काय सांगो आता संतांचे उपकार
महा एमटीबी   27-Feb-2019गजानन महाराज व रामदास स्वामी दोघेही समर्थ! समर्थांचं सामर्थ्य आणि गजानन महाराजांचं संतत्व याची तुलना करणं योग्य नाही. दोघांनीही आपापल्या कार्यामुळे भक्तांच्या हृदयात स्थान प्राप्त केले. एक विदर्भातले, तर दुसरे पश्चिम महाराष्ट्रातले, नाशिक, टाकळी, चाफळ, सज्जनगड अशा क्षेत्रातले. एक योग्यांचा मुकुटमणी, तर दुसरे आचार्य परंपरेतले होते. या दोघांमुळे माघ मासाला महत्त्व प्राप्त झाले.

 

माघ मास अनेक गोष्टींमुळे स्मरणात राहतो. माघ मासामध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज प्रगट झाले. शेकडो भक्तांच्या उद्धारासाठी भूवरी अवतरले. या महान योगिराणाने पशु-पक्षी, प्राणी यांचादेखील उद्धार केला. प्राणी, पक्षी यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती गजानन महाराजांच्या ठायी होती. शेगावनगरी संपूर्ण जगतामध्ये यांच्या समाधीस्थानामुळे विख्यात झाली. त्यांचं पुण्यपावन स्मरण करून जीवन आनंदामध्ये व्यतीत करणारे खूप भक्त आहेत. संतांवर पूर्ण श्रद्धा असली की, त्याची प्रचिती हमखास येते. देहात असताना गजानन महाराज ज्यांना कळले नाहीत, ते लोक दुर्दैवी म्हणावे लागतील. त्यांच्या बाह्यगोष्टी वेगळ्या व त्यांच्यातील अलौकिक गोष्टी वेगळ्या! दिगंबर अवस्थेत वावरत असलेले महाराज मुक्तावस्थेतील श्रेष्ठ योगी होते. लौकिक व पारलौकिक गोष्टींचा मेळ घालणं कठीण! त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी हे संत व आचार्य होते. स्वराज्य निर्मितीस साहाय्य करणारे रामदास स्वामी उत्तम आचार्य होते. शेकडो मठ, महंत, शिष्य लाभलेले समर्थ सज्जनगडावर समाधिस्त झाले. आपला लाडका शिष्य कल्याणाला देह ठेवल्यावरदेखील समाधीतून बाहेर येऊन दर्शन देणारे रामदास स्वामी. दासनवमीच्या मुहूर्तावर रामदासांनी कायम विश्रांती घेणे पसंत केले. माघ कृष्ण नवमीला त्यांनी आपले अवतार कार्य समाप्त केले.

 

तसं म्हटलं, तर गजानन महाराज व रामदास स्वामी दोघेही समर्थ! समर्थांचं सामर्थ्य आणि गजानन महाराजांचं संतत्व याची तुलना करणं योग्य नाही. दोघांनीही आपापल्या कार्यामुळे भक्तांच्या हृदयात स्थान प्राप्त केले. एक विदर्भातले, तर दुसरे पश्चिम महाराष्ट्रातले, नाशिक, टाकळी, चाफळ, सज्जनगड अशा क्षेत्रातले. एक योग्यांचा मुकुटमणी, तर दुसरे आचार्य परंपरेतले होते. या दोघांमुळे माघ मासाला महत्त्व प्राप्त झाले. माघ कृष्ण सप्तमीला शेगावला उष्ट्या पत्रावळीतील अन्न खात श्री गजानन महाराज प्रगट झाले. रामदास स्वामी माघ कृष्ण नवमीला सज्जनगडावर समाधीस्त झाले. गजानन महाराजांनी स्वराज्याचा सिंह बाळ गंगाधर टिळकांना भाकरीचा प्रसाद देऊन ‘गीतारहस्य’ ग्रंथाद्वारे अजरामर केले. समर्थ रामदासांनी शिवाजीराजांना शक्तिसंपन्न करून, छत्रपती करून अजरामर केले. प्रत्येक संतांचं कार्य वेगवेगळं असतं. कोणतं कार्य करायचं आणि केव्हा करायचं, हे आधीच ठरलेलं असतं. त्यानुसार संत प्रगटही होतात आणि समाधीस्तही होतात. स्थळ, काळाची, कार्याची योजना अदृश्य सृष्टीमध्ये व्यवस्थित आखलेली असते. आपण दृश्य जगतामध्ये रमणारे असल्यामुळे आपल्याला या योजनांचे आकलन होत नाहीत. आपल्या देशाची भूमी देवभूमी आहे. त्याचप्रमाणे संतांची पवित्र भूमी आहे. संतांच्या बाह्यगोष्टी वेगळ्या वाटल्या तरी, आंतरिक सूत्र एकच असतं. मायेच्या अधीन झालेल्या जीवांना मायेमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं हे त्यांचं काम असतं. संतांच्या चरणी शुद्ध भाव ठेवला, तर आपल्याला त्यांचं महत्त्व कळतं. मायेमधून बाहेर काढून प्रेमानं न्हाऊमाखू घालणार्‍या संतांचं मोठं कौतुक वाटतं.


कैसी माता कैसा पिता,

कैसी बहीण कैसा भ्राता ।

हे तू जाण मायेची,

अवघेचि सोयरे सुखाची ॥

 

सगळे सुखाचे सांगाती आहे. संत प्रेमानं, कौतुकानं लोकांना सांगत असतात.

 

प्रकट ते जाणावे असार,

गुप्त ते जाणावे सार ।

गुरुमुखे हा विचार, उमजो लागे ॥

 

संत समर्थ रामदास स्वामी व संत गजानन महाराज हे शेकडो लोकांचे गुरू आहेत. त्यांच्या चरित्रातून, ग्रंथांतून, पारायणांतून प्रकट असार असून गुप्त सार आहे हे जाणून घेण्याची बुद्धी प्राप्त होते.

संत कबीर म्हणतात

मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम राम का ।

सामान्य लोकांची स्थिती कशी असते तर

 

मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम ‘मन’ का ।म्हणूनच सदैव संतांचे चरण घट्ट धरून ठेवायचे. म्हणजे मनाचे गुलाम होण्यापासून ते वाचवतात.

संतचरण रज लागता सहज ।

वासनेचे बीज जळोन जाय ।

 

संतचरण हे शक्तिसंपन्न असतात. त्यामुळे वासनेचं बीज जळून जातं. संत सांगतात की, मन, मेंदू, मनगट, बळकट असेल तोच खरा उपासक, साधक होय. संत प्रचितीचे सांगतात. स्वत: अनुभव घेऊन मग लोकांना उपदेश करतात. संतांच्या ठायी बोधामृताचा कुंभ काठोकाठ भरलेला असतो. त्यांच्या कृपेच्या वर्षावात चिंब भिजण्याची इच्छा असेल त्यांनी मनापासून नित्य स्मरण करावं. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून व्यवस्थित वाटचाल होण्यासाठी तर संतांचे ‘प्रगट दिन’ आणि ‘निर्वाण दिन’ साजरे करायचे. भजनाचा, नामाचा गजर करून त्यांना प्रसन्न करायचं. प्रत्येक जीवाचं सार्थक करण्यासाठी संत आतूर असतात. अशा या आत्मबोधाच्या प्रकाशानं उजळलेल्या संतांविषयी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात

 

काय सांगो आता संतांचे उपकार ।

मज निरंतर जागावेती ॥

काय द्यावें त्यांसी व्हावें उतराई ।

ठेवितां हा पायी जीव थोडा ॥

सहज बोलणे हित उपदेश ।

करुनि सायास शिकविती ॥

तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती ।

तैसे मज येती सांभाळीत ॥

 

अत्यंत प्रेमळ संत आपल्याला क्षणोक्षणी सांभाळत, सावरत असतात. त्यांचे अनंत उपकार आहेत. त्यांच्याप्रति कृतज्ञ भाव ठेवून राहणे केव्हाही हिताचे ठरते.

 
 
-  कौमुदी गोडबोले 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat