विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार !!!; भारत सरकारचे मोठे यश
महा एमटीबी   04-Feb-2019नवी दिल्ली : भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांच्या आरोपांवरून केंद्र सरकार ममता बॅनर्जी निशाण्यावर असताना मोदी सरकारला आणखी एक मोठे यश मिळाले आहे. कर्जबुडव्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग अखेरीस मोकळा झाला आहे. ब्रिटीश सरकारने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणास अखेर मंजूरी दिली आहे.

 

सरकारी आणि खासगी बॅंकांचे एकूण ९ हजार कोटी बुडवणाऱ्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मिळालेली मंजूरी मोदी सरकारचे मोठे यश मानले जात आहे. विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंबंधित हालचालींना गेल्या काही दिवसांपासून सुरूवात झाली होती. प्रत्यार्पणाच्या मोहीमेवरील अधिकारी सतत ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ब्रिटनच्या न्यायालयाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे १० डिसेंबर २०१८ रोजी आदेश दिले होते. त्यामुळे प्रत्यार्पणाच्या प्रक्रीयेला बळ मिळाले होते. ब्रिटनच्या गृहमंत्रालयाकडे यावर अंमलबजावणी करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ होता. त्यानुसार आता परवानगी मिळाल्यानंतर मल्ल्याचे प्रत्यार्पण यशस्वी होणार आहे. 

किंगफिशर एअरलाईन्सचा सर्वेसर्वा असलेल्या विजय मल्ल्या याने बॅंकांचे सुमारे नऊ हजार कोटी बुडवले आहे. मनी लॉंडरिंग, परकी चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन, बॅंकांची फसवणूक यासारखे मल्ल्यावर गुन्हे दाखल आहेत. सक्तवसुली संचनालयासह इतर तपास यंत्रणांनी मल्ल्या आणि किंगफिशर समूहाच्या १३ हजार कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. मात्र मालमत्ता विक्रीला प्रतिसाद न मिळाल्याने बॅंकांना कर्जवसुली करणे अशक्‍य बनले आहे. गेल्याच महिन्यात "पीएमपीएल" विशेष न्यायालयाने मल्ल्याला फरारी घोषित केले होते. वेस्टमिनिस्टर न्यायालयाने डिसेंबर रोजी मल्ल्याचे भारतात प्रत्यापर्ण करण्याचा निकाल दिला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी मल्ल्याकडे दोन आठवड्यांचा अवधी होता. भारताकडे स्वाधीन करण्याचा निकाल न्यायालयाकडून ब्रिटनचे गृहसचिव सजीद जावेद यांच्याकडे पाठवण्यात आला होता.

 
मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात विजय मल्ल्यासाठी विशेष बराक ठेवण्यात आली आहे. या ठिकाणीच त्याची चौकशी होणार असल्याचे तुरुंग प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार, स्वीस न्यायालयाने मल्ल्याची चार खाती गोठवण्यात आली आहेत.
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/