कसा सुचला ‘हाऊ इज द जोश?’ हा डायलॉग?
महा एमटीबी   07-Feb-2019

 

 
 
 
 
मुंबई : ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमातील ‘हाऊ इज द जोश?’ हा डायलॉग सध्या सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. अभिनेत्यांपासून ते नेत्यांपर्यंत अनेकजण हा डायलॉग बोलत असतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ‘हाऊ इज द जोश?’ असे कोणीआजूबाजूला जरी म्हटले तरी ‘हाय सर’ असे त्याचे तडक उत्तर दिले जाते. पण ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक आदित्य धर याला हा जबरदस्त डायलॉग नेमका सुचला तरी कसा? याबद्दल आदित्यने सांगितले आहे.
 

या डायलॉगच्या बाबतीतील किस्सा सांगताना आदित्यने म्हटले की, माझ्या काही मित्रांचे वडील सैन्यात होते. त्यामुळे आम्ही अनेकदा आर्मी क्लबमध्ये जायचो. दिल्लीमध्ये एका ठिकाणी आम्ही नेहमी ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीसाठी जायचो. त्यावेळी तेथे सैन्य दलातील एक निवृत्त अधिकारी येत असत. आर्मी क्लबमध्ये आलेल्या सगळ्या लहान मुलांना ते एका रांगेत उभे करायचे. त्यांचे हातात एक मोठे चॉकलेट असायचे. त्यावेळी ते आम्हा मुलांना विचारायचे ‘हाऊ इज द जोश?’ तेव्हा आम्ही मुले ‘हाय सर!’ असे जोरात ओरडून त्यांना उत्तर द्यायचो. जो मुलगा या प्रश्नाचे उत्तर सर्वात मोठ्याने ओरडून द्यायचा, त्याला ते चॉकलेट मिळायचे.

 

सिनेमातील या डायलॉगला इतका छान प्रतिसाद मिळेल, तो इतका सुपरहिट होईल हे असे आदित्य धर याला कधीच वाटले नव्हते. ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाची कथा लिहिताना आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील डायलॉग या सिनेमात वापरायचे असे आदित्य धर याने ठरवले होते. “‘हाऊ इज द जोश?’हा डायलॉग इतका सुपरहिट ठरेल याची मी कल्पनादेखील केली नव्हती. माझ्या बालपणीच्या आठवणीतील एका वाक्याला लोकांनी इतके डोक्यावर उचलून घेतले, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/