प्रस्तावना
महा एमटीबी   09-Feb-2019डॉ. पां. रा. किनरे लिखित 'तृप्तीची तीर्थोदके' हे पुस्तक दि. १३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नवरोजी, कामगार नेते बागराम तुळपुळे यांच्यासह रा. स्व. संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस, एकात्म मानवदर्शनचे प्रणेते पंडीत दीनदयाळ उपाध्याय, भारतीय मजदूर संघाचे दत्तोपंत ठेंगडी, राष्ट्रीय विद्यार्थी चळवळीचे शिल्पकार प्रा. यशवंत केळकर, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक नाना पालकर, मुकुंदराव पणशीकर, सुरेशराव केतकर, जनसंघाचे ज्येष्ठ नेते प्रेमजीभाई आसर आणि केशवसृष्टीच्या उभारणीतील आघाडीचे कार्यकर्ते जनार्दन नलावडे यांच्या व्यक्तिचरित्राची, कार्याची मांडणी करण्यात आली आहे. सदर पुस्तकाला प्रा. डॉ. अशोक मोडक (माजी आमदार, नॅशनल रिसर्च प्रोफेसर, कुलाधिपती : गुरु घासीराम केंद्रीय विश्वविद्यालय, विलासपूर, छत्तीसगड) यांची प्रस्तावना लाभली असून ती वाचकांसाठी देत आहोत.


माझे जिवलग वरिष्ठ स्नेही डॉ. पां. रा. किनरे यांनी लिहिलेली १४ श्रेष्ठ व्यक्तींची शब्दचित्रे आणि डॉ. किनरे यांनीच लिहिलेला 'स्वातंत्र्य, समरसता व बंधुता' या शीर्षकाचा लेख एका बैठकीतच वाचून हातावेगळा केला. मुळात डॉ. किनरे यांनी केलेली विनंती 'या लेखसंग्रहाला प्रस्तावना लिहा' माझ्यासाठी आज्ञास्वरूप होती. म्हणूनच १५ लेखांचा संग्रह हाती आला तेव्हाच खूप मोठ्या अपेक्षा बाळगून मी हा संग्रह वाचण्यास सुरुवात केली आणि वाचन संपल्याबरोबर एका कृतार्थतेच्या भावनेपोटी प्रस्तावनेचे लिखाण करीत आहे. डॉ. किनरे म्हणजे अनुभवसमृद्ध, ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी त्यांच्या प्रदीर्घ काळच्या सार्वजनिक जीवनात शेकडो माणसांना जवळून पाहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनुपम कार्यामुळे किनरे महाशयांना एक विशेष दृष्टिकोन प्राप्त झाला आहे; कुणाच्याही गुणांची दखल घ्यायची. कारण, आचार्य विनोबा भावे म्हणतात त्याप्रमाणे गुणसमुच्चय घराच्या दरवाज्यासारखा असतो, तर त्या त्या व्यक्तीच्या उणीवा घराच्या भिंतींसारख्या असतात. आपण कुठल्याही गृहात प्रवेश करतो तो दरवाजातूनच. भिंती तर अडथळा उभ्या करणाऱ्या असतात! डॉ. किनरे यांचा जात्या स्वभावच गुणग्राहकतेचा आहे व प्रस्तुत लेखसंग्रहात ज्यांची शब्दचित्रे वाचकांना वाचण्यास मिळतात ती थोर माणसे तर सर्वार्थाने मोठी आहेत. या व्यक्तींची शब्दचित्रे लिहिणारे डॉ. किनरे म्हणजे मणिकांचन अथवा दुग्धशर्करा योग आहे. तात्पर्य, हा लेखसंग्रह मला वाचण्यास मिळाला हे माझे भाग्य आहे. या संग्रहातल्या एकेका लेखात मुख्य आशयाला भिडणाऱ्या ओळी सहजपणे दृष्टीस पडल्या. तेव्हा या ओळींच्या उल्लेखातून व अशा उल्लेखांवरच्या माझ्या मीमांसेतून ही प्रस्तावना कागदावर उतरवावी ही चौकट माझ्या मनात आहे. या प्रस्तावनेच्या प्रारंभीच एक संस्कृत श्लोक उद्धृत करणे इष्ट ठरेल असे वाटते. हा श्लोक असा-

 

षट्पदः पुष्पमध्यस्थो यथा सारं समुद्धरेत्।

तथा सर्वेषु शास्त्रेषु सारं गृह्णाति पंडितः॥

 

(ज्याप्रमाणे भुंगा फुलांमधला साररस (मध) ग्रहण करतो, त्याप्रमाणे विद्वान रसिक सर्व शास्त्रांमधले सार ग्रहण करतो.)

 

डॉ. किनरे यांनी लिहिलेल्या पंधरा लेखातल्या ज्या आशयांमुळे माझ्यासारख्या वाचकाला त्या त्या लेखाचे सार समजले, ते त्यावरच्या माझ्या भाष्यासह अक्षरबद्ध करणे अर्थातच इथे अत्यावश्यक आहे. संघाचे श्रेष्ठ प्रचारक नाना पालकर यांच्याविषयी लेख लिहिताना डॉ. किनरे यांनी दोन वाक्ये नमूद केली आहेत. 'मनुष्य निर्मिती हेच संघाचे सर्वात मोठे कार्य आहे, ही नानांची धारणा होती.' हे वाक्य तसेच 'सर्वेषाम अविरोधने हे कार्य करायचे ही होती नानांची नीती.' हे दुसरे वाक्य म्हणजे या लेखाचे सार आहे. नाना पालकर तर रा. स्व. संघाचे अलौकिक प्रचारक होते. त्यांना संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे जीवनकार्य शालेय जीवनातच कळले. भारताला समस्यामुक्त करायचे असेल तर भारतवर्षाचा कणा असलेला हिंदू समाज संघटित करावा लागेल, हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या विशाल हिंदू समाजाला 'हिंदुत्व जागरणातून' नव-संजीवनी द्यावी लागेल व त्यासाठीच मानवी भांडवलात गुंतवणूक करावी लागेल, हे डॉ. हेडगेवार यांना कळले व मग रक्ताचे पाणी करून त्यांनी या आकलनाच्या प्रकाशात अवघे आयुष्य व्यतीत केले. नाना पालकरांच्या हेही लक्षात आले की, अवघ्या समाजपुरुषाला बरोबर घेऊन मार्गक्रमणा करण्याची निकड डॉक्टरांना कळली. मग नानांनी आपली स्वतःची प्रज्ञा व प्रतिभा संघकार्यासाठीच अर्पण केली. डॉ. किनरे यांनी चपखल प्रमाणे व उदाहरणे देऊन नानांच्या जीवनकार्यावर स्वच्छ प्रकाश टाकला आहे. गांधीहत्येनंतर संघावर गंडांतर आले. खोट्यानाट्या आरोपांची शरसंधाने संघावर करण्यात आली. त्याकाळात जीवघेण्या प्रतिकुलतेशी नानांसारख्या त्यागी विरागी संघ-कार्यकर्त्यांनी टकरा दिल्या. वर्तमानात संघ ९४ वर्षे पूर्ण करीत आहे. 'जगातली अद्वितीय संघटना' ही कीर्ती संघाने कनवटीस बांधली आहे. तेव्हा या कीर्तीला कारणीभूत ठरलेल्या नाना पालकरांचे या पुस्तकाच्या निमित्ताने पुण्यस्मरण, ही निःसंशय प्रशंसनीय बाब आहे. दादाभाई नौरोजी यांच्यावर लेख आहे. डॉ. किनरे यांच्या लक्षात आले की, सन २०१७ मध्ये भारताच्या या पितामहची स्मृतिशताब्दी साजरी झाली. तेव्हा अशा या लोकोत्तर राष्ट्रनेत्याने ब्रिटिशांनी भारताचे केलेले आर्थिक शोषणच कसे विशद केले, हे नव्या पिढीला सांगण्याची गरज किनरेसाहेबांनी लक्षात घेतली. ब्रिटिश पुंजीवाद साम्राज्यवादाबरोबर जन्माला आला, किंबहुना ब्रिटिश शासकांनी भारताची लूट करून स्वतःच्या श्वेतवर्णीय श्रमिकांनाही या लुटीतला चतकोर-नितकोर हिस्सा दिला. साम्राज्यशाही माध्यमातून भांडवलशाहीचे भरणपोषण केले, हे दादाभाईंच्या लक्षात आले आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला जबरदस्त आर्थिक आयाम उपलब्ध करून दिला, हे निर्विवाद सत्य आहे. सुरेशराव केतकरांवरच्या लेखात 'संघशाखेच्या माध्यमातून कार्यातून स्वयंसेवकांमध्ये आपुलकी वाढते, प्रेम वाढते, सद्गुणांची बेरीज होते, तर दुर्गुणांची वजाबाकी होते,' असे कवीचे वाक्य वाचण्यास मिळते. सुरेशरावांनी संघशाखा निर्दोष व्हाव्यात म्हणून अहोरात्र ध्यास घेतला होता. ध्यानी-मनी-स्वप्नी हाच विचार त्यांच्या डोक्यात होता, वगैरे मजकूरही वाचनात येतो. सुरेशराव केतकर किती परिश्रमशील व ध्येयरूप होते हे त्यांच्याशी सलगी असलेल्या सहस्रो स्वयंसेवकांना चांगले ठाऊक आहे. संघशाखांमधून तोलामोलाची माणसे घडतात हे आता सर्वमान्य वास्तव आहे. पण, सुरेशराव केतकरांसारख्या निरपेक्ष कर्मयोग्याच्या त्यागातून हे वास्तव सिद्धांतरूप ठरले आहे यात शंका नाही.

 

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्यावरच्या लेखात डॉ. किनरे वाचकांना सांगतात की, 'विकासाबरोबर माणुसकीचा लय होणार नाही, निसर्गाचे नुकसान होणार नाही, पुढल्या पिढ्यांचे अकल्याण होणार नाही अशी एकात्म दृष्टी बाळगून दीनदयाळजींनी विचार व व्यवहार केला.' सन १९५१ मध्ये जनसंघाची स्थापना आणि सन १९६७ मध्ये या जनसंघाने धारण केलेले पर्यायी पक्षाचे स्वरूप हे दीनदयाळजींचे योगदान असामान्य आहे. पुंजीवादाला व मार्क्सवादाला चपखल उत्तर म्हणजे एकात्म मानवदर्शन आहे. भारताचे दुर्दैव असे की, या युगपुरुषाची निर्घृण हत्या करण्यात आली. वर्तमानात एकात्म मानवदर्शनाच्या संकल्पनांना विश्वमान्यता मिळाली आहे. व्यक्तीचे समाजाशी जैव नाते आहे, समाजाचे विशेष 'स्व'त्व असते, दीनदुबळ्या समाजघटकांना डार्विन सिद्धांताच्या प्रकाशात वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. माणसाच्या दैवी प्रवृत्तींना आवाहन केले पाहिजे, स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून 'असली' समाजपरिवर्तन शक्य आहे. संघर्ष नव्हे, तर समन्वय हाच समाजजीवनाचा स्थायीधर्म आहे, अशा कैक संकल्पना व त्यातून प्रकटणारा तिसरा पर्याय धीम्या गतीने सर्वमान्य होत आहे. डॉ. किनरे यांनी या मुद्द्यांचा अधिक विस्ताराने परामर्श घ्यावा ही विनंती आहे. जनार्दन नलावडे यांचे शब्दचित्र रेखाटताना डॉ. किनरे यांनी नलावडे यांच्या आत्मविलोपी स्वभावाचा सूचक वेध घेतला आहे. वास्तवात रा. स्व. संघाला देशभर याच स्वभावाची माणसे उभी करायची आहेत. श्री. तुळपुळे यांनी माझगांव डॉक कामगारांचा लढा यशस्वी करून दाखविला. खुद्द डॉ. किनरे यांनी तुळपुळे यांना जीवाभावाचे सहकार्य केले व दत्तोपंत ठेंगडींचे सर्वसमावेशक धोरण केवढे लाखमोलाचे आहे, याचे प्रमाण उपलब्ध करून दिले. तुळपुळे म्हणजे 'कामगार जसे राहतात तेवढ्याच सुविधा मला पुरेशा आहेत,' ही धारणा बाळगणारे नेतृत्व. याच नेत्याने सर्व आव्हाने अंगावर घेतली, कामगारांना न्याय मिळवून दिला, पण मानधन स्वीकारण्यास नकार दिला. डॉ. किनरे तुळपुळ्यांवरच्या शब्दचित्रात म्हणतात, 'पहिल्या श्रमआयोगाचे सदस्य म्हणून तुळपुळ्यांनी बांधकाम उद्योगातील उत्पादकता व प्रोत्साहन वेतन यांवरचे टिपण आजही बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत चिंतनीय आहे.' मला वाटते हे टिपण आपल्या अभ्यासाचा विषय व्हावे. दुर्गापूरच्या लोखंडाच्या कारखान्याचे प्रधान संचालक म्हणून बगाराम तुळपुळे यांनी जे विधिनिषेध वैयक्तिक जीवनांतही बाळगले ते शाश्वत आदर्शाची ग्वाही देणारे आहेत. डॉ. किनरे यांनी या विधिनिषेधांवर स्वतंत्र लेखन करावे ही विनंती. 'स्वातंत्र्य, समरसता व बंधुता' या शीर्षकाच्या निबंधात लेखक 'समरसता' या संकल्पनेवर जे भाष्य करतात ते मनोज्ञ आहे. 'विश्वासार्ह व्यवहार समाजाला दिशा देतो' हे विधान तर संस्मरणीय आहे. 'मित्रांच्या भावभावनांशी समरस होणे, निरपेक्ष मैत्रीला जागणे हीच समरसता' इत्यादी सुभाषितांनाही वाचक दाद देईल ही खात्री माझ्या मनात आहे. प्रा. यशवंतराव केळकर यांच्या मार्गदर्शनाचा, पूर्ण समर्पित सुसंवादांचा मीही अनुभव घेतला आहे. यशवंतराव जितके अनामिक होते, तितकेच सामूहिक होते व म्हणून 'परिवर्तनासाठी सकारात्मक विचार करणाऱ्या समर्पित कार्यकर्त्यांची टीम हवी' ही यशवंतरावांची भूमिका डॉ. किनरे यांनी यथार्थ शब्दात कागदावर उतरविली आहे. 'केवळ मागण्या आणि सवलतींसाठी संघर्ष करणाऱ्या विद्यार्थी चळवळीपेक्षा समाजाच्या गरजांची आणि स्वास्थ्याची चिंता करणाऱ्या समाजपरिवर्तनासाठी कटिबद्ध असलेल्या विद्यार्थ्यांचेच संघटन करण्याचा आमचा उद्देश आहे,' हे वाक्य तर यशवंतरावांच्या जीवनोद्दिष्टावर स्वच्छ प्रकाश टाकणारे मौलिक सूत्र आहे.

 

प्रेमजीभाई आसर यांना मामा वरेरकर 'सर्वांचा आसरा' म्हणायचे या विधानाने संपुष्टात आलेले प्रेमजीभाईंचे शब्दचित्र कैक अज्ञात, पण अविस्मरणीय पैलूंची वाचकांना ओळख करून देणारे आहे. प्रेमजीभाईंनी नाना पाटील, भाऊसाहेब राऊत अशा संघजनांपासून दूर असलेल्या रथीमहारथींशी वैयक्तिक स्नेहसंबंध जुळविले. खऱ्या अर्थाने जनसंघाच्या या खासदाराने त्या भूमिकेतही संघकार्यच केले. बाळासाहेब देवरस म्हणजे रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक! आयुष्यभर डॉक्टर हेडगेवार व श्रीगुरुजी यांच्या मौलिक चिंतनाच्या प्रकाशात निरपेक्ष व्यवहार करणारे असामान्य कर्मयोगी. बाळासाहेबांनी जे सार्वजनिक कार्याचे आदर्श भारतात उभे केले, त्यांची उचित दखल डॉ. किनरे यांनी घेतली आहे. आणीबाणीनंतर उभ्या राहिलेल्या जनता पक्षात 'दुहेरी निष्ठेचे' बुजगावणे उभे करण्यात आले. जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी म्हणे संघ सोडावा असा घोशा लावण्यात आला. तेव्हा बाळासाहेब देवरसांनी 'जनसंघ विधायकांनी संघाच्या दैनंदिन कामात जबाबदाऱ्या घेऊ नयेत,' ही सूचना करून सुवर्णमध्य साधला. डॉ. किनरे यांनी हा उल्लेख करून बाळासाहेबांच्या शब्दचित्राचा समारोप केला आहे, तो खूप मार्मिक आहे. दत्तोपंत ठेंगडींनी कामगार संघटनेच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविला आहे. ठेंगडींनी 'असली वेतनाचा' घोशा लावला, म्हणूनच ग्राहक निर्देशांकाचे निर्धारण करण्यासाठी सरकारने लकडावाला आयोग नेमला, ठेंगडींनीच असंघटित कामगारांच्या कल्याणार्थ या कामगारांना 'dignified' राहणीमान मिळावे या हेतुपूर्तीसाठी प्रयास केले व म्हणून तर 'Hydro Engineers Pvt Ltd Vs. Workers' या विवादांत सर्वोच्च न्यायालयाने सन १९६९ मध्ये ऐतिहासिक निर्णय दिला. इत्यादी घडामोडीचे डॉ. किनरे यांनी स्मरण करून दिले आहे. हे स्मरण फार मौलिक आहे. थेट कम्युनिस्ट कार्यकर्त्यांशी जवळीक साधण्यात दत्तोपंत ठेंगडी यशस्वी झाले, कारण कामगारांचे हित साधायचे हाच तर ठेंगडी यांच्या आयुष्याचा मुख्य हेतू होता. श्रीगुरुजींनी दत्तोपंत ठेंगडी यांना कामगार संघटना उभी करण्यासाठी नियुक्त केले व दत्तोपंतांनी या संधीचे सोने केले. बहुआयामी अशा व्यक्तिमत्त्वाच्या दत्तोपंतांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात या श्रेष्ठ नेत्याच्या जीवनकार्यावर देशभर चर्चाविमर्श होण्याची आवश्यकता आहे. डॉ. आंबेडकर यांच्यावरच्या लेखाचा समारोप खालील परिच्छेदाने करण्यात आला आहे व हा परिच्छेद मला या लेखाचे सार म्हणून इथे उद्धृत करणे इष्ट वाटते. 'बाबासाहेबांच्या मूलगामी विचारांचा आग्रह धरून त्यांना अभिप्रेत असलेला माणुसकीचा हक्क दलितांना, वंचितांना, भटक्या-विमुक्तांना, आदिवासी-वनवासींना मिळवून देऊन सर्वसमावेशक विकासाला सकारात्मक सहभाग मिळवून देणे हीच डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली ठरेल.' भारतरत्न डॉ. आंबेडकरांचे भारतभूमीवर निरनिशय प्रेम होते, अवघ्या समाजाला बरोबर घेऊन ऐतिहासिक परिवर्तन साकार करावे हा त्यांचा दृष्टिकोन होता. डॉ. किनरे यांनी या समाजसुधारकाच्या जीवनाचे सारच आपणांसमोर मांडले आहे.

 

डॉ. हेडगेवार व श्रीगुरुजी ही एकमेकांपासून अभिन्न असलेली लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे आहेत. हेडगेवार डॉ. मुंजे यांच्यासह महर्षी अरविंदांना भेटले व तुम्हीच लोकमान्यांच्या निधनानांतर 'भारतवर्षाची सूत्रे कृपया सांभाळा,' अशी विनंती करून परतले; या घटनेचा डॉ. किनरे यांनी घेतलेला वेध खूप अर्थगर्भ आहे. भारतावर मुघलांनी व नंतर ब्रिटिशांनी आक्रमण केले. पैकी मुघलकाळात भारतातील मंदिरे उद्ध्वस्त करण्याचा प्रयास झाला, तर ब्रिटिश काळात मंदिरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन उद्ध्वस्त करण्याची खटपट झाली. मुघलांनी संस्कृतीवर तसेच ब्रिटिशांनी सभ्यतेवर आघात केले. तेव्हा भारतवर्षाला एकत्र गुंफणाऱ्या सांस्कृतिक रेशीमगाठी नव्याने पक्क्या केल्या पाहिजेत, ही जाण बाळगून सखोल चिंतनात रममाण झालेला भारताचा शिल्पकार म्हणजे महर्षी अरविंद. या महर्षींनी लोकमान्यांची उणीव भरून काढावी या संकल्पपूर्तीसाठी डॉ. हेडगेवार थेट पाँडिचेरीस गेले आणि हेडगेवारांनीच स्वतःच्या निधनापूर्वी श्रीगुरुजींची सरसंघचालक म्हणून नियुक्ती करावी, हा काही केवळ योगायोग नाही. डॉक्टर व श्रीगुरुजी या दोन्ही महापुरुषांनी भारताची निकड ओळखली. आपला हिंदू समाज जाती, पोट-जातीत तसेच निजी परिवारात रमला आहे. त्याला भारतवर्षाशी जोडले पाहिजे. त्याला हिंदुत्वाचे स्मरण करवून दिले पाहिजे, त्याच्यातले 'स्वत्व' जागविले पाहिजे, हे भान या दोन्ही महापुरुषांनी बाळगले व स्वतःच्या समर्पित व्यवहारांतून देशभर समाजसेवकांची फळी उभी केली. म्हणून तर आज जगात एकमेवाद्वितीय स्वयंसेवी संघटना कटिबद्ध झाली आहे हे कुणीही मान्य करील. सकारात्मकता, सर्वसमावेशकता, स्वागतशीलता ही देखणी वैशिष्ट्ये हिंदू समाजाला ललामभूत ठरलेली लक्षणे आहेत. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघात याच लक्षणांची अक्षर प्रतिबिंबे पाहण्यास मिळतात. संघाचे यश निर्विवाद आहे. मुकुंदराव पणशीकर यांच्या शब्दचित्राने डॉ. किनरे लिखित लेखसंग्रहाचा समारोप झाला आहे. मुकुंदरावांनी विविध प्रकारची कामे नेटाने यशापर्यंत पोचविली. शतकानुशतके उपेक्षित राहिलेल्या अभागी, हतभागी समाजघटकांच्या कल्याणाकडे अग्रामाने लक्ष दिले पाहिजे, हा मुकुंदरावांचा ध्यास डॉ. किनरे यांनी वाचकांसमोर शब्दबद्ध केला आहे. अबोल राहून धर्मजागरण करावे, शांतपणे घरवापसीचे उपाम तडीस न्यावेत या उद्दिष्टपूर्तीतच मुकुंदराव पणशीकरांच्या जीवनाची सांगता झाली. डॉ. किनरे यांची शब्दचित्रे मला मनापासून आवडली म्हणून तर वाचन व एकटाकी लेखन एका झटक्यात पूर्ण करता आले. ज्या व्यक्तींच्या जीवनकार्यांचा वेध घ्यायचा आहे, त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे, दत्तचित्त होऊन चिन्मन केले पाहिजे. कारण, अशा चिन्मनातूनच हाती घेतलेले लेखनकार्य यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकते, हा या लेखसंग्रहाचा वस्तुपाठ आहे. डॉ. किनरे यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा नुकताच पार पडला आहे. चंद्र व चंदन यांच्यापेक्षाही शीतल असलेल्या १४ व्यक्तींची संगती या लेखसंग्रहाचा अभ्यास करताना मला मिळाली. 'चंद्रचंदनयोर्मध्ये शीतला संतसंगतिः' या पंक्तीची प्रचिती प्राप्त झाली. तेव्हा डॉ. किनरे यांना हार्दिक धन्यवाद व शुभेच्छा देऊन प्रस्तावनेस पूर्णविराम देतो.

 

- प्रा. डॉ. अशोक मोडक

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/