दलालीतून रॉबर्ट वढेरांनी जमावली कोटींची माया
महा एमटीबी   06-Feb-2019


नवी दिल्ली प्रियांका गांधींनी  काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपदाचा कारभार स्वीकारला आहे. मात्र, प्रियांका गांधी यांचे पती आणि सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी पेट्रोलियम डीलमधून लंडनमध्ये कोट्यवधींची माया जमवल्याचा आरोप भाजपने केला आहे.

 

काँग्रेस भवनबाहेर प्रियांका गांधी, रॉबर्ट वढेरा आणि राहुल गांधींचा फोटो असलेले पोस्टर लावण्यात आले होते. 'कट्टर सोच नही युवा जोश' असे पोस्टर कॉंग्रेसने लावले होते. मात्र, कारवाईदरम्यान हे पोस्टर हटवण्यात आले. त्यावर भाजप सरकार राजकारण खेळत आहे, असा आरोप कॉंग्रेसने केला. काँग्रेसच्या या आरोपाला भाजपने पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर देत चांगलेच फैलावर घेतले.

 

काँग्रेस भवनबाहेर लावलेल्या पोस्टरमधील दोघेजण जामिनावर आहेत. एक म्हणजे राहुल गांधी, ज्यांच्यावर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ५ हजार कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. तर दुसरे त्यांचे भावोजी रॉबर्ट वढेरा जे मनी लाँड्रींग प्रकरणी ईडीसमोर हजर होणार आहेत', अशी टीका भाजपने केली.

 

संयुक्त पुरोगामी आघाडी १ च्या काळात रॉबर्ट वढेरांनी लंडनमध्ये कोट्यवधींची माया जमवली असून वढेरांच्या लंडनमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल आठ मालमत्ता आहेत. प्रत्येक मालमत्तेची किंमत कोट्यवधींवर आहे, असा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. 'सेंटेक इंटरनॅशनल नावाची कंपनी वढेरांचे अतिशय निकटवर्ती मानले जाणारे संजय भंडारी यांची आहे. पेट्रोलियम डीलमधील दलालीचा पैसा हा या कंपनीच्या खात्यात जमा झाला. त्याच पैशातून वाड्रांनी लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केल्या', असा गंभीर आरोप पात्रांनी केला.

 

पात्रा म्हणाले, २००९ मध्ये एका व्यवहाराच्या दलालीचा पैसा हा दुबईतील स्कायलाइट नावाच्या कंपनीच्या खात्यात जमा झाला होता. संबंधित कंपनीचे मालक सी.पी. थंपी आहेतथंपी यांची १००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी फेमा अंतर्गत चौकशी सुरू आहे. थंपी हे भंडारी आणि वढेरांसाठी काम करतात., पेट्रोलियम व्यवहाराचा पैसा कोणाच्या खात्यात गेला? रॉबर्ट वढेरांच्या लंडनमध्ये किती कंपन्या आहेत? राहुल गांधींनी या प्रश्नांचं देशाला उत्तर द्यावे,” असा प्रश्न पात्रा यांनी विचारला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/