काँग्रेसचे माजी मंत्री रवीशेठ पाटील भाजपमध्ये
महा एमटीबी   07-Feb-2019मुंबई : रायगड-पेण येथील काँग्रेसचे माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षाया निवासस्थानी त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले आहे. यामुळे रायगड काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रवीशेठ पाटील नाराज होते. पेण विधान मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले पाटील अंतुले यांचे खंदे समर्थक होते.

 

विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी पाटील यांना पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्रिपद दिले होते. तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील होते. चव्हाण यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची जबाबदारी आल्यानंतर पाटील यांची प्रदेश उपाध्यपदावर वर्णी लावण्यात आली होती. परंतु, रायगड जिल्ह्यातील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून अनेक महिने ते काँग्रेसपासून दूर राहिले होते. सुरुवातीला ते शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, भाजप नेत्यांशी जवळीक वाढल्याने ते कमळ हातात घेणार असल्याचे निश्चित झाले होते.

 

काही दिवसांपूर्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्या मध्यस्तीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली होती. त्यानुसार बुधवारी वर्षाबंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रवीशेठ पाटील यांनी आपल्या समर्थकांसह भाजपचा झेंडा हातात घेतला आहे. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/