स्नेहाचा उत्सव
महा एमटीबी   06-Feb-2019


प्रत्येकाच्या मनात उत्सव फुलायला हवा. तो फुलला की, जीवन आनंदाने फुलेल. संक्रांत म्हणजे नात्यांचा उत्सव! माणूसपणाचा, माणुसकीचा उत्सव! प्रेमाचा आणि स्नेहाचा उत्सव म्हणजे संक्रांत. संपन्नता व समृद्धीचा उत्सव म्हणजे संक्रांत. दानाचा व दातृत्वाचा उत्सव म्हणजे संक्रांत. मना-मनातस्निग्धता, गोडवा निर्माण करत समाजाला सुदृढ करणारा उत्सव.

 

संक्रातीच्या काळातील ‘स्नेहपर्व’ फक्त रथसप्तमीपर्यंत असतं, असं नाही. संक्रमण, संक्रांत, स्नेहपर्व हे तीन ‘स’ सकारात्मकतेकडे घेऊन जाणारे आहेत. नकारात्मकेच्या पार्श्वभूमीवर सकारात्मकता अधिक उठून दिसते. सकारात्मकतेची आजच्या काळात जास्त आवश्यकता आहे. तीळगुळातील तिळाची स्नेहमयता जगण्यात झिरपत जाण्याची गरज आहे. गुळासारखंगोड होता आलं पाहिजे. गोडवा मना-मनात उतरला पाहिजे. समाजात कोरडेपणा, कृत्रिमता यांचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे समाजमनाला तडे जाऊन ती भेगाळली आहे. या भेगांमध्ये, तड्यांमध्ये तिळातील स्नेह आणि गुळातील गोडपणा गेला की ती सहजपणानं साधली जाईल. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणाचा हेतू किती उदात्त आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.

 

‘स्नेहपर्व’ आयुष्यभरासाठी असावं, तात्पुरतं नसावं. सगळं जीवन, अवघं जगणं स्नेहमय होऊन जाण्यासाठी आहे. ज्ञानेश्वर महाराजांना समाजाने छळलं. परंतु, त्यांच्या मनात समाजाचा सूड घेण्याचा किंचितही विचार आला नाही. उलट समाजाला माया, आपुलकी, प्रेमाने न्हाऊ-माखू घातलं. त्यांच्याप्रति स्नेहभाव दाटून आला. त्यामुळेच ते अवघ्या ‘विश्वाची माऊली’ झाले. हे ‘माऊली’पण जपण्याजोगे आणि जगण्याजोगे आहे. संत तुकाराम महाराजांनादेखील लोकांनी खूप त्रास दिला. त्यांनी लोकांना सहजपणे क्षमा केली. स्नेह असल्याशिवाय क्षमा करता येऊ शकत नाही.

 

‘दाखवणं’ किंवा ‘दिसणं’ यापेक्षा ‘असणं’ महत्त्वाचं आहे. दिखावा केवळ देखावे निर्माण करतो. प्रेमाचा पाझर अंतरात असला की, दिखावा संपून जातो. संतांनी समाजसेवेचा कधीच देखावा केला नाही, त्याची कधी जाहिरात केली नाही, त्याचं भांडवल केलं नाही. स्वामी विवेकानंदांनी समाजाच्या प्रगतीच्या व उन्नतीच्या घोषणा केल्या नाहीत, तर हिंदू संस्कृतीचा ध्वज सातासमुद्रापार फडकवला. आपला धर्माभिमान, धर्माचे श्रेष्ठत्व यांचे परदेशातही प्रभावीपणे प्रतिपादन केले. त्यामुळे अवघे जग अचंबित झाले. आश्चर्यासह आकर्षित झाले. धर्मामधील अनेक उत्तम गोष्टींचा अंगीकार करण्यासाठी विवेकानंदांचं शिष्यत्व स्वीकारलं. त्यांच्या ठायी असणार्‍या गुणांमुळे त्यांना आपल्या जगण्यातील उणेपणाची जाणीव झाली. सुसंस्कृत असल्यावर संस्कार सहजपणानं झिरपत जातात. आदर्श समोर असला की, त्यानुसार जगावंस वाटतं.

 

एकनाथ महाराजांना माणसांसह प्राण्यांविषयीही प्रेम होतं. आजच्या काळात माणसांपेक्षा प्राण्यांवर प्रेम करणारे लोक जास्त दिसून येतात. रक्ताच्या नात्याविषयी प्रेम वाटत नाही, पण श्वानांवर मात्र प्रेम करावसं वाटतं, हा प्रकार गंमतीशीर नाही का? हास्यास्पद असणारी ही कृती स्नेहाच्या अभावामुळे घडते. वृद्ध माता-पित्यांसाठी वेळ नाही, असे म्हणणारी पिढी कुत्र्यांसाठी आवर्जून वेळ काढताना दिसते. संक्रांत हा स्नेहपर्वकाळ जगावा आणि जपावाअसा संदेश देणारा सण आहे. सकल संत स्वकृतीमधून स्नेहाचा कृतिशील संदेश देतात. त्यामुळे त्यांच्या चरित्रांमधून चारित्र्य घडतं. त्यांच्या संदेशांत शाब्दिक पोकळपणा नसून आचरणशील भरीवपणा प्रतीत होतो.

 

स्नेहाशिवाय सगळं जीवन शुष्क होऊन जातं. शुष्कता मनाची मोडतोड करते. मानसिक संतुलन साधण्यासाठी स्नेहमयतेची साधना करणं आवश्यक आहे. स्नेहाचे दीप शांतपणानं तेवत ठेवले की मना-मनातला अंध:कार दूर होईल. स्निग्धता साधली की, मनंदेखील साधली जातात. नैराश्य, नकारात्मकतेचा काळोख नाहीसा होतो. जगण्याला आशयघनता प्राप्त होते. मोठा दिवा होता आलं नाही तरी, पणती तर नक्कीच होता येईल. पणती छोटीशी असली तरी, ती आजूबाजूचा अंधार दूर करण्यासाठी पुरेशी असते. प्रत्येकानं एकामेकांविषयी प्रेम, स्नेहभाव ठेवून जगलं की, स्वत:सह समाजाचं जगणं सुंदर होऊन जाईल.

 

प्रत्येकाच्या मनात उत्सव फुलायला हवा. तो फुलला की, जीवन आनंदाने फुलेल. संक्रांत म्हणजे नात्यांचा उत्सव! माणूसपणाचा, माणुसकीचा उत्सव! प्रेमाचा आणि स्नेहाचा उत्सव म्हणजे संक्रांत. संपन्नता व समृद्धीचा उत्सव म्हणजे संक्रांत. दानाचा व दातृत्वाचा उत्सव म्हणजे संक्रांत. मना-मनातस्निग्धता, गोडवा निर्माण करत समाजाला सुदृढ करणारा उत्सव. माणूस उत्सवप्रिय आहे. त्यामधून उत्साहाचे झरे झिरपत जातात. मनाचे मालिन्य धुणारा उत्सव. उदासीनतेची चढलेली काजळी झटकून टाकणारा उत्सव. आळसाला दूर करणारा उत्सव. समाजमनाला सुदृढ करणारा उत्सव. अशाच उत्सवांची नितांत गरज आहे. त्याचा शांतपणानं विचार केला की, आचार सहजपणानं घडतो. विचार व आचारांना सुयोग्य दिशा देणारा उत्सव. समाजभान व आत्मभान देणारा उत्सव. वृत्ती दारिद्—याला दूर करणारा उत्सव. अंर्तबाह्य चैतन्य प्रदान करणारा हा संक्रांत उत्सव!

 

किती आयाम आहेत संक्रांतीच्या स्नेहाचे. किती विविध पैलूंनी विनटलेली आहे ती. गुणांचे अलंकार धारण केले की, सुवर्णाचे अलंकार अधिक खुलतात.अंत:स्फूर्ती, अंत:प्रेरणा याचा स्रोत सदैव खळाळत ठेवण्याचं मौलिक कार्य करणारा हा स्नेहोत्सव आहे. बेगडीपणा, ढोंगीपणा याला थारा न देणारा हा स्नेहाचा उत्सव आहे. सागराच्या उदरात खोलवर गेल्याशिवाय मोती हाती लागत नाहीत. त्याचप्रमाणे सण, उत्सव याच्या आत दडलेला आशय लक्षात घेतल्याशिवाय गुणांचे मोती गवसत नाहीत.जीवन ओंजळ गुणांच्या अस्सल मोत्यांनी भरायची का, खोट्या, कृत्रिम मोत्यांनी भरायची? हे आपल्याच हातात आहे.

 
- कौमुदी गोडबोले  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/