‘मुळशी पॅटर्न’नंतर, प्रवीण तरडेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा!
महा एमटीबी   23-Feb-2019


 
 
 
पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी आपल्या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे, हंबीरराव मोहिते यांचा जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर उलगडण्याचा प्रयत्न प्रवीण तरडे आपल्या सिनेमाद्वारे करणार आहेत.
 

पुण्यामध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीदरम्यान प्रवीण तरडे यांनी या सिनेमाची घोषणा केली. शिवनेरी फाऊंडेशनकडून या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. सौजन्य सुर्यकांतराव निकम, संदीप रघुनाथराव मोहिते आणि धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाचे पटकथालेखन, संवादलेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहेत.

 
 
 

स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून दिली. हंबीरराव मोहिते यांच्या नजरेतून स्वराज्य या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात दिसणार आहेत. परंतु सरसेनापती हंबीरराव यांची भूमिका कोणता अभिनेता साकारणार? याविषयी अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यावर्षी शिवराज्याभिषेकदिनी अर्थात ६ जून रोजी या अभिनेत्याचे नाव प्रेक्षकांसमोर येईल. असे प्रवीण तरडे यांनी सांगितले. सध्या या सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात झाली असून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे शीर्षक अद्याप ठरवण्यात आलेले नाही.

 

दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे यांनी आजवर अनेक उत्तम कलाकृती मराठी सिनेसृष्टीला दिल्या आहेत. गेल्या वर्षी प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाला भरभरून पसंती दिली. आता प्रवीण तरडे यांचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील सिनेमा बॉक्स ऑफिसवर काय धुमाकुळ घालतो. हे पाहण्याजोगे ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat