भारत-पाक आमने सामने ?
महा एमटीबी   21-Feb-2019


पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय देशांकडून पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली असताना, अगदी चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानबरोबर एकही सामना खेळू नये, अशी मागणी जोर धरत होती.

 
कारण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा कोणत्याही युद्धापेक्षा कमी नसतो आणि याच सामन्याकरिता आयसीसीने तिकिटांचे दरही सर्वात जास्त ठेवले आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात ठरल्याप्रमाणे सामने होणारच, असे संकेत आयसीसीच्या वतीने देण्यात आले. भारत-पाकिस्तानमध्ये १६ जूनला ओल्ड ट्रॅफर्ड येथे साखळीतील सामना होईल. त्यानंतर बाद फेरीमध्ये त्यांच्यात आणखी एक सामना होण्याची शक्यता आहे आणि जर भारताने पाकिस्तानसोबत सामना खेळला नाही, तर पाकिस्तानला एक गुण मिळेल आणि जर अंतिम सामन्यात पुन्हा पाकिस्तान आणि भारत आमनेसामने आले तर, न खेळताच ते विश्वचषकाचे मानकरी ठरु शकतात. आता या सगळ्या जरी जर...तरच्या गोष्टी असल्या तरी बीसीसीआय येत्या बैठकीत भारत आणि पाक यांच्यात सामने होऊ नये, अशी मागणी करणार आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पूर्णपणे बंद झाल्या असून केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या व आशिया चषक स्पर्धेत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत. मात्र, पुलवामा अतिरेकी हल्ल्यामुळे भारताने पाकशी सामने खेळू नये किंवा विश्वचषकातून पाकिस्तानला काढून टाकावे, अशी मागणी बीसीसीआयने पत्राद्वारे केली. पण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार, असे स्पष्ट संकेत आयसीसीचे प्रमुख डेव्ह रिचर्डसन यांनी दिले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान भारत-पाक सामन्याच्या साशंकतेबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सामने होणार नाहीत, अशी सध्या कोणत्याही सामन्याची स्थिती नाही. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेत सर्व सामने ठरल्याप्रमाणेच होतील.“ तर, सामने घोषित व्हायच्या आधीच भारत-पाक सामन्याच्या तिकिटासाठी सुमारे ४ लाख अर्ज आले आहेत. त्यामुळे भारत-पाक भिडणारच असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. तरीही दि. २७ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान आयसीसीची दुबईत बैठक पार पडणार आहे. त्यामुळे या बैठकीत हा प्रश्न निकाली लागतो का, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 

‘नवा पाक’ होणे नाही!

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रभाव टिकवून ठेवण्यासाठी क्रिकेट हा एकमेव मार्ग होता. मात्र, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना आपले प्राण गमवावे लागले आणि यानंतर पाकिस्तानसोबत चर्चा वगैरे करण्याची भानगडीच नको, अशी प्रतिक्रिया क्रिकेटजगतातूनही उमटू लागली. यात आता क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी देखील एक महत्त्वाचे विधान केले. गावस्कर आणि इमरान खान यांचे मैदानावरील वैर आणि मैदानाबाहेरची मैत्री तशी सर्वांच्याच परिचयाची. आपल्या उभरत्या काळात इमरान यांच्या गोलंदाजीचे वाभाडे काढणारे गावस्कर यांनी या घटनेनंतर, “पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेऊ नये,” अशी मागणी केली, तर भारताला डिवचणार्‍या इमरान खानला आपण मित्रत्वाचा सल्ला द्यावा का? असा प्रश्नही सुनील गावसकर यांना पडला आहे. म्हणून या आपल्याला डिवचणार्‍या या संघाशी विश्वचषकात दोन होत न करता, त्यांना गुण का द्यावे, असा सवाल करत गावस्कर यांनी भारताने पाकिस्तानच्या विरोधात खेळावे आणि त्यांना हरवावे, असे आवाहनही केले. तर, “पाकिस्तानातील निवडणूकपूर्व काळात तुम्हाला आम्ही निवडून आलो तर ‘नवा पाकिस्तान’ दिसेल,” अशा बढाया मारणार्‍या इमरान खान यांनी ‘नव्या पाकिस्तान’च्या दिशेने एक पाऊलही उचलले नाही. त्यामुळे ‘नवा पाक’ कधीच होणे नाही, अशी खोचक टीकाही गावस्कर यांनी केली, तर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने, “देशापेक्षा काहीच मोठे नाही, त्यामुळे विश्वचषकात पाकिस्तानसोबत भारताने काय, कोणत्याही देशाने खेळू नये,” अशी मागणीवजा आवाहन केले आहे. दरम्यान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर इमरान यांनी भारतासमोर मैत्रीचा हात तर पुढे केला, पण मैत्रभाव टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न मात्र केले नाहीत. याउलट ‘अंगात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ,’अशा कुरापतींमध्येच पाकिस्तान आघाडीवर राहिले. त्यामुळे क्रिकेट आणि राजकारण यांच्यात सरमिसळ होऊ नये, असे कितीही म्हटले तरी पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल, तर त्यासाठी चहुबाजूंनी त्यांची कोंडी करायला हवी. त्यामुळे पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने होवोत अथवा न होवोे, पण ‘नवा पाक’ होणे नाही, हे मात्र नक्की...

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat