संघसमर्पित विनायकराव
महा एमटीबी   23-Feb-2019

 

 
 
 
 
विनायकराव गोखले म्हटलं की, गोरीपान, बलदंड शरीरयष्टी, हसराचेहरा, पांढराशुभ्र झब्बा व दुटांगी धोतर नि हातात दुचाकी, असे प्रसन्न व कोणालाही सहजपणे आपलेसे करणारे लाघवी व्यक्तिमत्त्व! आता येतील व म्हणतील, “काय बापूराव! काय नवीन?” पुण्यातील ज्येष्ठ संघ कार्यकर्ते बापूराव कुलकर्णी भावूकतेने बोलत होते. विनायकराव गोखले व बापूराव कुलकर्णी यांचा सहा दशकांचा अगदी घट्ट संबंध! विनायकराव निजधामी गेले, त्यावेळी बापूराव अमेरिकेत मुलाकडे होते. विनायकराव यांचा संपूर्ण जीवनपट त्यांनी माझ्यासमोर मांडला.
 

गोखले कुटुंबीय मूळ कोल्हापूरचे. विनायकरावांना दोन मोठे भाऊ व दोन बहिणी होत्या. सर्वच कुटुंब संस्कारसंपन्न व राष्ट्रीय विचारांना अनुकूल! विचार व हेतू जाणून ‘कृती’ करणारे चौकसबुद्धीचे विनायकराव बालपणीच संघ स्वयंसेवक झाले व संघाचे तृतीय वर्षांपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. पू. श्रीगुरुजी व बाबाराव भिडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन असंख्य तरुण प्रचारक म्हणून संघ कामासाठी बाहेर पडले. त्यामध्ये विनायकराव गोखले हेही होते. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यात संघ प्रचारक म्हणून त्यांनी यशस्वी काम केले. पहिली संघबंदी उठविण्यासाठी त्यांनी सत्याग्रहही केला. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर, विनायकराव आरएमएसमध्ये नोकरीस लागले. मात्र, संघबंदीच्या विरोधात सत्याग्रह केल्याने विनायकरावांना नोकरीस मुकावे लागले.

 

यानंतर विनायकरावांनी ठरविले की, यापुढे संघानुकूल नोकरी वा व्यवसाय करायचा. गृहस्थाश्रम स्वीकारून ते रास्ता पेठेत (पुणे) स्थिर झाले व जळाऊ लाकडाची वखार सुरू केली. वळणदार हस्ताक्षर, नीटनेटकी साधी राहणी, दांडगी स्मरणशक्ती, सदैव प्रसन्नमुद्रा, कामाची शिस्त, प्रामाणिकपणा व परिश्रम इ. सद्गुणांचे धनी असलेल्या विनायकरावांनी व्यवसायात विश्वासार्हता निर्माण केली. परिसरातील असंख्य कुटुंबांना त्यांनी सचोटीने जळणासाठीची लाकडे, त्याकाळी घरपोच केलेली आहेत आणि त्या सर्व कुटुंबांचा प्रगाढ विश्वास त्यांनी संपादन केला होता. संघाच्या सर्व उपक्रमांना ते जळाऊ लाकडे पुरवित असत. तसेच, तंबू व राहुट्यांसाठी खुंट्या तयार करून देत, तेही अगदी अल्पदरात. 

 
विनायकराव रास्ता पेठेत स्थिर झाल्यावर ते प्रतापादित्य शाखेवर जाऊ लागले. प्रतापादित्य जुनी व नावाजलेली शाखा. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या चरणस्पर्शाने पुनित झालेले संघस्थान...
 

दिवगंत महाराष्ट्र प्रांत संघचालक व नंतरचे क्षेत्र संघचालक नगरचे अ‍ॅड. माणिकराव पाटील, जनसंघाचे अ‍ॅड. राजाभाऊ झरकर, पाबळ (शिरुर) पाबळ ऑईल मिलचे मालक भाऊसाहेब गांधी हे प्रतापादित्य शाखेचे बाल स्वयंसेवक, ज्यांना प्रत्यक्ष डॉ. हेडगेवार यांचा सहवास लाभला होता. अशा नामांकित शाखेचा मुख्यशिक्षक, कार्यवाह म्हणून विनायकरावांनी काम केले. याच शाखेतील स्वयंसेवक देवधर व गोखले रास्ते वाड्यात राहत असत व त्यांचा फोटोग्राफीचा स्टुडिओ रास्ते वाड्याच होता. या दोघांनी, अर्धगोलाकार खुर्चीवर बसलेला व हातात केन घेतलेला पू. डॉक्टरांचा पूर्णाकृती फोटो काढला. हाच फोटो पुणे शहराच्या वर्ष प्रतिपदा उत्सवात लावून आद्य सरसंघचालक म्हणून प्रणाम करत असू. ते बसलेली खुर्ची व तो फोटो नागपूरच्या रेशीमबागेतील संग्रहात आहे. या फोटोचा पूर्णाकृती पुतळा नागपूरच्या स्मृती मंदिरात आहे. डॉ. हेडगेवार हे विश्वातील सर्व हिंदूंचे श्रद्धा व स्फूर्तिकेंद्र...

 

रास्ता, सोमवार, मंगळवार पेठ म्हणजे दत्तोपंत देशपांडे, राजाभाऊ नेर्लेकर, भदे बंधू, दादा बेट्राबेट, इ. एम. व्यंकटरमण, मारोतराव पाटोळे, दत्तोबा तांबे, दादा यत्नाळकर, भाऊ हरेहरे, पंढरीनाथ पवार, बाळ करंदीकर, पंडितराव एडके, सुधाकर काळे अशा अनेक स्वयंसेवकांना संघ संस्कार दिलेला हा परिसर आहे. हे संघ स्वयंसेवक संघाच्या पडत्या काळात खांद्यावर भगवाध्वज घेऊन उभी राहिले. ना खचले, ना झुकले. पुणे शहराचे दिवगंत कार्यवाह प्रा. डॉ. श्रीपती शास्त्री म्हणत असत, “संघ स्वायत्त आहे. स्वतंत्र आहे आणि संघाला कोणी विकत घेऊ शकत नाही. संघ फक्त हिंदू समाजाला आणि राष्ट्राला बांधील आहे. कोणाच्या आधारावर शक्य आहे? हे शक्य आहे, अशा संघशरण स्वयंसेवकांच्या भरवशावरच!” आणि या संस्कारातले होते विनायकराव. ‘सर्व साधनांची सिद्धी केवळ, तो जपा संघ मंत्र’ हा भाव आत्मसात केलेला.

 

संघ कामातील अत्यंत अवघड व नाजूक कार्यक्रम म्हणजे श्रीगुरूदक्षिणा व श्रीगुरूपूजन उत्सव! नियोजन व परिश्रमपूर्वक हा उत्सव संपन्न करण्याची विनायकरावांची अनुपम हातोटी होती. गतवर्षीय उपस्थिती व समर्पणाचा अभ्यास करून संबंधित स्वयंसेवकाला व्यक्तिगत भेटून समर्पणाचा आकडा सांगत. शाखेतील उपस्थिती व समर्पण दरवर्षी वाढत्या प्रमाणात घडवून आणत. स्वत:चेही समर्पण वर्धिष्णू असे. एखाद्या स्वयंसेवकाने खूप चांगले समर्पण केले आहे, असे समजल्यावर त्याची विशेष भेट घेऊन प्रोत्साहन देत व कौतुक करीत. श्रीगुरुदक्षिणेवरच संघाचा वर्षभराचा प्रपंच चालतो, हे विनायकरावांना पक्के माहीत होते. म्हणून ते समर्पणासाठी ‘आग्रही’ असत. “१९६५ साली एका स्वयंसेवकाने महिन्याचा पूर्ण पगार ४५० रुपये (श्रीकृष्ण दांडेकर) समर्पित केला आहे, असे समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत असलेला आनंद आज मी विसरू शकत नाही,” असे बापूराव कुलकर्णी सांगतात.

 

श्रीगुरुदक्षिणेव्यतिरिक्त सामाजिक व राष्ट्रीय कार्याला स्वयंसेवकांनी निधी रूपाने मदत करावी, असे विनायकरावांचे म्हणणे असे. याचाच भाग म्हणून २० वर्षांपूवीर्र् ‘स्वरूपवर्धिनी’त श्रद्धेय मोरोपंत पिंगळे यांना पाच हजार रुपये निधी देऊन कार्यक्रमाचा एक चांगला पायंडा पाडला. याचवेळी बाळासाहेब वझे यांचे संघकामातील योगदान लक्षात घेऊन त्यांचा गौरव केला. ही प्रथा त्यांनी पुढे चालू ठेवली. अनाथ बालकांच्या आई सिंधुताई सपकाळ यांना ‘स्वरूपवर्धिनी’त बोलाविले व गिरीश प्रभुणे यांच्या उपस्थितीत ३५ हजार रुपये देऊन त्यांना गौरविले. वेळोवेळी सिंधुताईंना साहाय्य केले. सिंधुताई सपकाळ यांचे व्यक्तिमत्त्व प्रथमत: समाजासमोर आले, त्याचे श्रेय संघाला व विनायकराव गोखले यांनाच दिले पाहिजे. संघकार्य व सामाजिक उपक्रमांत विनायकरावांच्या सौभाग्यवतींची फार मोलाची साथ मिळाली. राष्ट्रीय सेवा समितीच्या कामात त्या कायम पुढे असत. विनायकराव गोखले हे निस्सिम दत्तभक्त! दर गुरुवारी रास्ते वाड्यातील एकमुखी दत्ताचे दर्शन आणि दगडूशेठ हलवाई दत्ताची रात्रीची ९.३० नंतरची आरती वर्षानुवर्षे त्यांनी चुकविली नाही. पण, संघकामाच्या आड ही दत्तभक्ती त्यांनी कधीही येऊ दिली नाही. विनायकराव निवर्तले तो दिवसही योगायोगाने गुरुवारचाच होता.

 

शेवटचा दिस गोड व्हावाया संतवचनानुसार विनायकराव दत्तरुप झाले हा विलक्षण योगायोग...

 

एकेका प्रसंगाची उकल करताना बापूराव म्हणाले, “१५ वर्षे झाली. विनायकरावांनी मला व सुधाकर काळेला घरी बोलावले व आपले मनोगत व्यक्त केले. मी पुण्यात असेन किंवा जुन्नरला. यावेळी घरच्यांना सांगावे की, मी देहदान केले आहे. मी माझ्या संपत्तीची व्यवस्था केलेली आहे. माझ्याकडे एफडीच्या पावत्या आहेत. मी हयात असेपर्यंत त्यांचे व्याज मी घेणार आहे आाणि माझ्या मृत्यूनंतर ठेवीची सर्व रक्कम व्याजासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-जनकल्याण समितीला देण्यात यावी.”

 

श्वासाच्या अंतापर्यंत देण्याची वृत्ती जागृत ठेवणारे विनायकराव सामान्यांपैकीअसामान्य स्वयंसेवक’म्हणून सदैव आम्हास प्रेरणा देत राहतील. वयाची ९४ वर्षे कर्मशील जीवन व्यतीत करून मनुष्य जीवनाचे विनायकराव गोखले यांनी सोने केले६ फेब्रुवारी, २०१९ रोजी विनायकरावांच्या कन्येने सुनीता भिडे यांनी पित्याच्या इच्छेप्रमाणे ठेवींची रक्कम जनकल्याण समितीकडे सुपुर्द केली आहे. खऱ्या अर्थाने, विनायकराव नारायण गोखले हे भौतिक जगातून मुक्त झाले. विनायकरावांचा जीवनपट आठवताना राष्ट्रकवी माखनलाल चतुर्वेदी यांच्या काव्यपंक्ती ओठावर येतात.

 

मुझे तोड देना वनमाली

उस पथ पर देना फेंक।

मातृभृमि पर शीश चढाने

जिस पर जावे वीर अनेक॥

 

- शब्दांकन : सुधाकर पोटे

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat