दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...
महा एमटीबी   06-Feb-2019


दिवाळखोरीची परिस्थिती ही जितकी कंपनीच्या मालकासाठी दुर्देवी तितकीच त्या कंपनीतील नोकरदारांसाठीही. कारण, शेवटी कंपनीबरोबर नोकरदारांचे भविष्यही टांगणीला लागते. गेल्या काही दिवसांतील ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’च्या एकूणच स्थितीवर नजर टाकली असता, त्या कंपनीचा आर्थिक डोलारा अगदी ढासळत असल्याची चर्चा होती. ते खरे ठरले आणि त्याचा स्वाभाविक परिणाम कंपनीवर झाला आणि कंपनी दिवाळखोरीत काढण्याची वेळ अनिल अंबानींवर आली. खरं तर याला अनेक कारणं आहेत. ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ ही खर्‍या अर्थाने मुकेश अंबानी यांची संकल्पना. अगदी ५०० रुपयांत सर्वांच्या हातात छोटा फोन देऊन ग्राहकांना आपल्या जवळ खेचण्यात मुकेश अंबानी यशस्वी ठरले. रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या हयातीत कंपनीत सारे काही आलबेल होते. परंतु, धीरूभाई अंबानींच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये कंपनीची वाटणी करण्यात आली. त्यामध्ये ’रिलायन्स कम्युनिकेशन्स’ ही कंपनी अनिल अंबानी यांच्या पारड्यात आली. सुरुवातीच्या काळात या कंपनीचीही वाटचाल उत्तमरित्या सुरू होती. कंपनीला व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएल यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असताना कर्ज काढून स्पर्धेत टिकण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे कंपनीने निरनिराळ्या बँका, आर्थिक संस्थांमधून तब्बल ४६ हजार कोटींचे कर्ज घेतले. मात्र, अनिल अंबानी यांचे ज्येष्ठ बंधू मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स जिओ’ या कंपनीच्या आगमनानंतर खर्‍या अर्थाने ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ची आर्थिक स्थिती अधिक ढासळण्यास सुरुवात झाली. परिणामी, छोट्या भावाला मोठ्या भावाच्या दारी जावे लागले. परंतु, कायद्यापुढे त्याचाही निभाव लागू शकला नाही. आपल्याकडे प्रामुख्याने एक गोष्ट समोर येते ती म्हणजे, कंपनी स्थापन करण्यासाठी जेवढे अडथळे पार करावे लागत नाहीत, त्यापेक्षा अधिक अडथळे कंपनी बंद करण्यासाठी पार पाडावे लागतात. अनेक समज-गैरसमज किंवा आपापसातल्या साटेलोट्यामुळे अनेकदा कर्जाच्या पुनर्रचनेच्या नावाखाली ‘कंपनीची दिवाळखोरी’ हा विषय कधीच फारसा चर्चेत येत नसे. परंतु, विद्यमान सरकारने दिवाळखोरीची सनद तयार करून कर्जाची पुनर्रचना किंवा साटंलोट्यासारख्या प्रकारांना चाप लावला. एस्सार, लँको यासारख्या वीज कंपन्यांनी आपले अनेक प्रकल्प दिवाळखोरीत जाहीर केले.

 

‘आरकॉम’ही दिवाळखोरीत

 

मुकेश अंबानींना खर्‍या अर्थाने दूरसंचार व्यवसायात रस होता. त्यामुळेच त्यांनी रिलायन्सच्या दूरसंचार कंपनीची संकल्पना मांडली होती. कालांतराने ती त्यांच्या भावाकडे गेल्यानंतर त्यांनी सावधपणे ‘रिलायन्स जिओ’ या कंपनीची सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात पैसा ओतून धुमधडाक्यात कंपनीने अल्पावधीत २५ कोटी अधिक ग्राहक जोडले. ‘रिलायन्स जिओ’च्या आगमनानंतर अनेक दूरसंचार कंपन्यांच्या व्यवसायाचे धाबे दणाणले. त्यात ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ही होतीच. त्यातच ग्रहण लागल्याप्रमाणे ‘रिलायन्स कम्युनिकेशन्स’ आणि ’एरिक्सन’ या कंपनीतील व्यवहारही फाटला. ग्राहकांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी तसेच नवे ग्राहक आपल्याजवळ ओढण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेतअनेक कंपन्यांचे कंबरडे मोडले, तर ‘एअरसेल’सारख्या छोट्या कंपन्या बाजारभावात गेल्या. यातच पार कंबरड मोडलेली कंपनी म्हणजे ‘आरकॉम.’ ‘रिलायन्स जिओ’ला स्पेक्ट्रम आणि असेट्स विकण्यात आलेल्या अपयशामुळे कंपनीसमोर दिवाळखोरीत निघण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. त्यातच त्यांच्यासमोर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ‘एरिक्सन’ने सर्वोच्च न्यायालयात जाऊन कंपनीचे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली. कंपनीला देणे असलेल्या ५५० कोटींची रक्कम जाणूनबुजून देण्यात येत नसल्याचे ‘एरिक्सन’कडून न्यायालयाला सांगण्यात आले. त्यातच आपल्या विरोधात निकाल लागला, तर ती आणखी डोकेदुखी ठरायची या भावनेतून कंपनीने दिवाळखोरी जाहीर करण्याचा निर्णय घेतला असावा. दरम्यान, आता दिवाळखोरी जाहीर केल्यामुळे पूर्ण रक्कम मिळणार नसली तरी, बँकांना आपला वाटा घेता येणार आहे. एकेकाळी १५ पैसे प्रतिमिनीट दर आणि ५०१ रुपयांमध्ये मोबाईल देणारी कंपनी आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेकडोंचा भाव असलेल्या या कंपनीच्या समभागांना आज पाच रुपयांचा भाव आला आहे. आता राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) माध्यमातून हे देणे फेडण्याचा प्रयत्न होणार आहे. यापूर्वीही कंपनी डबघाईला आली असली तरी, त्या कंपनीला बाजारातून बाहेर काढण्यात ‘जिओ’चा मोठा वाटा आहे. अनिल अंबानींनी अनेकदा ही स्पर्धा कठीण होत चालल्याचे ‘जिओ’चे नाव न घेताही बोलून दाखवले होते. त्यामुळे ‘जिओ’चेे पदार्पण अनेकांसाठी मृत्युघंटा ठरली. या उद्योगातील स्पर्धेचा फायदा ग्राहकांना होत असला तरी, स्पर्धा संपून तिथे एकाचीच मक्तेदारी निर्माण झाल्यास ग्राहकांनाही त्याचा फटका बसू शकतो, हे विसरून चालणार नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/