अण्णा, लोकपालने खरंच प्रश्न सुटेल का?
महा एमटीबी   04-Feb-2019 

रवींद्र मुळे यांचे अण्णांना अनावृत्त पत्र

 

आदरणीय अण्णा,

कृ. सा. न. वि. वि.

 
कसे आहात? पुन्हा एकदा तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावत आहात. तुमची काळजी वाटते. तुम्ही आमच्या जिल्ह्याचे भूषण आहात. आम्ही कुठे बाहेरच्या राज्यात गेलो तर अभिमानाने एक तर आम्ही अण्णा यांच्या जिल्ह्यातील किंवा साई बाबा यांचे शिर्डी आमच्या जिल्ह्यात आहे असे सांगतो. मी एक संघाचा स्वयंसेवक आणि तुमच्याबद्दल आदर असलेला नगरकर पण आज खूप विचार मनात घोंगावत आहेत. गेल्या वेळी तुम्ही आंदोलन केले आणि प्रस्थापित सत्तेला धक्के दिले त्यातून तुम्ही, रामदेव बाबा आणि श्री श्री रविशंकरजी अशा आदरणीय व्यक्तित्वामुळे भारतीयांच्या आशा-आकांक्षा उंचावल्या. त्यातून राजकीय परिवर्तन घडून आले. राज्यातपण परिवर्तन घडले. नंतर गेली साडेचार वर्षे माझ्यासारखे असंख्य भारतीय, महाराष्ट्रातील जनता यांच्या कानाला भ्रष्टाचाराच्या बातम्या ऐकायची सवय झाली होती त्यात एकदम कमी आली. डोळ्यांना पेपर उचलून वाचायला लागल्यावर भ्रष्ट नेत्यांच्या बातम्या वाचायची सवय झाली होती पण अशा कुठल्याच बातम्या अपवाद वगळता दिसल्या नाहीत. हा तुमच्यासारख्या नैतिक व्यक्तींचा दबाव आणि कदाचित सत्ताधारी नेतृत्वातील संस्कार यांचा एकत्रित परिणाम असेल. तुमच्या स्वप्नातील ग्रामविकासाचा महत्वाचा बिंदू ठरेल अशी जल युक्त शिवार योजनाआज खेड्यांचे चित्र बदलू पाहत आहे. एकीकडे पाटबंधारे खात्याचे प्रचंड भ्रष्टाचार तुमच्या काळजीचा विषय होता त्या पार्श्वभूमीवर जल युक्त शिवार ही योजना म्हणजे एक प्रकारे तुमची स्वप्नपूर्तीच होती.
 
टोलमधील भ्रष्टाचार तुमच्यामुळेच आम्हाला समजला. पण महाराष्ट्रातील सरकार बदलले आणि टोल माफीच्या निर्णयाने अनेक वाहन मालक प्रवासी यांना तुमच्यामुळे टोलच्या जाचातून मोकळीक मिळाली. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा हा तुमचा आग्रह त्यासाठी केंद्रसरकारने हमी भावात काही प्रमाणात का होईना बदल केला पण परत यात उत्पादन खर्चात असणाऱ्या फरकाचा विषय आहे. पण एकेकाळी शेतकरी तुमच्याकडे येऊन युरियाबद्दल, त्याच्या काळ्या बाजाराबद्दल सांगितल्यामुळे तुम्ही अस्वस्थ होत असत. या सरकारने नीम कोटींग चा प्रयोग केला आणि युरिया बाजारात सहज उपलब्ध झाला. तुम्ही सेंद्रिय शेतीचा आग्रह करायचे त्याला प्रोत्साहन आता मिळत आहे. असे प्रयोग करणारे शेतकरी पुढे आणले जात आहेत. देशाचे चित्र बदलत आहे.पण हे कुणा एकट्याचे नाही तर तुम्ही आणि अनेकांनी चालवलेल्या जन आंदोलन याचा परिणाम आहे. सत्ताधारी यात सकारात्मक आहेत हे आणखी त्यात भर! सर्व काळा पैसा, भ्रष्टाचार होण्याचे कारण म्हणजे रोखीने होणारे व्यवहार. काही लोक करत असलेला भ्रष्टाचार, त्यातून संपत्तीची निर्मिती आणि काळया पैशाची साठवण यावर कठोरपणे तुम्ही कोरडे ओढत होते. सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने काळया पैसेवाल्यांची राखरांगोळी झाली. गरीबाला रोख पैसे बदलून मिळाले पण अनेक राजकारणी, भ्रष्ट अधिकारी यांची मात्र फार अवघड स्थिती झाली. यातूनही काहींनी मार्ग शोधले पण तुम्ही अपेक्षा व्यक्त केलेल्या स्वच्छ भारताला सुरुवात कुठेतरी झाली. जेव्हा देशाचा पंतप्रधान लाल किल्यावरून कचरा आणि स्वच्छतागृह याबद्दल काळजी व्यक्त करायला लागला तेव्हा देशाचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. तुम्ही राळेगणमध्ये जे स्वच्छतेचे धडे दिले, ते सगळ्या देशात लोक गिरवायला लागले याला प्रोत्साहन या सरकारकडून दिले गेले.
 

अण्णातुम्ही एके काळचे सैनिक. देशाचे सैन्य हे कुठल्या परिस्थितीत काम करते हे तुमच्या इतके कुणालाच कळणार नाही. अशा देशाच्या भूषण असलेल्या सैन्य दलाला प्रतिष्ठा याच सरकारच्या काळात मिळाली. सैन्यदलाच्या अनेक वर्षाच्या कोंडमारा 'सर्जिकल स्ट्राईक'च्या एका निर्णयाने संपला. सैन्याच्या सेनापतीला ‘सडक का गुंडा‘ म्हणणाऱ्या पक्षाच्या पार्श्वभूमीवर ‘वन रँक वन पेंशन‘ हा महत्व पूर्ण निर्णय अण्णा याच सरकारचा आहे ना? तुम्ही निश्चितच या निर्णयाने सुखावले असाल. अण्णा डिजीटल भारतच या देशातला भ्रष्टाचार कमी करू शकतो. हे तुम्ही जाणता त्या दिशेनं वाटचाल आपल्या देशाची होत आहे ही तुमच्या स्वप्नाची पूर्तीच आहे. सरकारी योजनांचा लाभ शेतकरी आणि लाभार्थी यांच्या खत्यात थेट जमा होणे ही आता दंतकथा राहिली नाही. हे सत्य आहे ना अण्णा? अण्णा मी तुम्हाला प्रथम भेटलो ते आळंदीच्या विश्व हिंदू संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी. ( १९८५ साली) तुम्ही यादव बाबा मंदिरात दोन तास माझ्या सारख्या सामान्य व्यक्ती बरोबर संवाद केला. तुमच्या त्या व्यक्तिमत्वाचा आज पर्यंत माझ्या वर प्रभाव पडला आहे. त्या आधी मला तुम्ही भेटले reader's digest मधील लेखातून. मग संघाच्या सरकार्यवाह शेषाद्रीजी यांनी ’राळेगण के कर्मयोगी‘ ही पुस्तिका लिहली. आम्ही प्रचारक बैठकीत मुद्दाम वाचली आणि आमच्या जिल्ह्यातील आहात, या एका कारणामुळे अंगावरती आमच्या मूठभर मांस अधिक चढले. तुम्ही संघाने आयोजित केलेल्या निंबवी येथील श्रमसंस्कार शिबिरात समारोपाला आल्यावर दत्तोपंत ठेंगडी यांच्या उपस्थितीत जे भाषण केले ते आजही आठवते राजकारणी आणि भ्रष्ट अधिकारी यांना लोक रस्त्यात मारतील असे भाकीत तुम्ही व्यक्त केले आणि नंतर घडलेल्या एका घटनेत "एकच मारी क्या?" ही तुमची प्रतिक्रिया तुमची निरागसता आणि उद्विग्नता दाखवत होती पण तुमचे ते भाषण ऐकणाऱ्या लोकांनां त्यात विशेष वाटले नाही. 


अण्णा, एक लोकपाल विधेयक फक्त राहिले आहे. पण एक प्रश्न माझ्या भाबड्या मनात येतो आहे. खरंच भ्रष्टाचार प्रश्न हा एका नियुक्तीमुळे सुटेल का? भ्रष्टाचार रोखण्यासाठी आज पण अनेक कायदे आणि व्यवस्था आहेत पण हे का कुचकामी ठरत आहेत? माझ्या अल्पबुध्दीप्रमाणे हा लोकपाल शेवटी ज्या समाजातून जाणार आहे त्या समाजातून भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकारणी निर्माण झाले. एक कायदा कमकुवत झाला म्हणून दुसरा कायदा याने प्रश्न सुटत नाहीत असा इतिहास असताना तुम्ही तुमचे प्राण पणाला लावावे का? तुमच्या मागील उपोषणातून एक राजकीय पक्ष आणि एक राजकीय ‘विदूषक‘ निर्माण झाला. त्याने सत्ता पण मिळवली पण तुम्ही ज्या भ्रष्ट राजकारणी मंडळी विरूद्ध प्राण पणाला लावले होते त्यांच्याच मांडीला मांडी लावून आज एकेकाळचा तुमचा शिष्य भाषण देत आहे. हे सगळे बघितल्यावर तुमचा पण कुणी तरी प्रत्येक वेळेस वापर करत आहे असे तर नाही ना? खूप दिवसापूर्वी प्रभाकर पाध्ये ह्या विचारवंतांचा एक लेख वाचला होता त्यात महापुरुषांना आम्ही कसे वापरले हे लिहिले होते त्यात मार्क्स ला लेनिन, स्टॅलिन यांनी वापरले महात्मा गांधींना काँग्रेसने वापरले आज तुमचा पण वापर तर होत नाही ना? अण्णा, तुम्ही आत्मकथन करताना युद्ध काळात सगळे बरोबरचे गेले पण तुम्ही वाचले आणि मग का वाचले याचा शोध घेताना विवेकानंदांचे खंड वाचून काढले असे सांगता. विवेकानंद यांच्या विचारातून प्रेरणा घेवून तुम्ही तुमच्या गावी पोहचला आणि कर्मयोगी बनत देशातील एक आदर्श आदरणीय व्यक्तिमत्व बनला.
 

विवेकानंद हे तुमचे प्रेरणास्थान. सांगा अण्णा आजचे देशाचे पंतप्रधान हे अधिक विवेकानंद विचाराच्या जवळ जाणारे वाटतात की पूर्वीचे? का आज जे पंतप्रधानपदाच्या रांगेत उभे आहेत ते तुम्हाला विवेकानंद यांच्या विचाराचे वाटतात? अण्णा हा लहान तोंडी मोठा घास आहे पण राहवत नाही म्हणून विचारत आहे ज्या भ्रष्टाचाराची काळजी पोटी तुम्ही उपोषण करत आहात जीव धोक्यात घालत आहात त्या भ्रष्टाचाराची तीव्रता स्वतंत्र भारतात सर्वात कमी या सरकारच्या काळात आहे असे तुम्हाला वाटत नाही का? तरुण, कामगार, शेतकरी, उद्योजक, मजदुर या सर्वांच्या आशा आकांक्षा पूर्तीकडे देशाची वाटचाल चालू असताना तुमच्यासारख्या तपस्वी व्यक्तीची देशाला गरज आहे हा देश जगद्गुरू होणे आणि तुमच्या सारख्या तपस्वीने ‘याची देही याची डोळा‘ बघणे हे आम्हा सर्वांचे स्वप्न आहे. त्यामुळे अण्णा कळकळीची विनंती नका जीव धोक्यात घालू, नका कुणाच्या आग्रहाला बळी पडू, नका उपोषण लांबवू. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुमच्या सारख्यांचा अंकुश सत्ताधारी लोकांना योग्य वळणावर ठेवू शकतो. त्यामुळे उपोषक्षमा पेक्षा संवाद मार्ग स्वीकारा. लोक आजही तुम्हाला आदर देत आहेत. तो आदर कुणी तरी उपयोगात आणत आहेत. हे बघून मन विषण्ण होते. नवीन केजरीवाल निर्माण झाला तर पुन्हा तुमचा निराशाजनक चेहरा आम्हाला बघवणार नाही.
 
 
कळावे, प्रकृतीची काळजी घ्यावी ही विनंती.
 

काही अधिक बोललो असेल तर उदार अंत:करणाने क्षमा कराल असे वाटते.
 
 
आपला,

रवींद्र मुळे

९४२२२२१५७०

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/