वारली चित्रसृष्टी
महा एमटीबी   23-Feb-2019

 

 
 
 
 

आदिवासी साहित्याची कलात्मक किनार

 

दहाव्या शतकात निर्माण झालेली व अकराशे वर्षे जीवंत असणारी वारली चित्रकला मानवी जीवनाला, त्याच्या आनंदाला, वेदनेला, सुखदु:खांना सचित्र रूप देते. जीवनाच्या वास्तवाचे परिणामकारक चित्रण वारली चित्रशैलीला वेगळे परिमाण देते. साध्यासुध्या घटनांना, प्रसंगांना कलात्मक आकार दिल्याने त्यांचे उत्कट, चैतन्यदायी रूप प्रकट होते. रचनेचे, मांडणीचे सौंदर्य वारली चित्रकाराचे रेषेवरचे प्रभूत्व प्रकट करते. ‘चित्रवेधकता’ हा वारली चित्रशैलीचा विशेष गुण आहे. आजूबाजूच्या समाजजीवनाबद्दलची आस्था रेषा, आकारातून व्यक्त करण्याचे सामर्थ्य वारली चित्रशैलीत आहे. जगण्यातलं जीवघेणं प्रखर वास्तव चित्र पाहाणाऱ्यांशी संवाद साधणारी वारली चित्रं ही आदिवासींच्या प्रखर जीवनेच्छेचे शब्दचित्र आहे. जीवनमूल्यांचं दर्शन त्यातून घडतं. क्रौर्य, निराशा, बीभत्सता, ओंगळपणा या हिडिसतेपासून वारली चित्रे दूर आहेत. सभोवतालचा निसर्ग, त्यातील सूक्ष्म बदल, जीवनातील वास्तव, माणसाची इच्छाशक्ती, स्वप्ने, ईश्वरी आशीर्वाद, निसर्गाचे वरदान आणि तरीही येणारी विफलता यांना वारली चित्रकार रेषेद्वारे साकार करतात.

 

वारली चित्रकला हा जीवनोत्सव आहे. त्यामागचे विचार, अभिव्यक्ती समजून घेतली पाहिजे. वारली चित्रशैली ही आदिवासींची चित्रभाषा आहे. या चित्रांच्या निर्मितीची प्रक्रिया जाणून घ्यायला हवी. वारली चित्रशैली जीवनसन्मुख आहे. या कलेत ‘स्व’चे समर्पण झालेले दिसते. आदिवासी वारली जमात पुढे काय होणार, याचा विचार न करता वर्तमानात जगते. आलेला प्रत्येक क्षण आनंदाने जगते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग,’ ‘आर्ट ऑफ गिव्हींग’ आणि ‘आर्ट ऑफ लव्हिंग’ हेच त्यांचे जीवनसूत्र दिसते. जे समोर येते ते स्वीकारुन पुढे आनंदाने वाटचाल वारली जमात करते. त्यामुळेच ‘हॅप्पिनेस इंडेक्स’चे परिमाण लावले तरी, वारली जमात सर्वाधिक सुखी, समाधानी आढळेल. सुखी समाधानी जगण्याचे रहस्य त्यांच्या साध्या, सोप्या व हव्यास नसणाऱ्या जीवनशैलीतच आहे. पर्यावरण, निसर्ग, सभोवताल यांची हानी होऊ न देता ते आनंदाने जगतात. कला हा आदिवासी वारली जीवनशैली संस्कृतीचा मूलाधार आहे. संगीत, नृत्य आणि चित्रकला हातात हात घालून संस्कृतीचे रक्षण करतात. वारली चित्रसृष्टी ही आदिवासी साहित्याची कलात्मक किनार आहे. पद्मश्री जीव्या सोमा म्हशे यांनी आणि त्यांच्या परिवाराने वारली चित्रशैली देशात आणि परदेशात पोहोचविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

 

वारली चित्रशैलीत मानवाकृतींद्वारे सामाजिक रूप प्रकट होतं. माणूस हाच बहुतेक चित्रांमध्ये प्रमुख आस्थेचा विषय असतो. अंतःस्फूर्तीने रेखाटलेल्या समूहांमध्ये लवचिक, कार्यशील, श्रमजीवी मानवाकृती दिसतात. समूहाद्वारे व समूहनृत्यातून जीवनाकडे सकारात्मक, आशावादी दृष्टीने पाहण्याचा संदेश मिळतो. कठोर वास्तवाचे काव्यात्मपणे केलेले चिंतन वारली चित्रांमध्ये प्रत्ययाला येते. तल्लीनता, एकाग्रता आणि अंतर्बाह्य कलासक्त वृत्तीतून दर्जेदार वारली चित्रे आकार घेतात. सरळ साधेपणा, स्पष्टता, नेमकेपणा, स्वच्छंदी पणा वारली चित्रातून प्रकट होतो. निसर्ग आणि पर्यावरणावर आधारित जीवनशैली आदिवासी वारली जमातीने अंगीकारलेली आहे. त्यामुळे शाश्वत जीवनाचा, शांतीचा मार्ग त्यांना गवसला आहे. वेदनेचा आदिम स्वरही या आदिम कलेत डोकावतो. पण त्यात गुरफुटत नाही. भावभावनांचा योग्यरितीने वेळोवेळी निचरा होणे शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे असते, असे आधुनिक वैद्यकशास्त्र व मानसशास्त्रज्ञ सांगतात. अबोल अशा वारली जमातीला मन व्यक्त करण्याची संधी वारली चित्रांमधून वेळोवेळी मिळते. त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग असलेला निर्मितीचा चित्रोत्सव ते नेहमीच साजरा करतात. त्यामुळे सातत्याने नित्यनूतन कलानिर्मिती होत राहते. वारली चित्रशैली रसिकांच्या अभिरुची संवर्धनाचे काम अबोलपणे करते. त्यातून संस्कृतीचे वहन, अभिसरण घडते.

 

वारली चित्रशैली कॅलिडोस्कोपची आठवण करून देते. त्याचा किंचितसा कोन बदलला की, दरवेळी नवेच सुंदर रूप दिसते. साध्या काचेच्या बांगड्यांचे किंवा रंगीत तुकडे वेगळेच आकृतीबंध निर्माण करतात. तसेच वारली चित्रांचे आहे. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन हे आकार, काही रेषा व बिंदू ही सामग्री वेगवेगळे आविष्कार धारण करते. वारली चित्रकलेचा अभ्यास त्या कलेशी अंतर्भूत असलेल्या नैसर्गिक, धार्मिक, सामाजिक बाबींचे धागेदोरे उलगडतो. समूहमनाचं प्रतिबिंब वारली चित्र-रेषा-आकारात उमटते. कला ही केवळ रंग, रूप, सौंदर्य, स्वाद, सुगंधापुरतीच मर्यादित नसते, तर ती माणसाच्या अवघ्या जीवनाला व्यापून दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग बनते. हे वारली चित्रशैलीतून सहजतेने समजते. निखळ माणूस उलगडतो. मानव आणि निसर्गातील आंतरिक नाते, प्रवाह, चित्रात व्यक्त होतात. भोवतालातून वारली चित्रकारांना प्रेरणा मिळते. नवीन प्रतिमा निर्माण होतात. कलेचा परिघ व्यापक बनतो. नृत्य, संगीतातील लय, ताल चित्रात उमटतात. चित्रातील रेषा,आकार,नृत्याचा आकृतीबंध आकर्षक करतात. हे सुसंवादी पैलू आकर्षित करतात. निसर्गातील प्रतिकांच्या संदर्भातून आलेले विधीं,चालिरिती, देवदेवतांच्या प्रतिमा थक्क करतात. काही वेळा गूढ वाटणा-या, परिकथा सांगणाच्या वारली चित्रांमधील रेषा, आकार, रचनांचा अर्थ शोधला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. आयुष्यात असणारी प्रतिकूल परिस्थिती, होणारे घाव सोसून एवढी तरल कलानिर्मिती कशी होते, हे थक्क करणारे आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते वारली चित्रकार आनंदयात्री आहेत. काळजातली भावना काळजापर्यंत पोहोचवताना चित्रांद्वारे हृदयाने हृदयाशी केलेला तो संवाद असतो. निसर्गाबरोबर सतत राहिल्याने नैसर्गिक अनुकूलता, प्रतिकूलता यांच्यात समतोल साधत वाट काढण्याची कला आदिवासींमध्ये असते. निसर्गाविषयी समज आणि अनुभवजन्य शहाणपण त्यांच्यात असते.

 

 
 

अबोल, आत्ममग्न, संकोची, वारली जमात चित्र रेखाटताना मात्र परखड, पारदर्शक व स्पष्टवक्ती दिसते. वारली चित्रकला अस्तंगत होऊ नये, यासाठी आदिवासींच्या जोडीने कलाप्रेमींनीं, अभ्यासकांनी, प्रयत्न करायला हवेत. नाहीतर अकराशे वर्षांचा वारसा गमवावा लागेल. राजाश्रय मिळणे अवघडच. आदिवासी विभागाचे मंत्री विष्णू सावरा पालघरला कलाग्राम उभे करीत आहेत. नाशिकमध्येही वारली चित्रसंग्रहालय उभे राहणे गरजेचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील ते पहिले वारली संग्रहालय ठरेल. लोककला विद्यापीठ नाशिकला उभे राहावे, अशी अनेकांची मागणी आहे. नाशिक परिसरातील वृद्ध तार पावादक दत्ता चारस्कर थकले आहेत. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांची कला जपण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. हा समृद्ध कलावारसा टिकवायला हवा, पुढे जायला हवा. वारली चित्रशैलीचे दस्तावेजीकरण होणेही गरजेचे आहे. यादृष्टीने गोविंद गारे यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर हे काम तेथेच थांबले. वारली जमातीतील युवा चित्रकारांनी, आयुष संघटनेने यामध्ये लक्ष घालावे.

 

ठाणे जिल्ह्यातील तलासरी भागातली रिना उंबरसाडा ही वारली युवती तसेच जव्हारचा राजेंद्र महाले हा युवा चित्रकार मागणीनुसार बदल स्वीकारणाऱ्या लवचिक वारली कलेला आदिवासी कला मानण्यापेक्षा पारंपरिक संचित मानतात. केवळ आशयापुरते प्रयोग न करता निराळी कथानक, कल्पनाविश्व, प्रतिमा, प्रतीके वापरून वेगळी चित्रसृष्टी नवी पिढी साकारताना दिसते. त्यांच्या हाती मोबाईल आहेत. संगणकांशी दोस्ती केल्याने जग जवळ आले आहे. (आपण मात्र अजूनही केवळ शरीराने नव्हे, तर मनानेही दूर आहोत) त्याचाही प्रत्यय तरुणांच्या चित्रणात दिसतो. जाणीवपूर्वक पारंपारिक माध्यम वापरताना नाविन्याची कास धरली जाते. कॅनव्हास, आधुनिक रंग, अ‍ॅक्रेलिक, सिरेमिक इ. यांचा वापर तरुण वारली चित्रकार सहजतेने करतात. सामाजिक विषय हाताळून नवा आयाम देतात. (एचआयव्हीएस, प्रबोधन तसेच मुलगा-मुलगी समानता, प्रौढ साक्षरता, स्वच्छ भारत, महिला सबलीकरण असे विषय हाताळले जातात) माध्यम आणि आशय या दोन्हींतील प्रयोग थक्क करतात.

 

मर्यादित गरजा’ हे आदिवासींचे बलस्थान आहे. त्याचेच प्रतिबिंब वारली चित्रकलेत दिसते. भिंतीचा गडद रंग, तांदळाच्या पिठाचा पांढरा रंग, बांबूच्या काड्या एवढी सामग्री वारली चित्रसृष्टी निर्माण करायला पुरेशी ठरते. विपरीत परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याची कला त्यांच्या ‘जीन्स’मध्येच आहे. पारंपरिक पद्धतीने जमीन कसताना ते बियाणेही राखून ठेवतात व तेच वापरतात. बाजारु संकरीत बियाणांना ते भुलत नाहीत. कारण, प्रचंड पीक यावं असा हव्यास नाही. त्यामुळे कर्जे काढावी लागत नाहीत. पेठ तालुक्यात गेल्या सात वर्षांत एकही आत्महत्या नाही. तेच चित्र आदिवासीबहुल ठाणे जिल्ह्याचे आहे. सुरगाणा तालुक्यात एका आदिवासीने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली. मात्र, त्याचे कारण व्यसनाधिनता आहे. आदिवासी तालुक्यांमध्ये सात वर्षांत ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात एकही आदिवासी नाही. त्यातही वारली तर नाहीच नाही हे विशेष. आदिवासी भिकारी शोधूनही सापडत नाही. मुक्त जीवन जगणाऱ्या वारली जमातीत घटस्फोटांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. विनयभंग, बलात्कार अशा घटना घडत नाहीत.

 

वारली चित्रशैली निर्माण करणाऱ्या आदिवासी वारली जमातीला या कलेने संजीवनी दिली. नवचैतन्य दिलं. एक जीवंत सामर्थ्यशाली अस्तित्व दिलं. स्वत्त्व दिलं. मात्र, हा बहुमोल खजिना ते विसरत आहेत. पेठ तालुक्यात रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या माध्यमातून त्यांनाच शिकवून आलो. हे उलटी गंगा वाहण्यासारखे आहे. अज्ञान, जाणिवेचा अभाव, रोजगारासाठी युवकांचे होणारे स्थलांतर ही वारली जमातीने चित्र न रेखाटण्यामागील प्रमुख कारणे आहेत. त्यावर उपाय म्हणजे पाड्या-पाड्यांवरच रोजगाराचे शाश्वत पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. ‘वारली चित्रकला’ ही आदिवासींची बौद्धिक संपदा आहे. ही ‘मन की बात’ ते सहजतेने रेषा, आकारांतून मांडतात. राज्याची, देशाची बंधने तोडून ही कला जगभर पोहोचली आहे. मात्र, ती भारताची, महाराष्ट्राची सांस्कृतिक संपत्ती आहे, हे ठणकावून सांगणेही आवश्यक आहे. बासमती, कडुनिंब, हळदीच्या पेटंटसाठी रघुनाथ माशेलकरांनी लढा दिला तसा देणे गरजेचे आहे. मध्यंतरी नेदरलॅण्ड येथील फर्स्ट टेक्नॉलॉजी या कंपनीने वारली कलेवर डल्ला मारत पायरसी केली. ट्रेडमार्कमध्ये वारली चित्रांचा समावेश केला. त्या विरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी आदिवासीच पुढे आले. डहाणूच्या आदिवासी युवा संघाने पुढकार घेऊन लोगो रद्द करण्याची मोहीम उघडली. वारली चित्रकलेला बौद्धिक संपदा अधिकारानुसार (इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अ‍ॅक्ट) भौगोलिक दर्शनियतेचा म्हणजेच जीओग्राफीक इंडिकेशनचा दर्जा प्राप्त झालेला आहे. कोकाकोला कंपनीनेही एका दिवाळीत वारली चित्रांचा वापर व्यावसायिक नफ्यासाठी होर्डिंग्जद्वारे केला. त्याला मी विरोध करणारा लेख लिहिला होता. त्याची दखल घेतली गेली. कंपनीने मिळविलेल्या नफ्यातील काही वाटा वारली आदिवासी जमातींच्या उन्नतीसाठी, सर्वांगिण विकासासाठी वापरण्याची शिफारस मी केली होती. मात्र, त्याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले गेले. वारली चित्रशैलीत तोच तो पांढरा रंग, तेच ते आकार, ठराविक येणारे विषय, त्याच त्या प्रतिमा, प्रतीके असतात, असे आरोप केले जातात. पण मग निसर्ग आपण ढवळाढवळ केल्याशिवाय बदलत नाही. माणसाचे श्वास घेणे, भूक लागणे, जगणे बदलत नाही. दैनंदिन जीवन तसेच असते मग त्यावर आधारित कला बदलावी अशी अपेक्षा कशी ठेवायची? वारली कलेत तरुण चित्रकार नवे विषय आशय आणत आहेत. त्याकडे डोळे उघडे ठेवून बघायला हवे. स्वागत करायला हवे. वारली चित्रकलेने पौर्वात्य, पाश्चात्य संस्कृतीत कलात्मक पूल, सांधला आहे. दोन्ही जगात उत्कट अभिव्यक्तीने आपले स्थान निर्माण केले आहे. अवघे विश्व व्यापणारी वारली चित्रसृष्टी जगाच्या अंतापर्यंत कलाजगताला व सर्वसामान्य रसिकांना आनंद देत राहील हे नक्की!

 

- संजय देवधर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat