भूशास्त्रीय कालमापन
महा एमटीबी   03-Feb-2019


 

 

मागील लेखात आपण पृथ्वीच्या नकाशात कालपरत्त्वे कसा फरक पडला, याची माहिती घेतली. आता आपण ऐतिहासिक भूशास्त्राच्या दुसऱ्या एका शाखेत जाऊ व तिची माहिती घेऊ.


ज्या शाखेत आपण आता जाणार आहोत, ती भूशास्त्राची एक फार महत्त्वाची शाखा आहे. या शाखेद्वारे आपण पृथ्वीच्या इतिहासात कोणत्या वेळी कोणते प्राणी व वनस्पती अस्तित्वात होते तसेच कोणत्या काळी कोणते खडक निर्माण झाले, याचा अभ्यास करू शकतो. आता एवढ्या प्राचीन काळी अस्तित्वात असलेले सजीव आत्ताही जीवंत अवस्थेत अस्तित्वात असण्याची शक्यता फार म्हणजे फारच कमी आहे. त्यामुळे हा जो अभ्यास आपण करणार आहोत, तो असणार आहे त्यांच्या उरल्यासुरल्या अवशेषांचा, म्हणजेच जीवाश्मांचा. याच कारणामुळे या शाखेला जीवाश्मशास्त्र (Palaeontology) असे नाव पडले. जीवाश्मांचा अभ्यास म्हणजे अगदी सूक्ष्मजीवांपासून (Microorganisms) ते प्रचंड मोठ्या डायनासॉरपर्यंत कोणत्याही सजीवाच्या अवशेषांचा अभ्यास. सजीवांचे दोन प्रकार पडतात - प्राणी आणि वनस्पती. यामुळे जीवाश्मशास्त्र या शाखेचेही दोन प्रकार पडतात - जीवाश्मवनस्पतिशास्त्र (Palaeobotany) आणि जीवाश्मप्राणिशास्त्र (Palaeozoology). नावाप्रमाणेच प्रत्येक शाखेमध्ये त्या त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. या दोघींशिवाय अजून एक शाखाही आहे, जिच्यात प्राचीन कालखंडात निर्माण झालेल्या खडकांचा व त्यांच्या तयार झालेल्या संचाचा(Strata) अभ्यास केला जातो. या शाखेला 'खडकसंचशास्त्र' (Stratigraphy) असे म्हणतात. जसे आपल्या भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वाचे कालखंड झाले (पेशवाई, नंद, मौर्य, सिंधू, हडप्पा) तसेच पृथ्वीच्या इतिहासातही अनेक कालखंड झाले. हे कालखंड लक्षावधी वर्षांचे आहेत. यांची थोडक्यात माहिती घेताना आपल्याला एका ठराविक कालगणनेचाही अभ्यास करायचा आहे. या कालगणनेला 'भूशास्त्रीय कालमापन' (Geological Time Scale) असे म्हणतात. या मापनाप्रमाणे पृथ्वीच्या इतिहासाचे अनेक लहान-मोठ्या कालखंडांत वर्गीकरण करण्यात आले आहे व त्यांना योग्य ती नावे देण्यात आली आहेत. या कालखंडांची माहिती घेण्याआधी यांच्या वर्गीकरणासाठी कोणती एकके वापरण्यात आली आहेत, ते आपण पाहू.

 

पृथ्वीच्या इतिहासातील कालखंडांचे चार एककांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. या एककांना 'काल-एकक' (Time Unit) असे म्हणतात. या काल-एककांमध्ये 'इऑन' (Eon) हे एकक सर्वात मोठे आहे. ज्या कालखंडाचा कालावधी किमान एक अब्ज वर्षे आहे त्या कालखंडाला 'इऑन' असे संबोधले जाते. इऑन नंतर येतो तो 'एरा' (Era). हे एकक काहीशे दशलक्ष वर्षे कालावधी दाखवण्यासाठी वापरले जाते. एरानंतर जे एकक वापरले जाते, त्याचे नाव आहे 'पीरिएड' (Period). हे एकक खडकांमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना सहसा वापरले जाते. पीरिएडनंतर जे एकक वापरले जाते त्याचे नाव आहे 'एपोक' (Epoch). साधारणपणे खडकांच्या स्थितींमध्ये जे विविध फरक पडतात, त्या फरकांचा कालावधी एपोकमध्ये मोजला जातो. सर्वात शेवटी, कालगणनेतील लहानांत लहान एकक आहे 'युग' (Age). प्रत्येक काल-एककाशी एक 'खडक-एकक' (Rock-Unit) हे संलग्न आहे. खडक-एकक हे एका ठराविक कालखंडामधील खडकांचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. इऑन या काल-एककाशी संलग्न खडक-एककाला 'ग्रुप' (Group) असे म्हणतात. याचप्रमाणे पीरिएड या काल-एककाशी 'सिस्टिम' (System), एपोकसाठी 'सिरीज' (Series) आणि एरासाठी 'स्टेज' (Stage) ही खडक-एकके अस्तित्वात आहेत. आता आपण पृथ्वीच्या इतिहासातील विविध कालखंडांची माहिती घेऊ. सर्व कालखंडांची माहिती घेत बसणं बरंच लांबलचक व कंटाळवाणं होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपण काही ठराविक कालखंडांचीच माहिती घेऊ. सुरुवात करताना पुन्हा एकदा आपण भूतकाळातून वर्तमानकाळात येऊ. सगळी माहिती या लेखातच देणं अशक्य असल्यामुळे या लेखात आपण फक्त एकाच इऑनचा अभ्यास करूया आणि पुढील लेखात आपण उरलेल्या कालखंडांमध्ये डोकावून बघूया. जे इऑन आपण बघणार आहोत ते इऑन म्हणजे 'प्रीकँब्रियन इऑन' (Precambrian Eon).

 

'प्रीकँब्रियन इऑन' हा पृथ्वीवरचा पहिला कालखंड आहे, म्हणजेच हा कालखंड तिच्या जन्मापासून सुरू झाला आहे. पृथ्वीच्या इतिहासाचा ८० टक्क्यांपेक्षा जास्त भाग यानेच व्यापला आहे. हा कालखंड पृथ्वीच्या जन्मापासून सुरू होऊन सुमारे ५५० दशलक्ष वर्षांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होता. या काळात निर्माण झालेल्या खडकांमध्ये फारसे जीवाश्म सापडलेले नाहीत. मात्र, अगदी आत्ताच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, या कालखंडातही सजीव अस्तित्वात होते. या इऑनमध्ये तीन प्रमुख एरा येतात -

 

. हेडिअन एरा (Hadean Era) - हा एरा पृथ्वीच्या जन्मापासून सुरू होतो. या वेळी पृथ्वीवर वितळलेल्या खडकांचे समुद्र, गंधकाचे वातावरण यासारख्या गोष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. या कालखंडातील एकही जीवाश्म आजपर्यंत आढळून आलेला नाही.

 

. आरकीयन एरा (Archean Era) - हा एरा पृथ्वीच्या जन्माच्या साधारणपणे एक अब्ज वर्षानंतर सुरू झाला. या वेळेपर्यंत पृथ्वी बाहेरून बऱ्यापैकी थंड झालेली होती. तरीही पृथ्वीवर सतत ज्वालामुखीचे उद्रेक सामान्य असणार. खंडे तयार झालेली नसणार. परंतु, काही बेटे समुद्रसपाटीच्या वर आलेली असणार (ज्वालामुखीय प्रक्रिया). समुद्रात एकपेशीय सजीवांची सुरुवात झालेली असणार. आजपर्यंत सापडलेले सर्वात पुरातन जीवाश्म हे समुद्रात आढळले असून, सुमारे ३.३ अब्ज वर्षे जुने आहेत.

 

. प्रोटेरोझोईक एरा (Proterozoic Era) - हा एरा 'प्रीकँब्रियन इऑन'च्या शेवटच्या कालखंडातला आहे. हा एकटा एराच जवळजवळ दोन अब्ज वर्षांचा आहे. हा एरा सुमारे अडीच अब्ज वर्षांपूर्वी सुरू होऊन सुमारे ५५० दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. या एरामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. या एरामध्ये पृथ्वीचे अंतरंग अजून थंड झाले. परंतु, प्लेट टेक्टॉनिक्स अजूनही जोरात चालू असल्यामुळे खंडीय हालचाल सतत व आत्तापेक्षा वेगात चालू होती. या काळातच सुमारे १.७ अब्ज वर्षांपूर्वीच्या एकपेशीय सजीवांमध्ये एक वास्तविक केंद्रक (Real Nucleus) निर्माण झाले होते. याच कालखंडाच्या शेवटी म्हणजे साधारण ३० दशलक्ष वर्षे शिल्लक असताना बहुपेशीय सजीवही अस्तित्वात आल्याचे पुरावे आहेत.

 

या तीन कालखंडांना काहीजण इऑन, तर काहीजण एरा म्हणतात. कारण, हे सगळे कालखंड फार मोठे आहेत. तर, आपण पृथ्वीच्या इतिहासात जवळजवळ ५५० दशलक्ष वर्षांपर्यंत आलो आहोत. आपण बघितले की, पृथ्वीवर नुकतीच सृष्टीची सुरुवात झालेली आहे. पुढील लेखात आपण अशा कालखंडांमध्ये डोकावून बघूया. ज्यात पृथ्वीवर सृष्टीची खऱ्या अर्थाने सुरुवात व भरभराट झाली आहे.

 

संदर्भ - Engineering General Geology - Parbin Singh - Katson publishing House व http://www.cotf.edu/ete/modules/msese/earthsysflr/cambrian.html

 

- निनाद भागवत

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/