कुष्ठरोग रोखण्यासाठी !
महा एमटीबी   25-Feb-2019
 


दरवर्षी जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार जगभर ‘कुष्ठरोग निवारण दिवस’ पाळण्याची कल्पना फ्रान्समधील सामाजिक कार्यकर्ते व लेखक राऊल फोलेरेऊ यांची आहे. ३० जानेवारीला कुष्ठरुग्णांची सेवा करणाऱ्या महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि हुतात्मा दिन असल्याकारणाने भारतात या दिवशी ‘कुष्ठरोग निवारण दिन’ म्हणून पाळला जातो.

 

कुष्ठरोगजशी वैयक्तिक आरोग्य समस्या आहे, तशी ती सार्वजनिक आरोग्य समस्याही आहे. २०१६ मध्ये भारतात दर दहा लाख लोकसंख्येत कुष्ठरोगाचे ६६ रुग्ण होते. कोणत्याही वयोगटात होऊ शकणारा हा आजार पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. गरिबी, अज्ञान, निरक्षरता, गर्दी, अस्वच्छता, निकृष्ट राहणीमान इ. सामाजिक घटक हा संसर्ग पसरण्यास हातभार लावतात. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने २०२० पर्यंत कुष्ठरोगाला जगातून हद्दपार करण्याचे ठरवले आहे. कुष्ठरोग रोखण्यासाठी सामाजिक वातावरण तयार करणे आणि समाजातील त्या आजारासंबंधी अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी दरवर्षी ‘३० जानेवारी’ हा ‘कुष्ठरोग निवारण दिन’ म्हणून पाळला जातो.

 

कुष्ठरोगाचा प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी ‘राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम’ प्रभावीपणे राबवल्यामुळे ही आरोग्य समस्या पूर्वीसारखी गंभीर राहिली नाही. लोकांचा आणि विविध विभागांचा सहभाग लाभल्यामुळे या आरोग्य समस्येचे स्वरूप बरेच सौम्य झाले आहे. हे या कार्यक्रमाचे यश आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य शिक्षण अत्यंत प्रभावी झाल्याने कुष्ठरोग इतर आजारांप्रमाणे संसर्गजन्य आहे, ही बाब जनमनात रुजवण्यात यश आले आहे. परिणामी, आजार लपवण्याची प्रवृत्ती कमी होऊन प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण स्वेच्छेने दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत. या सकारात्मक परिणामामुळे व्यंग निर्माण होण्याचे प्रमाण कमी आणि आजाराविषयीच्या गैरसमजातून निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये मोठी घट झाली आहे. त्वरीत निदान आणि नियमित औषधोपचाराने आजार लवकर बरा होतो आणि विकृती टाळता येते, ही बाब समाजमनात स्थिर होत आहे. त्वचेवरील बधीर चट्टा कुष्ठरोगाचा असू शकतो, याबाबत लोकांमध्ये पुरेशा प्रमाणात जागृती झालेली पाहायला मिळते. परंतु, अजून मोठा पल्ला गाठायचा बाकी असल्याकारणाने गाफील राहून चालणार नाही.

 

मायक्रोबॅक्टेरियम लेप्रीकुष्ठजंतूंच्या संसर्गापुढे उद्भवणारा त्वचा आणि मज्जातंतूंंचा आजार म्हणजेच ‘कुष्ठरोग’ होय. पूर्वी या आजारावर उपचार नव्हता. त्यामुळे रुग्णामध्ये गंभीर स्वरूपाच्या विकृती उद्भवत. म्हणून या आजाराला ‘महारोग’ संबोधले जायचे. परंतु, आता रामबाण आणि प्रभावी उपचार उपलब्ध असून नियमित आणि पूर्ण औषधोपचाराने आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. हा आजार इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणे सामान्य आहे. नॉर्वेच्या डॉ. हॅन्सन यांनी १८७३ साली कुष्ठजंतूंचा शोध लावला. म्हणून वैद्यकीय क्षेत्रात या आजाराला ‘महारोग’ अथवा ‘कुष्ठरोग’ अशा भीतीदायक नावाने न संबोधता ‘हॅन्सन्स आजार’ अशा सौम्य नावानं ओळखलं जातं.

 

हे जंतू सांसर्गिक प्रकारच्या कुष्ठरुग्णांच्या शरीरात जास्त प्रमाणात आढळतात. उपचार घेत नसलेल्या सांसर्गिक कुष्ठरुग्णांच्या शिंक अथवा खोकल्यातून (तुषारबिंदूतून) जंतू बाहेर पडतात. जंतू काही काळ वातावरणात जीवंतही राहू शकतात. अशा रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्ग जडण्याचा धोका असतो. संसर्गक्षम कुष्ठरुग्णाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष श्वासावाटे स्पर्श झाल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. संसर्गबाधित आईकडून दुधावाटे बाळाकडे संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. जंतूंनी शरीरात प्रवेश केलेल्या साऱ्या लोकांना आजार होत नाही. आजार होणं, हे त्या त्या व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतं. ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी त्याला आजार जडण्याची शक्यता अधिक असते. जंतू शरीरात हळूहळू वाढतात. म्हणून संसर्ग झाल्यानंतर जवळपास तीन ते पाच वर्षांनी आजाराची लक्षणे दिसू लागतात. जंतू मज्जातंतूंवर हल्ला चढवतात. त्यांना इजा पोहोचवतात. त्यामुळे व्यंग उद्भवते. स्नायू, हाडे, अंडकोष आणि अंतर्गत अवयवांवरदेखील संसर्गाचा परिणाम होतो.

 

कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत. असांसर्गिक (अल्पजीवाणू) आणि सांसर्गिक (बहुजीवाणू) जवळपास ८५ ते ९० टक्के रुग्ण असांसर्गिक, तर उरलेले १० ते १५ टक्के सांसर्गिक स्वरूपाचे असतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास असांसर्गिक प्रकारच्या रुग्णाच्या शरीरावर कुठेतरी संख्येने एक ते पाच पांढरट अथवा थोडे लालसर चट्टे उमटतात. या चट्ट्यांवर घाम येत नाही. त्यावरील केस गळतात. तेथे खाज येत नाही. चट्ट्यांवर टोचले असता समजत नाही. म्हणजेच बधिरता येते. मज्जातंतू बाधित झाल्याने असे होते. मज्जातंतू जाड होतात आणि ठणकतात. लवकरात लवकर निदान आणि उपचार सुरू झाला, नाहीतर व्यंग उद्भवण्याचा धोका असतो. सांसर्गिक प्रकारच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्यांच्या शरीरावर सहा किंवा अधिक चट्टे उमटतात. चट्टे लालसर, तेलकट आणि चकाकतात. काही रुग्णांचा चेहरा लालसर, तेलकट आणि जाडसर दिसतो. कानांच्या पाळ्या लोंबतात. लहान गाठी उठतात. भुवयांचे केस विरळ होतात. अशा रुग्णांच्या त्वचेचे जंतूपरीक्षण केले असता त्यात असंख्य कुष्ठजंतू आढळतात. या प्रकारात काही मज्जातंतू बाधित होतात. ते जाड होतात आणि ठणकतात, पण जरा उशिरा. म्हणून शारीरिक व्यंग उशिरा उद्भवते. असे रुग्ण ओळखायला अवघड जाते. सदर रुग्ण लोकांमध्ये सहज मिसळतात. त्यामुळे अनेकांना संसर्ग देत राहतात. आजाराच्या नियंत्रणासाठी असे रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर त्वरीत उपचार करणे आवश्यक आहे. काही रुग्णांच्या बाबतीत त्वचेच्या नमुन्यात कुष्ठजंतू शोधून निदानाची खात्री करावी लागते. मात्र, बहुतेक रुग्णांचे निदान त्वचा आणि मज्जातंतूंसंबंधी लक्षणे आणि चिन्हांच्या आधारे केले जाते. बऱ्याचदा औषधोपचार सुरू करण्यासाठी त्वचेच्या नमुन्याची तपासणी करण्याची गरज नसते.

 

कुष्ठजंतूंचा शोध १८७३ साली लागला असला तरी, त्यावरील औषध, ‘डॅप्सोन’ १९४० साली उपलब्ध झाले. त्या आजारावरील औषधांसाठी अनेक वर्षे संशोधन सुरू होते. दरम्यानच्या काळात अनेक प्रभावी औषधे उपलब्ध झाली. परंतु, उपचाराचा दीर्घ कालावधी आणि उपचारातली अनियमितता, यामुळे आजारावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. १९८२ साली जागतिक आरोग्य संघटनेने बहुविध औषधोपचार (मल्टिड्रग थेरपी) पद्धतीची शिफारस केली. ही एक क्रांतिकारी घटना ठरली. तेव्हापासून हा आजार रोखणे शक्य असल्याची खात्री वाटू लागली. या थेरपीमध्ये असणाऱ्या प्रभावी, परिणामकारक आणि जंतूसंहारक औषधांमुळे कुष्ठरोगावर उपचार करणं सोपं झालं. या उपचार पद्धतीचा कुष्ठरुग्णांनी स्वीकार केला. कुष्ठरोग लवकर आणि निश्चित बरा होतो, अशी खात्री झाली. या उपचार पद्धतीमुळे संसर्गसाखळी नष्ट होऊन इतरांचा संसर्गापासून बचाव झाला. या घडामोडींमुळे आजाराचे दुरीकरण दृष्टिपथात आले.

 

बहुविध औषधोपचार पद्धतीनुसार असांसर्गिक रुग्णांना ‘रिफामायसिन’ आणि ‘डॅप्सोन’ ही दोन औषधे सहा महिने, तर सांसर्गिक रुग्णांना ‘रिफामायसिन,’ ‘क्लोफॅझिमिन’ आणि ‘डॅप्सोन’ ही तीन औषधे १२ महिने योग्य प्रमाणात वेळापत्रकानुसार दिली जातात. या औषधोपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो आणि विकृती टाळता येते. सदर औषधोपचार सार्वजनिक दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहे. सर्वेक्षण, आरोग्य शिक्षण, बहुविध औषधोपचार, विकृती प्रतिबंध, काळजी आणि कुष्ठरोगमुक्त रुग्णांचे पुनर्वसन करून हा आजार सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न उरणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदर व्यूहरचना आणि कार्यपद्धतीमुळे आजाराचे दुरीकरण दूर नाही. तसेच आजारासंबंधी शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींना आळा घालणे, आरोग्यशिक्षण, लोकांचा प्रत्यक्ष सहभाग इ. बाबीदेखील कुष्ठरोग निर्मूलनासाठी फार महत्त्वाच्या आहेत. या आजाराची साधी शंका जरी आली तरी, डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जरुरीचे आहे. वेळीच उपचारानं गुंतागुंती आणि विकृती टाळता येतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा आजार लपवून ठेवणं फार धोक्याचं आहे.

 

कुष्ठरुग्णांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलायला हवा. या आजारांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी लस तयार करण्यासाठी संशोधक झटत आहेत. कुष्ठजंतूंचा शोध लागला तेव्हा एका रोगजंतूंशी निगडित झालेला कुष्ठरोग हा पहिलाच मानवी आजार ठरला. मज्जातंतूंमध्ये वाढणारा हा एकमेव जीवाणू आहे. संसर्गामुळे मज्जातंतू हळूहळू नष्ट होऊन संवेदना कमी होऊन बधिरपणा येतो. संवेदना नसल्याने बधिर भागावर जखमा होतात, जखमा दुर्लक्षित राहतात. बऱ्याच कालावधीपर्यंत उपचार न मिळाल्यास हातापायाची बोटे झडतात.

 

‘असांसर्गिक’ म्हणजेच ‘ट्युबरक्युलॉइड’ प्रकारच्या आजाराचे निदान चट्ट्यांवरील बधिरता तपासून, तर ‘सांसर्गिक’ म्हणजेच ‘लेप्रोमॅटस’ प्रकारात सुरुवातीला बधिरता नसल्याने निदान करण्यासाठी बाधित त्वचेची सूक्ष्मदर्शकाखाली कुष्ठजंतू शोधण्यासाठी तपासणी केली जाते. आजाराचे निदान झाल्यानंतर रुग्णाला औषधोपचार सुरू केल्यावर अचानक ताप येणे, चट्टे सुजणे, नवीन चट्टे उठणे, अंगावर गाठी उठणे, मज्जातंतू दुखणे इ. लक्षणे उद्भवतात. कुष्ठरोग विरोधी औषधांनी कुष्ठजंतू मरतात. मेलेल्या कुष्ठजंतूंमधून अ‍ॅन्टिजन्स बाहेर पडतात. अ‍ॅन्टिजन्सवर रोगप्रतिकारशक्तीने केेलल्या हल्ल्यामुळे वरील लक्षणे उद्भवतात. कधी कधी या रिअ‍ॅक्शनचा खूप त्रास होऊ शकतो. अशावेळी मूळ औषधे सुरू ठेवून वेदनाशामक औषधे आणि गरज असल्यास स्टिरॉईड्स औषधे दिली जातात.

 

१९४० पर्यंत या आजारावर काहीच औषधोपचार नव्हता. त्यामुळे रुग्णाला आजाराच्या सर्व अवस्थांमधून जावे लागे. पूर्वी कुष्ठरोग म्हणजे चेहरा विद्रूप होणे, हातापायाची बोटे झडणे किंवा वाकडी होणे, नाक बसके होणे इ. विकृती डोळ्यांसमोर येत. त्यात हा असा आजार ज्यामध्ये लवकर मृत्यू येण्याची शक्यता कमी. जे होईल ते भोगणे नशिबी असे. १९४० नंतर मात्र परिस्थिती बदलली आणि प्रभावी बहुविध उपचार पद्धतीमुळे आजार पूर्णपणे बरा करणे शक्य झाले आहे. फक्त एक चट्टा असलेला असांसर्गिक कुष्ठरोग बरा करण्यासाठी रिफामायसिन, ओफ्लोक्झासिन आणि मिनोसायक्लिन या तीन प्रतिजैविकांची एक मात्रा योग्य प्रमाणात रुग्णाला दिली जाते. यालाच ‘रोग उपचार’ म्हणतात. कुष्ठरुग्णांचे व्यवस्थापन जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जाते. राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण केंद्र आणि सर्वेक्षण, शिक्षण व उपचार केंद्रांमार्फत कुष्ठरोगाचे लवकरात लवकर निदान करून आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य शिक्षण, निदान, आधुनिक उपचार पद्धती, पोषण, पुनर्वसन सेवा, रुग्णांचा पाठपुरावा, आरोग्य कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण, संदर्भसेवा, स्वयंसेवी संस्थांची मदत इत्यादी माध्यमांचा प्रभावीपणे वापर आणि लोकसहभाग, योग्य तंत्रज्ञान, आंतरविभागीय समन्वय सारख्या प्राथमिक आरोग्य सेवेची तत्त्वे पाहून कुष्ठरोग निवारणाचे लक्ष्य गाठता येईल, असा विश्वास वाटतो.

 
- डॉ. रविंद्र गुरव 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat