सौ चुहें खाकर बिल्ली हज को चली
महा एमटीबी   07-Feb-2019

 

 
 
 
 
भारताचे नंदनवन’ अशी काश्मीरची ओळख. पण, गेले अनेक वर्षं हेच नंदनवन धुमसतंय. फुटीरतावादी नेत्यांच्या पाकिस्तानकडे असलेला कल आणि त्यांना पुरवली जाणारी आर्थिक रसद याची माहिती नाही, असं मुळीच नाही. जर काही आर्थिक धागेदोरे नसते, तर याच फुटीरतावाद्यांची मुलं-बाळं आज परदेशात ऐशआरामात जगत नसती. काश्मीरवर पाकिस्तान दाखवणारा हक्क आणि दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरला ‘आझाद काश्मीर’ असं म्हणून त्यात आपलेच सत्ताधारी बसवणं, अशी दुतोंडी भूमिका पाकिस्तानची आहे. त्यात नुकतेच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य सर्वांनाच तोंडात बोटं घालायला लावणारं आहे. एकीकडे आधी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांशी चर्चा करायची आणि त्यानंतर भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याची मुळीच इच्छा नाही, असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महम्मद कुरेशी यांनी केलं. त्यांनी फुटीरतावाद्यांशी चर्चा करून असं वक्तव्य करणं म्हणजेसौ चुहें खाकर बिल्ली हज को चली’ असंच म्हणावं लागेल.
 

भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये नाक खुपसण्यासारखे प्रकार पाकिस्तानकडून सततच सुरू आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फुटीरतावादी नेता मीरवाईज उमर फारूख, तसेच हुर्रियतच्या नेत्याशीही फोनवरून चर्चा केली होती. भारताने त्यांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला होता. त्यातच पाकिस्तानच्या उच्चायुक्तांशी याबाबत चर्चा केली होती. तरीही त्यांच्याकडून असे प्रकार थांबले नाहीत. आज काश्मीरचा प्रश्न युनायटेड नेशन्समध्ये प्रलंबित आहे, त्यातच काश्मीरचा काही भाग पाकिस्ताननेही गिळंकृत केला आहे. त्यामुळे कितीही म्हटलं तरी, काश्मीर प्रश्न हा केवळ आता भारताचा अंतर्गत प्रश्न राहिलेला नाही. त्यातच भारतात खाऊन गलेलठ्ठ झालेले सर्वच फुटीरतावादी नेते स्वातंत्र्याच्या नावावर पाकिस्तानच्या कलाने वागतात. त्यातच त्यांना पाकिस्तान सरकारही पोसत आहे. कुरेशी यांनी काही दिवसांपूर्वी काश्मिरी नेते मिरवेझ फारुख यांना फोन करून पाकिस्तान सरकार काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी टाकत असलेल्या पावलांची माहिती दिली. त्यानंतर आक्षेपांचा गदारोळ शांत होतो ना होतोच, तेव्हा कुरेशी यांनी हुर्रियतच्या सय्यद अली शाह गिलानी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनीही पाकिस्तानचे राजदूत सोहेल महम्मद यांच्याशी चर्चा करून कडक शब्दांत या गोष्टींचा निषेध केलात्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती काही कमी झाल्या नाही. दरम्यान, पाकिस्तानच्या वागण्यात बदल न झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचीही इशारा त्यांनी दिला. त्यातच एकीकडे इमरान खान यांचे सरकार भारताशी मैत्री करण्याची भाषा करत असले तरी, अशा घटनांवरून पाठीत सुरा खुपसण्याची त्यांचे प्रकार कमी झाले नसल्याचे दिसून येते.

 

त्यातच आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्यानंतर दहशतवाद्यांवर तात्पुरती कारवाई करायची आणि पुन्हा काही दिवसांनी आपल्या मूळ पदावर यायचे ही पाकिस्तानची जुनी खेळी. ‘काश्मीर दिवसा’च्या निमित्ताने पुन्हा एकदा असा प्रकार घडला. बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानमध्ये ‘काश्मीर दिवसा’च्या निमित्ताने रॅली काढल्या. इतकंच काय तर काश्मीरच्या नावावर लोकांकडून पैसेही गोळा केले. जैश- ए-महम्मद, लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांच्या दहशतवाद्यांनी दहशतवादी हाफिज सईद याने सुरू केलेल्या संघटनेच्या नावाखाली ही रॅली काढली. यामध्ये भारत विरोधी घोषणा करण्यात आल्या. त्यातच काश्मीरमध्ये ‘जिहाद’च्या नावावर पैसेही गोळा करण्यात आले. यामध्ये पाकिस्तान सरकारने केलेली डोळेझाक ही अजिबातच दुर्लक्षित करण्यासारखी नव्हती. त्यांच्या या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी या संघटनांच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकारचे आभारही मानले. एवढंच काय तर हाफिज सईदसारखा दहशतवादी पाकिस्तानच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबतही भारतविरोधी वक्तव्य करताना दिसून आला होता. त्यांच्या कॅबिनेटमधल्या एका मंत्र्याने सईदला वाचवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचेही जाहीर वक्तव्य केले होते. याचाच अर्थ एकीकडे भारताशी मैत्री करण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे भारतविरोधी कारवाया करतच राहायच्या अशी दुटप्पी भूमिकेत सध्या पाकिस्तान वावरत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/