‘हिंदी मीडियम २’ मध्ये दिसणार इरफान-करिनाची जोडी?
महा एमटीबी   06-Feb-2019

 

 
 
 
 
मुंबई : ‘हिंदी मीडियम’ या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हिंदी मीडियम’ हा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर निर्माते भूषण कुमार आणि दिनेश विजन यांनी सिनेमाचा दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. परंतु अभिनेता इरफान खान कर्करोगाशी सामना करत असल्यामुळे निर्मात्यांनी वाट पाहिली. कर्करोगावर उपचार करण्यासाठी इरफान खान न्यूयॉर्कला गेला होता.
 

आता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये तो कर्करोगावरील पुढील उपचार घेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी मीडियम२च्या कथेवर काम सुरु होते. सिनेमाची कथा आता लिहून पूर्ण झाली असून इरफानने ती वाचलीदेखील आहे. इरफानने सिनेमासाठी हिरवा कंदील दाखवल्यावर सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल. अशी माहिती मिळाली आहे. सध्या ‘हिंदी मीडियम२’ या सिनेमातील इतर कलाकारांची निवड केली जात आहे.

 
 

 
 

‘हिंदी मीडियम२’ साठी अभिनेत्री करिना कपूर खान निवड करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. करिनाने ‘हिंदी मीडियम२’ ची कथा ऐकली असून तिला कथा खूप आवडली असल्याचे म्हटले जात आहे. करिना हा सिनेमा करण्यासाठी होकार देईल अशी आशा ‘हिंदी मीडियम२’ च्या निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. करिनाने या सिनेमाला होकार दिल्यास इरफान-करिनाची जोडी या निमित्ताने प्रथमच पडद्यावर येईल. २०१७ मध्ये ‘हिंदी मीडियम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

 

 
 

चांगल्या शाळेत मुलांचे अॅडमिशन करताना पालकांची होणारी तारेवरची कसरत या सिनेमातून दाखविण्यात आली होती. या सिनेमात इरफान खान सोबत पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर हिने काम केले होते. आता सिनेमाच्या दुसऱ्या भागात करिना कपूर खान प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हिंदी मीडियम या सिनेमाचा पहिला भाग सुपरहिट ठरला होता. प्रेक्षकांनी या सिनेमातील गाण्यांनाही भरभरून पसंती दिली होती. आता ‘हिंदी मीडियम२’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? हे पाहण्यासाठी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/