साक्षरतेची सावली
महा एमटीबी   27-Feb-2019

 


 
 
 
साक्षरतेची सावली देणाऱ्या झाडाबद्दल तुम्ही ऐकलं आहे का? नाही ? अहो, आम्ही ते झाड पाहिलं आहे. आज त्याच झाडाची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत... ‘प्रारंभ युवापर्व’
 

८ ऑक्टोबर, २०१५ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावर म्हणजेच किल्ले शिवनेरीवरून या संस्थेचे संस्थापक आनंद कदम यांनी आपल्या मित्रमंडळींसोबत समाजातील गरजूंसाठी आपले भरीव कार्य सुरू करायचे आणि ते अविरतपणे चालू ठेवायचे, असा निश्चय केला. मग त्याच दिवशी तेथून जवळच असलेल्या राळेगणसिद्धीला जाऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आशीर्वाद घेतला आणि पुढच्या वाटचालीला सुरुवात केली.

 

आज आपण प्रगतीच्या दौडीत अव्वल येण्यासाठी सगळेच धडपड करतो पण, बऱ्याच ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे, या हेतूने नोव्हेंबर २०१६ ला सातारा जिल्ह्यामधील पाटण तालुक्यातील सळवे गावातील विद्यार्थ्यांना ‘मोफत वह्यावाटप’ हा कार्यक्रम संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत २५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटल्या. गावातील शाळांमध्ये मुलांना प्रकल्पासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढायच्या असतील, तर जवळपास १५ ते २० किलोमीटर लांब अंतरावर असणाऱ्या ढेबेवाडी बाजारतळावर जावे लागत होते. हे लक्षात घेऊन पाटण तालुक्यातील सळवे, वारपेवाडी आणि वाल्मिकी पठार येथील शाळांमध्ये लेझर प्रिंटर बसविण्याचा स्तुत्य उपक्रम या संस्थेने राबवला तसेच, तीन वर्षे पाटण भागातील बऱ्याच शाळांमध्ये शालेय साधनसामग्रीचा वाटप करण्यात येत आहे. संस्थेने हे कार्य फक्त ग्रामीण भागापुरते मर्यादित ठेवले नाही. १२ नोव्हेंबर, २०१७ रोजी ‘आमचं घर’ या भाईंदर येथील अनाथाश्रमाला भेट देऊन तेथेही शालेय सामग्रीचेवाटप केले.

 
या वर्षी थंडीचा जोर जास्त असल्यामुळे थंडीचा अधिक त्रास फुटपाथवर झोपणाऱ्या बेघर बांधवांना होतो हे लक्षात घेऊन, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकांजवळ फुटपाथ तसेच उघड्यावर झोपणाऱ्या गोरगरीब लोकांना संस्थेच्यावतीने चादर व ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. इथे नमूद करायला अभिमान वाटतोय की, ब्लँकेट वाटपाचा हा उपक्रम संस्थेला माझा स्वत:चा उपक्रम ‘प्रोजेक्ट वॉर्म विशेष’च्या फेसबुक पोस्ट माध्यमातून सुचला आणि यासाठी संस्थापक आनंद कदम यांनी प्रेरणाकेंद्र म्हणून माझे नाव आपल्या मनोगतात आवर्जून नमूद केले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारी, २०१९ ला युवकांना ‘स्वच्छ भारत प्रेरणा’ मिळावी आणि पर्यावरण संरक्षणाची जाणीव व्हावी यासाठी ‘प्लाटिक मुक्त चौपाटी’साठी दादरच्या ‘जय फाऊंडेशन’अंतर्गत ‘जय शृंगारपुरे’ यांच्या नेतृत्वाखाली आणि ‘प्रारंभ युवापर्व’ यांच्या संयुक्त परिश्रमाने दादर चौपाटीवर साफ-सफाई अभियान राबविण्यात आले. चौपाटीवरील सर्व कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. तसेच तरुणांमार्फत ‘प्लास्टिकचा वापर टाळा’ या विषयावर खास जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असताना अनेक अडचणी आल्या, पण त्यातून आपोआप मार्गही निघत राहिले, कोणताही कार्यक्रम करायचा असला की, निधी जसा लागला तशीच चांगल्या मित्रांची साथ आणि समाजासाठी काही तरी केले पाहिजे, ही जाणीव असलेल्या लोकांची मदत मिळाली. त्यामुळे कार्य करणे सोपे होत गेले. सदर संस्थेला शासनाच्या विनाअनुदानित तत्त्वावर नोंदणी मिळालेली आहे, पण सगळ्या उपक्रमासाठी लागणारे भांडवल हे खाजगी माध्यमातून आणि संस्थेला येणाऱ्या निधीतून गोळा केले जाते, अशी माहिती मला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
 

मग मी माझा आवडता प्रश्न संस्थापक आनंद कदम यांना न चुकता विचारला. “एकंदरीत कार्यरत असताना असा कोणता प्रसंग तुम्हाला खूप हॅप्पीवाली फिलिंग देऊन गेला?” यावर त्यांनी उत्तर दिले, “एकंदरीत समाजसेवेचे कार्य म्हणजेच हे मोठी हॅप्पीवाली फिलिंग आहे. पण प्रसंगच सांगायचा झाला, तर शालोपयोगी सामग्री वाटताना मुलांच्या चेहऱ्यावर खुलणारे हसू आणि डोळ्यात दिसणारे तेज म्हणजेच माझी हॅप्पीवाली फिलिंग.” एकंदरीत ‘प्रारंभ युवापर्वा’च्या कार्याला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सलाम... पुढील काळात यांच्या या कार्यात अजून मदतीचे हात येतील. मग या झाडाचे रूपांतर वटवृक्षात होईल आणि याच्या सावलीखाली भावी तरुण पिढी साक्षरतेचे धडे गिरवतील याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला पण या सावलीत एखाद्या फांदीचे योगदान द्यायचे असेल, म्हणजेच काही मदत करायची असेल, तर नक्की संपर्क साधा.

 

- विजय माने

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat