“नानाजी देशमुख हे राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Feb-2019
Total Views |
 


मुंबई : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख, ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना ’भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल विधानसभेमध्ये त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा ठराव बुधवारी एकमताने संमत करण्यात आला. सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून या तिघांच्याही कार्याला अभिवादन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील ठराव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सार्वजनिक बांधकाम व आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सदस्य गणपतराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बसवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त करीत या तिघांच्याही कार्याचा गौरव केला.

 

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले, “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे कुशल प्रशासक होते. राष्ट्रपतीपद भूषवताना त्यांनी देशाची शान आणि मान उंचावली. गेल्या पन्नासहून अधिक वर्षांच्या कालावधीतील महत्त्वपूर्ण घटना देशाच्या वाटचालीवर दूरगामी परिणाम करणार्‍या ठरल्या. त्यांचे साक्षीदार प्रणव मुखर्जी होते.” त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव देशातील सर्वोच्च पुरस्कार देऊन करण्यात आल्याची भावनाही बागडे यांनी यावेळी व्यक्त केली. ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख हे लोकनेते होते. जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेले नानाजी आदर्श राजकारणी म्हणून सर्वपरिचित होते. त्यांनी सदैव देशाच्या हिताचा आणि समाजाच्या भल्याचा विचार केला. यावेळी बागडे यांनी नानाजी देशमुख यांच्या औरंगाबाद दौर्‍यातील आठवणी सांगितल्या. “ईशान्य भारताचा सांस्कृतिक चेहरा म्हणून भूपेन हजारिका ओळखले जायचे. त्यांचे कार्य प्रेरणा देणारे होते,” असे गौरवोद्गार बागडे यांनी यावेळी काढले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, “देशाच्या राजकारणात संकटमोचक म्हणून प्रणव मुखर्जी यांनी आपली भूमिका सदैव पार पाडली. देशाचा ग्रामीण भाग समृद्ध करण्याचे काम प्रणवदांनी केले. आजही वित्त आयोगामध्ये गाडगीळ-मुखर्जी फॉर्म्युल्याचा वापर केला जातो.” भारतीय अर्थव्यवस्था व राष्ट्रनिर्माण यावर त्यांनी केलेले लिखाण आजही प्रेरक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. प्रणव मुखर्जी वडीलधारी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असल्याची भावनादेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्याचे सांगत राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवन लोकाभिमुख करण्याचे काम केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. “प्रणवदांच्या माध्यमातून एक उचित व्यक्तिमत्त्व देशाला लाभले म्हणून त्यांना सर्वोच्च बहुमान बहाल केला गेला,” असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “भारतीय राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून नानाजींची ओळख आहे. व्रतस्थपणे राजकारण, समाजकारण करीत वेगळी संस्कृती त्यांनी निर्माण केली. आणीबाणीनंतर देशामध्ये विरोधकांना एकत्रित करण्याचं काम नानाजींनी केलं. त्यांनी जयप्रकाश नारायण व इतर समाजवादी नेत्यांना एकत्र आणलं. मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यानंतर, त्यांनी नानाजी देशमुख यांना भारत सरकारमध्ये मंत्री होण्यासाठी निमंत्रित केलं. मात्र, त्यास नानाजी यांनी स्पष्ट नकार दिला. त्यांनी दीनदयाळ शोध संस्थान ही संस्था स्थापन केली. ग्रामविज्ञान आणि त्यातून ग्रामविकास या विषयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात संशोधन केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था तयार करण्याचं मॉडेल बनविण्याचं काम सुरू केलं. उत्तर प्रदेशमध्ये नानाजी यांच्या माध्यमातून मोठं कार्य उभं राहिलं. मध्य प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यात ८० दुर्गम, पहाडी गावांमधील जनतेला विविध प्रकल्पांच्या माध्यमातून आत्मनिर्भर व उद्योगशील बनवण्यावर मुख्य लक्ष केंद्रित केले. आजही अव्याहतपणे हे काम सुरू आहे. चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येकाच्या शेताला पाणी हा त्यांनी चालविलेल्या उपक्रमांचा उद्देश होता, असेही फडणवीस यावेळी सांगितले. भूपेन हजारिका यांच्या कार्याबद्दल मुख्यमंत्री म्हणाले, “अभिजात संगीतासह ईशान्य भारताला उर्वरित भारताशी सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्यासाठी अथक प्रयत्न करणार्‍या श्रेष्ठ संगीतकार भूपेन हजारिका या राष्ट्रभक्ताचा गौरव आहे. पूर्व भारताचा एक परिपूर्ण सांस्कृतिक चेहरा अशी त्यांची सार्थ ओळख होती.” यावेळी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, बसवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

विधान परिषदेकडूनही गौरव

भारतरत्नप्राप्त या तीन व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव विधान परिषदेतही करण्यात आला. सभागृह नेते तथा महसूलमंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य डॉ. नीलम गोर्‍हे, सदस्य शरद रणपिसे, हेमंत टकले यांनी आपल्या भावना व्यक्त करीत या प्रस्तावास पाठिंबा दिला. विधान परिषदेत हा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
@@AUTHORINFO_V1@@