राहुल गांधी पुन्हा संघावर घसरले
महा एमटीबी   07-Feb-2019


नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमीच्या मुद्द्यांवर टीका केली. सरकार नागपूरमधून चालले पाहिजे, असे संघाला वाटते. वरवर मोदी देश चालवत असले तरी प्रत्यक्षात सरसंघचालक देश चालवत आहेत, अशी मुक्ताफळे राहुल यांनी उधळली. एकीकडे तिहेरी तलाकसारख्या कुप्रथांना प्रतिबंध करणारा कायदा रद्द करण्याची भाषा स्वतः महिला असलेली काँग्रेस नेता करत असताना दुसरीकडे राहुल यांनी मात्र संघ-भाजप आणि मोदींवर दोषारोप करण्यालाच प्राधान्य दिले.

 

गेली ७० वर्षे मुस्लीम लांगूलचालनाचा खेळ अव्याहतपणे करणार्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधासाठी म्हणून ‘सॉफ्ट हिंदुत्वा’चे हत्यार उपसले होते. तथापि, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मूळ मार्गावर आल्याचे दिसत आहे. नवी दिल्ली येथे आयोजित काँग्रेसच्या अल्पसंख्यांक अधिवेशनात याचाच प्रत्यय आला. ‘आम्ही (काँग्रेस) सत्तेत आलो तर तिहेरी तलाकविरोधी कायदा रद्द करूअशी मुक्ताफळे या अधिवेशनात महिला काँग्रेसच्या अध्यक्ष व खासदार सुश्मिता देव यांनी उधळली. काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधीही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

 

मुस्लिम महिलांसाठी अत्यंत अन्याय्य ठरलेली तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी मोदी सरकारने तिहेरी तलाकविरोधी कायदा आणला होता. मुस्लीम महिलांमधून या कायद्याचे प्रचंड प्रमाणात स्वागत झाले होते. नुकतेच याबाबतचे विधेयक लोकसभेत संमत झाले. तथापि, या विधेयकात काही जाचक अटी असल्याचे सांगत काँग्रेसने यात खोड घातली आहे. आता तर आम्ही सत्तेत आलो तर हा कायदाच रद्द करू, असे सांगत कट्टरतावाडी मुस्लिमांच्या भावनांना चुचकारण्याचा उद्योग काँग्रेसने सुरू केल्याचे दिसत आहे. सिलचर येथील खासदार असलेल्या व महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या सुश्मिता देव यांनी या अधिवेशनात सांगितले की, काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा रद्द करण्यात येईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/