राष्ट्रसमर्पित कार्यकर्ते-बाबासाहेब कचोळे
महा एमटीबी   28-Feb-2019

 

 
 
 
आज बाबांच्या ९६ व्या स्मृतिदिनी त्यांची संघ व भा. म. संघावरील अविचल निष्ठा, स्थितप्रज्ञ वृत्ती व संघटन कौशल्य याचे स्मरण करणे औचित्याचे ठरेल!! त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरपूर्वक नमन!!
 

बाबांचा जन्म मार्च १९२३, होळी पौर्णिमेचा. त्यांचे वडील नाशिकमधील प्रसिद्ध फौजदारी वकील होते परंतु, बाबांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. बाबांचे शालेय शिक्षण तत्कालीन न्यू इंग्लिश स्कूल (आजचे रुंगठा हायस्कूल) मध्ये झाले. बालपणापासून घेतलेले संघ स्वयंसेवकाचे व्रत त्यांनी अखेरपर्यंत निभावले. बाबांच्या तरुणपणी १९३९ साली संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, यांच्या शेवटच्या आजारपणात नाशिकला उपचार व विश्रांतीसाठी असताना त्यांची सेवाशुश्रूषा करणाऱ्या स्वयंसेवक तुकडीत बाबा होते. संघाच्या तत्कालीन घोषपथकात बाबा शंखवादन करीत. १९४८ च्या संघबंदीच्या काळात बाबांना तीन महिन्यांचा तुरुंगवास सोसावा लागला आणि रेशनिंग खात्यातील नोकरीदेखील गमवावी लागली. पुढे १९५१ साली ते बँक ऑफ महाराष्ट्र लि. मध्ये कॅशियर म्हणून नोकरीस लागले. १९६० च्या दशकात बँक कर्मचारी अत्यल्प पगार आणि कामाचा प्रचंड बोजा अशा दुहेरी कात्रीत सापडला होता. त्यावेळी बँक कर्मचारी AIBEA च्या झेंड्याखाली संघटित झाले व वेतनवाढीचा लढा सुरू झाला. परंतु १९६२ च्या चीनच्या आक्रमणानंतर बँक कर्मचाऱ्यांमधील राष्ट्रवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी भा. म. संघाच्या झेंड्याखाली ‘NOBW ची स्थापना केली. ‘NOBW चा झेंडा कट्टर विरोधाला न जुमानता दृढनिश्चयाने, निवडक सहकाऱ्यांसह नाशिकमध्ये फडकविणारा पहिला सैनिक म्हणजे बाबासाहेब कचोळे.

 

पुढे १९६८ साली बाळासाहेब साठे, बाळासाहेब पालवणकर, अण्णाजी अकोटकर यांच्या सहकार्याने भा. म. संघाच्या शाखेची स्थापना केली व त्याचे कार्यालय रविवार पेठेतील तेलीगल्लीत पवार वाड्यात सुरू केले. सर्वश्री ए. पी. देशपांडे, लिमये, सुरेश जोशी यांनी एलआयसी मध्ये NOIW ची मुहूर्तमेढ रोवली. रवींद्र सहस्त्रबुद्धे यांनी ISP ऑफिसर्सच्या संघटनेला भा. म. संघाशी संलग्न करून घेतले. टेलिफोन (BSNL) एस.टी. महामंडळ व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भा.म.संघाच्या संघटना स्थापन केल्या. अशा प्रकारे खऱ्या अर्थाने भा. म. संघ नाशिकच्या इवल्याशा रोपट्याचे रूपांतर मोठ्या वृक्षात झालेले आज आपणास दिसत आहे. यामध्ये बाबासाहेब कचोळे यांचा सिंहाचा वाटा होता. बाबांचे बँकेच्या ग्राहकांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. बाबांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांच्या कार्यपद्धती व प्रामाणिकपणावर खातेदारांचा पूर्ण विश्वास होता. त्यांना त्यांचे सहकारी दगू बेळे यांची अत्यंत मोलाची साथ लाभली. नीटनेटकेपणा व शिस्त यासाठी कचोळे - बेळे ही जोडी प्रसिद्ध होती. प्रतिस्पर्धी संघटनेशी टोकाचे वैचारिक मतभेद असूनही सर्व कर्मचाऱ्यांबरोबर बाबांचे वैयक्तिक संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. सर्वांच्या सुखदुःखात बाबा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नात्याने समरस होत असत. त्यामुळे बँकेतही त्यांची ‘बाबा’ ही वडीलकीची ओळख निर्माण झाली व रूढ झाली. बँकेचे अधिकारी व व्यवस्थापन हे शत्रू नसून यंत्रणेचा एक भाग आहेत. स्वभावातील गुणदोष त्यांनादेखील लागू आहेत, आपले भांडण अथवा मतभेद त्या पदाशी आहेत, त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीशी नाहीत, याचे भान त्यांना होते. हीच शिकवण आणि धारणा भा. म. संघाची आहे, असे ते सर्वांना अभिमानाने सांगत.

 

बाबांचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न, हसतमुख आणि सर्वसमावेशक होते. त्यामुळेच त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता आणि जनसंपर्क दांडगा होता. माणसे जोडण्याची कला त्यांना उपजत अवगत होती. ‘सर्वेषाम अविरोधेन’ हा त्यांचा स्थायीभाव होता. बालमित्र, नातेवाईक, बँकेतील सहकारी, संघटनेतले कार्यकर्ते या सर्वांशी मैत्री त्यांनी अखेरपर्यंत जपली. बाबांना त्यांच्या जीवनात दादा चिटणीस, दीक्षित महाराज (पंचवटी) व मामा जोशी यांचा अनुग्रह लाभला. त्यामुळे त्यांच्या जीवनाला अध्यात्माचे अधिष्ठान मिळाले. परिणामस्वरूप सांसारिक सुखदुःखात, बँकेच्या आणि संघटनेच्या कामात मनाचा तोल ढळू न देण्याची किमया त्यांनी साधली होती. ते ईश्वरभक्त होते, पण आपल्या भक्तीचे अवडंबर, प्रदर्शन त्यांनी कधीच केले नाही. पूजापाठ, जप, तप, याचे कठोरपणे पण स्वतःपुरते पालन केले. अन्य कोणावरही अगदी आम्हा कुटुंबीयांवरही कधी सक्ती केली नाही. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडींच्या Religion and Religious faith should be practiced as strictly and personal as one's Toothbrush या तत्त्वाचे पालन त्यांनी आयुष्यभर केले. उपदेश, व्याख्यान, भाषण यापेक्षा प्रामाणिक प्रयत्न आणि प्रत्यक्ष कृती हेच त्यांच्या जीवनाचे अधिष्ठान होते. बाबांना त्यांच्या अगदी कंटकाकीर्ण नव्हे, पण खाचखळगे, चढउतार, आशा-निराशायुक्त सांसारिक जीवनात आणि सार्वजनिक कार्यात अत्यंत निष्ठापूर्वक साथ आमच्या आईने दिली. विरोधाचा एक शब्दही न काढता किंबहुना अत्यंत व्यवहारी व काटकसरीने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. प्रवासी कार्यकर्त्यांचे नेहमी येणे, मुक्काम, जेवण वगैरेंबाबत कधीच तक्रार व नाराजी व्यक्त केली नाही. बाळासाहेब पालवणकर तर तिला ‘अन्नपूर्णावहिनी’ असे म्हणत.

 

आपल्याजवळ असामान्य कर्तृत्व आहे, असा दावा त्यांनी कधीच केला नाही. त्यामुळेच कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता, ‘असू आम्ही पत्थर पायाचे’ या वृत्तीनेच त्यांनी समाजजीवनात काम केले. स्वतः कार्यकर्ता हीच ओळख त्यांनी जपली. समष्टीमध्ये स्वतःचे आयुष्य समाविष्ट केले. सामान्य कार्यकर्ताही राष्ट्रसेवेत आणि समाजकार्यात छोटे पण महत्त्वाचे योगदान देऊन आपला खारीचा वाटा उचलू शकतो, हा आदर्श बाबांनी अबोलपणे आणि कृतीतून आम्हा कुटुंबीयांपुढे आणि सर्व कार्यकर्त्यांसमोर ठेवला. हेच त्यांचे मोठेपण - हेच त्यांचे जीवनकार्य. !!

 

- आनंद (दादा) कचोळे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat