहिनींनी आपल्या घरी आश्रय दिला. त्यांची सेवा व शुश्रुषा केली. पण, पतीच्या ध्यासाने जानकीबाईंनी प्राण सोडला. सन १९१५ ला डॉ. नारायणराव सावरकर यांचा विवाह हरिदिनी गोपाळराव घाणेकर यांच्याशी झाला व त्या शांताबाई नारायणराव सावरकर झाल्या. येसूवहिनींना खूप आनंद झाला. त्यांना आणखीन एक लहान जाऊ धाकट्या बहिणीच्या रूपाने मिळाली. पण, बाबारावांच्या आठवणीने त्यांचे मन कधी कधी सुन्न होत असे.

 

कवी गोविंदांची ‘संकटी रक्ष मम कांत कांत’ ही ओळ तोंडातल्या तोंडात पुटपुटत, सुन्न मनाने चिंतन करीत त्या रात्र काढत असत. डॉ. सावरकर यांनी मुंबईत गिरगाव भागात औषधालय थाटले. त्यामुळे ते गिरगाव भागात राहत असत. तेव्हा येसूवहिनी व माई त्यांचासोबत राहत असत. सन १९१८च्या अखेर येसूवहिनी मुंबईहून नाशिक येथील त्यांचे मामा वामनभट दांडेकर यांच्याकडे राहण्यास गेल्या. पण, बाबारावांच्या विरहाने त्या मनातून खिन्न होत्या. त्यांच्या अंगात ताप भरला, अंगावर सूज येऊ लागली. बाबारावांच्या भेटीवाचून आपली प्राणज्योत आता मालवणार असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या हातावर सूज आल्याने त्यांच्या हातातील हिरव्या बांगड्या वाढवल्या. त्यांनी कधीही विलायती बांगड्या हातात घातल्या नाही. कारण, स्वदेशीचा अभिमान त्यांच्या मनात अखेरपर्यंत जागृत होता. डॉ. नारायणरावांनी इंग्रज सरकारशी पत्रव्यवहार करून त्यांच्या व बाबारावांच्या भेटीची अनेकदा परवानगी मागितली. पण, प्रत्येकवेळी सरकारने निष्ठूरपणे नकार दिला. हे वृत्त ऐकून येसूवहिनी म्हणत, ‘आमुचा प्याला दुखा:चा, डोळे मिटुनी घ्यायाचा.’ दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांना तापामुळे वाताचा विकार जडला. यावेळी माई त्यांच्या शुश्रूषेसाठी नाशिकला वहिनींच्या मामांकडे आल्या. येसूवहिनींना नाळगुंद विकार जडल्याचे निदान झाले. मुंबईहून डॉ. नारायणराव व त्यांच्या पत्नी शांताबाई हे येसूवहिनींच्या सेवेसाठी आले. दि. ५ फेब्रुवारी १९१९चा तो वसंत पंचमीचा दिवस, बुधवार होता. घरात सर्वत्र दुख:ची छाया पसरत होती. माई व शांताबाई येसूवहिनींच्या अंगावरून हात फिरवत होत्या. पण, अखेर डॉ. नारायणराव यांच्या हाकेला प्रतिसाद देत येसूवहिनींनी स्वर्गारोहण केलं. त्यांचा आत्मा जणू अंदमानच्या दिशेने प्रवासास निघाला. पण, दुर्दैव म्हणजे त्यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी दि. ८ फेब्रुवारी १९१९ रोजी बाबारावांच्या भेटीची परवानगी मिळाल्याचे पत्र आले. अशा या येसूवहिनींचा त्याग हा आजच्या तरुणांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या एका कवितेत ‘धैर्याचि तू मूर्ती’ असा उल्लेख केला आहे. त्या तात्यांच्या प्रेरणास्थान व श्रद्धास्थान होत्या. त्यांच्यासारख्या कर्तबगार पतिव्रतेस स्मृतिशताब्दी पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन!

 

- अमेय गुप्ते

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/