बीएलओंकडून कर्तव्यात कसूर
महा एमटीबी   07-Feb-2019

‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’, सागर राणेंचा भोंगळ कारभार

 
 
भुसावळ, 6 फेब्रुवारी
मतदार नोंदणी आणि मतदारांना ओळखपत्र पोहोचविण्याची जबाबदारी बीएलओंकडे देण्यात आलेली आहे. बीएलओंनी आपले कर्तव्य चोख बजवावे, असे अपेक्षित असते. परंतु, बीएलओ आपल्या कामाची चालढकल करून आपले काम दुसर्‍यांवर सोपवत असल्याचा प्रत्यय भुसावळ येथे आला आहे.
 
 
शासन मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते तसेच मतदार ओळखपत्र हे कोणत्याही शासकीय कामांसाठी शासनमान्य ओळखपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे.
 
 
येथील डॉ. दिप्ती राहुल पाटील यांचे नाव मतदार यादीत नोेंदवण्यात आले आहे. त्यांचे ओळखपत्रही तयार झाले. त्यांचे पती मतदार ओळखपत्र घेण्यासाठी तु. स. झोपे विद्यालयात जाऊन बीएलओ सागर राणे यांना भेटले असता ओळखपत्र राणे यांनी एका मुलास दिले असून तो वाटून देणार आहे, असे सांगितले. त्या मुलाचे नाव आणि मोबाईल क्रमांक विचारला असता, सागर राणे यांनी हात वर केले. बीएलओ यांनी मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना ओळखपत्र देणे आवश्यक आहे. पण अशाप्रकारे बीएलओ आपली जबाबदारी निभावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून शिक्षक तुम्हीसुद्धा? असे म्हणायची वेळ आली आहे.
 
 
समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या शिक्षकांकडूनच मतदार ओळखपत्रासारख्या गंभीर विषयाबद्दल दुर्लक्ष होेत असल्याने अन्य लोकांकडून कर्तव्य पूर्ततेची अपेक्षा सामान्य जनता तरी कशी करणार. या प्रकाराबाबत नायब तहसीलदार भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता, ते रजेवर आहेत. त्यांचा प्रभार असलेल्या अधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही.