श्रवणभक्ती
महा एमटीबी   06-Feb-2019


श्रवणभक्ती ही आपण समजतो तेवढी सोपी गोष्ट नाही. या भक्ती प्रकारासाठी भक्ताने काय जाणून घ्यायला यावे, याची मोठी यादी समर्थांनी दासबोधाच्या दशक चार, समास एकमध्ये दिली आहे. त्या सर्व गोष्टी प्रथम जाणून घेऊन त्यातील सार काय आणि असार काय हे ठरवायचे आणि निश्चित केलेल्या असार गोष्टींचा त्याग करायचा, ही सोपी गोष्ट नाही.

 

नवविधाभक्तीत श्रवणभक्तीला प्रथम स्थान दिले आहे, हे आपण पाहिले. नारदभक्तिसूत्रातही सांगितले आहे की, भगवंताच्या गुणांचे श्रवण-कीर्तन केल्याने भक्ती फलद्रूप होते. त्यातील ३७वे सूत्र ‘लोकेऽपि भगवद्गुणश्रवणकीर्तनात्।’ असे आहे. त्यातही श्रवणाची महती सांगितली आहे. सर्वसाधारणपणे भौतिक विश्वातील ज्ञान आपण कसे संपादन करतो ते पाहू. आपण पंचज्ञानेंद्रियांद्वारा भौतिक ज्ञान मिळवत असतो. कान (ऐकणे), डोळे (पाहणे), जीभ (चव घेणे), नाक (वास घेणे) आणि त्वचा (जाणीव). यापैकी श्रवणेंद्रियांद्वारा मिळणार्‍या ज्ञानाला विशेष महत्त्व आहे. श्रवण हे ज्ञान मिळवण्याचे उत्तम साधन आहे. आज लिखित म्हणजे छापील वाङ्मय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. लोक पुष्कळ वाचन करीत असले तरी, विद्वानांचे शब्द ऐकायला ते उत्सुक असतात. विद्वान माणूस बहुश्रुत असतो, असे आपण म्हणतो. याचा अर्थ त्याने खूप ऐकलेले असते, खूप वाचलेले असते. तसं पाहिलं तर वाचन हेही एक प्रकारे श्रवण आहे. वाचन करीत असताना वाचलेले शब्द आपण मनातल्या मनात उच्चारत असतो आणि ऐकत असतो. श्रवणाद्वारे मिळणार्‍या ज्ञानाची तुलना इतर इंद्रियांद्वारा मिळणार्‍या ज्ञानाच्या तुलनेत केली, तर श्रवणज्ञान शास्त्र खरं असतं. डोळ्यांनी मिळणारे ज्ञान बरेचदा फसवे आणि भ्रामक असू शकते. हा आपला रोजचा अनुभव आहे. सूर्य, चंद्र, काही तारे आकाराने मोठे असून प्रत्यक्ष डोळ्यांनी ते लहान वाटतात. वेगाने चालणार्‍या गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहताना दूरवरचे डोंगर, झाडे उलट्या दिशेने पळतात असे भासते. उन्हाळ्याच्या दिवसात वाळवंटी प्रदेशात मृगजळ म्हणजे पाणी असल्याचा भास होतो. हे सारे मिथ्या असते. तसेच जीभ, स्पर्श ही ज्ञानेंद्रियेही काही वेळा फसवे ज्ञान देतात. ताप आलेल्या माणसाला साखर कडू लागते. म्हणूनच ज्ञानेंद्रियात श्रवणाला अग्रस्थान आहे.

 

शारीरिकद़ृष्ट्या श्रवणेंद्रिये कार्यक्षम असली तरी, ऐकणार्‍यांची मन:स्थिती स्थिर नसेल, तर श्रवण नीट होत नाही. तुमच्या मनात विचारांचा गोंधळ चालला असेल किंवा तुम्ही संतापलेले असाल, तर दूरवर होणारा घंटानाद कानावर पडूनसुद्धा तो तुम्हाला ऐकू येणार नाही. मन:स्थिती स्थिर असेल तरच नाद ऐकू येईल. हे झाले भौतिकज्ञान मिळवून देणारे श्रवण. परमार्थविषयक श्रवणसुद्धा शांत आणि स्वच्छ मनाने ऐकले, तर त्याचा उपयोग होतो. सर्वसाधारणपणे आपली सवय अशी असते की, आपण जो विचार ऐकतो तो आपल्या पूर्वानुभवाशी जोडून पाहण्याचा प्रयत्न करतो. हे व्यवहारात आणि भौतिकज्ञान मिळवताना योग्य असले तरी, अध्यात्मज्ञान प्राप्तीत त्यामुळे अडथळे निर्माण होतात. अशा पूर्वग्रह दूषित श्रवणाने मनात नानाविध शंका, संशय निर्माण होतात व त्यामुळे भक्तीत बाधा येते. श्रवणभक्तीत सांगितले आहे की, भगवंताचे गुणगान ऐकावे, त्याच्या लीला ऐकाव्यात. परंतु, आपल्या ठिकाणी स्वत:विषयी गर्व आणि देहबुद्धी जागृत असल्यास अनेक शंका उपस्थित होतात. भगवंताच्या अवताराच्या कथा ऐकताना त्यातील आशय आपण आपल्या पूर्वानुभवाशी ताडून पाहण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी आपल्या मनात शंका येतात की, हे खरे आहे का? हे काही बुद्धीला पटत नाही वगैरे. भगवंताविषयी तार्किक सत्यासत्यता पडताळणे श्रवणभक्तीसाठी योग्य नाही. अशाने भगवंताविषयी प्रेम कसे निर्माण होईल? म्हणून श्रवणभक्ती करताना मन स्वच्छ, विकाररहीत असावे लागते.

 

श्रवणभक्ती ही आपण समजतो तेवढी सोपी गोष्ट नाही. या भक्ती प्रकारासाठी भक्ताने काय जाणून घ्यायला यावे, याची मोठी यादी समर्थांनी दासबोधाच्या दशक चार, समास एकमध्ये दिली आहे. त्या सर्व गोष्टी प्रथम जाणून घेऊन त्यातील सार काय आणि असार काय हे ठरवायचे आणि निश्चित केलेल्या असार गोष्टींचा त्याग करायचा, ही सोपी गोष्ट नाही. या समासात निर्दिष्ट केलेल्या गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी बुद्धीचा मोठा आवाका हवा. प्रथम स्वामींनी परमार्थ साधने जाणून घ्यावी असे सांगितले आहे. त्यात कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, वैराग्यमार्ग, तीर्थांचा महिमा, दानांचा महिमा, मंत्रशास्त्र, तंत्रशास्त्र, तप, पुरश्चरणे, योगमार्ग अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. श्रवणभक्तीसाठी साधकाने ही सारी परमार्थ साधने समजून घ्यावीत, असे स्वामींचे म्हणणे आहे. तसेच समाजात वावरताना सभोवताली जे काही विषय आपण पाहतो, ते जाणून घेतले पाहिजे. या प्रकारात अघोरपंथी, शाक्त, आगम या पंथांचे तंत्र, मंत्र, तोडगे माहीत करून घ्यावे. तसेच मद्य-मांस सेवन करणारे आणि स्मशानात वास्तव्य करून भूतयोनीला वश करू पाहणारे कापालिक, इंद्रिय पूजा, योनीपूजा करणारे शाक्त यांचीही माहिती करून घ्यावी. त्यानंतर योगमार्गाचा पसारा तर याहीपेक्षा खूप मोठा आहे. त्यातील मुद्रा, प्राणायाम, ध्यानधारणा, आणिमादी, अष्टसिद्धी, अष्टांग योग, वेदशास्त्रे पुराणे या सार्‍यांची माहिती प्राप्त करून घ्यावी. तसेच २१ स्वर्ग, सप्त पाताळ, स्वर्गसुख, नरकयातना, नरकातील कुंभीपाक, अक्षोभ नरकयातना तसेच नरकयातना भोगण्यासाठी मिळालेला यातनादेह या सार्‍या गोष्टी ऐकल्या पाहिजेत.

 

आता भौतिकज्ञान विषयांचे समर्थकृत विवेचन खरोखर अभ्यासण्यासारखे आहे. त्यात स्वामींनी अनेक गोष्टींचा समावेश केला आहे. त्या जाणून घ्यायला सांगितले आहे. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, नाना औषधींचे ज्ञान, नाडीज्ञान, कफ-वात-पित्त हे त्रिदोष, त्यांचे संतुलन बिघडल्यावर होणारे नाना तर्‍हेचे रोग, ते रोग निवारण करण्याची पद्धती, औषधी वनस्पतींचे ज्ञान, औषधी मणी या सार्‍यांची माहिती ऐकावी. तसेच संगीतातील रागज्ञान, तालज्ञान, वाद्यज्ञान, नृत्याची माहिती हे सारे ऐकावे. आता खगोलशास्त्राविषयीची माहिती पाहा. त्यात सृष्टीची रचना, भूगोलाची रचना, चंद्र-सूर्य, तारामंडळे, शुभाशुभ वेळा, इंद्रदेव, वायू, वरुण यांची स्थाने, कुबेराचे स्थान, नवखंड, चौदा भुवने, अष्ट दिग्पालांची स्थाने, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर यांच्या संबंधी माहिती मिळवली, ऐकली पाहिजे. तसेच वनस्पती, पशु-पक्षी, नाना गहन अरण्ये, उपवने, फलज्योतिषशास्त्र, अमृतवेळा मुहूर्त, हस्तसामुद्रिकाची ३२ लक्षणे हे सारे ऐकले पाहिजे. थोडक्यात, १४ विद्या आणि ६४ कला यांची माहिती करून घेतली पाहिजे.

 

श्रवणभक्तीच्या या समासात (दशक ४, समास १) काय काय ऐकावे, जाणून घ्यावे, माहीत करून घ्यावे, यासंबंधीचे विविध विषय ऐकल्यावर असे वाटते की, समर्थांच्या मते साधकाला या ज्ञानशास्त्रांची तोंडओळख तरी असली पाहिजे. हे सारे पाहिल्यावर श्रवणभक्तीचा आवाका किती मोठा आहे याची कल्पना येते. याच समासात समर्थांनी भक्तीची दोन साधने सांगितली आहेत. एक हरिकथापुराण श्रवण आणि दुसरे अध्यात्मज्ञान निरुपण. पहिल्या भागात भगवंताच्या सगुण अवताराची चरित्रे ऐकावीत. त्या अवतारांच्या लीला समजून घ्याव्यात असे सांगितले आहे, तर दुसर्‍या भागात अध्यात्म निर्गुण तत्त्वांची ओळख करून घ्यावी असे म्हटले आहे. समर्थांच्या मते, ही दोन्ही परम पवित्र साधने असून त्यांच्या योगाने भक्तीचे मूळ शोधता येते.

 

ही भक्तीची परम पवित्र साधने अभ्यासताना या सृष्टीच्या भोवतालच्या पसार्‍यातील विविध ज्ञानशाखांचा, भौतिकशास्त्र शाखांचा समर्थ उल्लेख करतात आणि त्या माहीत करून घ्यायला सांगतात. पुढे याचे कारण समर्थ स्पष्ट करतात. विश्वातील हे सारे माहीत करून घेताना त्यातील सार काय आणि असार काय हे साधकाला आत्मप्रचितीने ठरवता येते. कोणीतरी अमूक गोष्टी असार आहेत असे सांगितले, तर त्यावर विश्वास ठेवून ते असारत्व स्वीकारण्यापेक्षा त्या गोष्टी असार आहेत, याची साधकाला आत्मप्रचिती आली पाहिजे. कारण, आत्मप्रचितीने एखादी गोष्ट असार आहे याची खात्री झाल्यावर साधक आपल्या मतापासून ढळणार नाही आणि कालांतरानेही असार गोष्टींचे आकर्षण त्याला राहणार नाही. त्यासाठी समर्थ सांगतात

 

ऐसे हे अवघे ऐकावे ।

परंतु सार शोधुनि घ्यावे ।

असार ते जाणोनि त्यागावें ।

या नाव श्रवणभक्ती । (दा. ४.१.२९)

 

जे आपल्या प्रत्ययाला येते ते घ्यावे. अर्थातच उरलेले असार समजून सोडून घ्यावे. पुढे दशक १८, समास पाचमध्ये समर्थांनी पुन्हा श्रवणाविषयी आपले विचार मांडले आहेत. समर्थांचे हे विचार मननीय आहेत. अध्यात्माची भाषा समजायला कठीण असते. तेव्हा त्यातील काहीही आकलन न होता केवळ अध्यात्म श्रवणाने पुण्य मिळते हे समर्थांना मान्य नाही. समर्थ म्हणतात, ‘सार असार येकचि करावे । हे मूर्खपण ॥यासाठी अध्यात्म विचाराची बुद्धिपूर्वक चिकित्सा करून जे अनुभवास म्हणजे प्रचितीस येते ते घ्यावे. केवळ अंधश्रद्धेने श्रवण करू नये, असे स्वामींचे स्पष्ट मत आहे.

 

‘जे प्रचितीस आले खरें ।

तेचि घ्यावे अत्यादरे ॥

 - सुरेश जाखडी
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/