अदानी समूहाची हवाई सेवा क्षेत्रात भरारी
महा एमटीबी   25-Feb-2019
 

विमानतळ प्राधिकरणाच्या पाच विमानतळांचे पुढील ५० वर्षांचे कंत्राट

 


नवी दिल्ली : सार्वजनिक-खासगी भागिदारीतून (पीपीपी) विमानतळ व्यवस्थापन करण्याच्यादृष्टीने सोमवारी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत अदानी समूहाने बाजी मारली. प्रथमच हवाई क्षेत्रात उतरणाऱ्या अदानी समूहाला अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांचा विकास आणि व्यवस्थापनाचे पुढील ५० वर्षांचे कंत्राट मिळाले आहे.

 

अत्यंत आक्रमक निविदा सादर करणारा अदानी समूह इतर नऊ कंपन्यांच्या तुलनेत सरस ठरला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सहा विमानतळांचा सार्वजनिक-खासगी भागिदारीतून विकास करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. एकूण दहा कंपन्यांनी ३२ निविदा प्रस्ताव सादर केले. सहापैकी गुवाहटी वगळता इतर पाच विमानतळांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या.

 
 

ज्यात दरमहा प्रवासी शुल्काच्या आधारे सर्वोत्तम निविदा मंजूर करण्यात आली. अदानी समूहाची निविदा इतरांच्या तुलनेत सरस ठरल्याचे विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. गुवाहटी विमानतळाची निविदा नंतर उघडण्यात येणार आहे. अदानी समूहाने अहमदाबाद, जयपूर, लखनऊ, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरू या पाच विमानतळांसाठी प्रती प्रवासी शुल्क अनुक्रमे १७७ रुपये, १७४ रुपये, १७१ रुपये, १६८ रुपये आणि ११५ रुपयांची बोली लावली.

हे शुल्क अदानी समूहाकडून विमानतळ प्राधिकरणाला अदा केले जाणार आहे. या निविदा प्रक्रियेत जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड या कंपनीने प्रतिप्रवासी शुल्क अनुक्रमे ८६ रुपये, ६९ रुपये, ६३ रुपये, आणि १८ रुपयांची निविदा सादर केली होती. निविदेसंदर्भातील इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाचही विमानतळांचे अदानी समूहाकडे हस्तांतर करण्यात येईल.

 

प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा

विमान प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने सहा विमानतळांचा सार्वजनिक खासगी भागिदारीतून विकास करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी पाच विमानतळांच्या निविदा मंजूर झाल्या. विमानतळांच्या खासगीकरणामुळे प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा मिळणार असून व्यवस्थापनाचा दर्जा उंचावेल, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.

 

मुंबई विमानतळासाठी अदानी समूहाचे प्रयत्न


जगभरातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील २३. टक्के हिस्सा खरेदीसाठी प्रयत्न केला होता, मात्र विद्यमान जीव्हीके कंपनीने हा प्रयत्न हाणून पाडला. जीव्हीकेकडे मुंबई विमानतळाचा ५१ टक्के हिस्सा आहे. दरवर्षी सरासरी पाच कोटी प्रवासी मुंबई विमानतळावरून ये-जा करतात.

 

पायाभूत सेवा सुविधांमध्ये अदानी समूहाची आघाडी


रस्ते, जलमार्ग, बंदर याबरोबर आता विमानतळांवरील पायाभूत सेवा सुविधांचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. कोळसा आणि अपारंपरिक वीज निर्मिती आणि वितरणापासून, कोळसा, बंदरांचा विकास, माल वाहतूक, कृषी उद्योगात अदानी समूहाचा विस्तार आहे. गौतम अदानी समूहाचे अध्यक्ष असून १० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. अदानी समूहाचा ११ अब्ज डॉलरचा (७७ हजार कोट) महसूल आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat