अंध असूनही देशसेवेचे व्रत...
महा एमटीबी   27-Feb-2019

 


 
 
 
आपली दृष्टी नाही म्हणून रडत न बसता, प्रचंड मेहनत घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करुन देशातील पहिले अंध आयएएस अधिकारी ठरलेल्या कृष्णगोपाल तिवारी यांचा परिचय करुन देणारा हा लेख...
 

परिस्थिती कशीही असो, आपल्याला फक्त त्या परिस्थितीवर मात करता आली पाहिजे, हे सुवचन आपण अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ येते त्यावेळी आपली पळता भुई थोडी होऊन जाते. काही अपवादात्मक आणि जिद्दी लोक असतात, जे या बिकट परिस्थितीवर मात करतात. फक्त मनात जिद्द आणि जिंकण्याची इच्छाशक्ती असायला हवी. मग परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीवर मात नक्कीच करता येते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आजच्या आपल्या ‘माणसं’ या सदरामध्ये पाहणार आहोत. या माणसाचं नाव आहे कृष्णगोपाल तिवारी. एखादी अंध व्यक्ती जिल्हाधिकारीपदापर्यंत पोहोचू शकते, ही एरवी कल्पनाही कोणी करणार नाही. मात्र, कृष्णगोपाल यांनी प्रचंड मेहनत व जिद्दीने हे ध्येय कृतीत आणले.

 

कृष्णगोपाल तिवारी हे मूळचे उत्तर प्रदेश जिल्ह्यातील आंबेडकर नगर जिल्ह्यातील रहिवासी. ते शेतकरी कुटुंबातील असून आजही त्यांचे आईवडील शेती करतात. आईवडिलांची केवळ दोन एकर शेती असल्याने त्यांच्या घरची आर्थिक परिस्थितीही तशी हलाखीची. अशातच त्यांच्या तीन भावांना वयाच्या दहाव्या वर्षापासून दृष्टी कमी होण्याचा आजार जडला. त्यांनाही या आजाराने घेरलं आणि बारावीचे शिक्षण घेत असताना वयाच्या १८ व्या वर्षी त्यांची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली. पण, आपली दृष्टी नाही म्हणून ते रडत बसले नाहीत. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. पुढील शिक्षण पूर्ण केलं आणि आज ते देशातील पहिले अंध आयएएस अधिकारी म्हणून गणले जातात. इथपर्यंतचा त्यांचा प्रवास मुळीच सोप्पा नव्हता. आपल्याला दृष्टी असूनही कित्येक अडचणींचा सामना करावा लागतो, तर विचार करा, कृष्णगोपाल हे अंध असल्याने कित्येक अडचणींना ते किती मनोधैर्याने सामोरे गेले असतील. ‘जिनमें अकेले चलने के हौंसलें होते हैं, एक दिन उनके पीछे ही काफिले होते हैं।’ या पंक्तीनुसार त्यांनी जगाला दाखवून दिलं की, ‘अंध असलो म्हणून काय झालं? इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो.’

 

कृष्णगोपाल यांनी आपलं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सरकारी शाळेत पूर्ण केलं. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर येथून व पदव्युत्तर शिक्षण छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी, कानपूर येथून पूर्ण केले. शिक्षण घेत असताना त्यांनी सुरुवातीच्या काळात लेखनिकाच्या मदतीने अभ्यास सुरू केला. हा रायटर त्यांना वाचवून दाखवायचा आणि ते ऐकून परीक्षांची तयारी करायचे. राईटरचा खर्च परवडत नसल्याने त्यांनी टेप रेकॉर्डरच्या माध्यमातून आपला अभ्यास सुरू ठेवला. ते दोन वेळा युपीएससीच्या परीक्षेत नापास झाले. मात्र, तिसऱ्या वेळी त्यांनी आपले लक्ष्य गाठले. २००८ साली वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी ते युपीएससीच्या परीक्षेत देशात १४२ वे आले होते, तर दिव्यांग श्रेणीतून देशात पहिले आले. यानंतर पुढील प्रशिक्षण त्यांनी डेहराडून येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर व्हिज्युअली हॅण्डीकॅप’ या संस्थेतून घेतले. येथून प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मध्यप्रदेशमध्ये प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहायला सुरुवात केली. दिव्यांग असल्याने त्यांच्या समस्या संपणाऱ्या नव्हत्या, तरीदेखील ते आपल्या समस्यांचा आणि कमजोरीचा बाऊ न करता दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडत आहेत.

 

कृष्णगोपाल सांगतात की, “मी निकुंज श्रीवास्तव यांच्यासोबत प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होतो. मी दिव्यांग असल्याने माझ्यावर कोणत्याही प्रकारची मेहरबानी करू नका, असे मी त्यांना स्पष्ट सांगितले होते. त्यांनी माझ्या विनंतीचा मान राखत माझ्याकडून सर्वप्रकारची कामे करून घेतली. याचमुळे मी दृष्टी नसतानाही चोर व अवैध वाहने पकडण्यात यशस्वी झालो.” कृष्णगोपाल यांना भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचंड चीड आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल ४० पेक्षा जास्त अधिकार्‍यांवर सरकारी योजनांत भ्रष्टाचार केल्याने तक्रारी दाखल केल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांना स्वत:वर गर्व कधी होतो, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सांगितले की, “ज्या व्यक्तीला कोणीही वाली नसतो किंवा त्या व्यक्तीचं कोणीही काम करत नाही, त्या अशा व्यक्तीचं जेव्हा मी काम करतो, त्यावेळी मला स्वत:वर गर्व वाटतो व काम केल्याचा मला आनंद मिळतो.” कृष्णगोपाल ज्यावेळी स्पर्धा परीक्षा देत होते, त्यावेळी त्यांच्यासमोर दिव्यांगांमधून कोणीही आदर्श नव्हता. मात्र, त्यांचा आदर्श समोर ठेवून हजारो विद्यार्थी आपल्यातल्या उणीवांचा बाऊ न करता कृष्णगोपाल यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat