दासबोधातील अन्य भक्तिप्रकार
महा एमटीबी   20-Feb-2019ज्ञानार्जन’ आणि ‘जे जे आपणासी ठावे ते इतरा सांगावे’ या दोन गोष्टी समर्थांना मनापासून आवडतात. त्यामुळे समर्थ एखादा विषय पुन्हा पुन्हा सांगतात. नवविधा भक्तीपैकी प्राधान्याने ‘श्रवण’ आणि ’कीर्तन’ या भक्तींचे विवेचन समर्थ वाङ्मयात ठिकठिकाणी केलेले आढळते. कारण, श्रवणात ज्ञानार्जन आहे आणि कीर्तनात सांगणे आहे. समर्थांना हरिकथा अत्यंत प्रिय आहे. समर्थांना वाटते की, हरिकथा ठिकठिकाणी चालली पाहिजे. त्यामुळे लोकांना भगवंताचा ‘यश-कीर्ती-प्रताप’ महिमा समजून त्यांना स्वधर्माचा अभिमान वाटू लागेल. पंढरपूरला सतत हरिकथा होत असल्याने स्वामींनी पांडुरंगाला धन्यवाद दिले आहेत.

 

धन्य धन्य पांडुरंग ।

अखंड कथेचा होतो धिंग ।

तानमाने रागरंग । नाना प्रकारी ॥ (दा.१८.१.१३)

हरिकथा आवडीने करणारा हरिदास समाजाचा आदर्श असला पाहिजे. समर्थांनी अनेक समासांमधून हरिदासाच्या अंगचे गुण वर्णिले आहे. त्याचबरोबर हरिकीर्तन करताना हरिदासाने कोणती पथ्ये पाळावीत, ते सविस्तरपणे सांगितले आहे. या भक्तिप्रकारांनंतर दासबोध ग्रंथात विष्णोस्मरण (नामस्मरण), पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या भक्तिप्रकारांचे सविस्तर निवेदन केलेले आहे. भक्तिमार्गात नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्वकाळी, सर्ववेळी नामस्मरण करावे असे स्वामी सांगतात.

स्मरण देवाचे करावे ।

अखंड नाम जपत जावे ।

नामस्मरणे पावावे । समाधान ॥ (दा. ४.३.२)

प्रपंचाच्या व्यापात आपण भगवंताला विसरतो. भगवंत आहे आणि तो खरा आहे याची जाणीव करून देण्याचे काम नामस्मरण करीत असते. यासाठी सर्वांनी नामस्मरण अवश्य करावे, असे समर्थ सांगतात. नामाचे वैशिष्ट्य सांगताना समर्थ म्हणतात

चहुं वर्णां नामाधिकार ।

नामीं नाहीं लहानथोर ।

जडमूढ पैलपार । पावती नामें ॥

(दा. ४.३.२४)

अर्चन म्हणजे ‘देवतार्चन.’ या भक्तिप्रकारात देवांच्या धातू तसेच पाषाणांच्या मूर्ती, त्या मूर्तीसाठी मंदिरे कशी असावी, यांचे वर्णन आहे. मंदिरांभोवती बागा, मठ-मंडप, धर्मशाळा, विहिरी निर्माण करून तेथे फुलझाडे लावावीत, फळझाडे लावावीत व ती देवाला अर्पण करावीत. तसेच अर्चन भक्तीत देवासाठी गंधाक्षत, पंचामृत, अनेक सुगंधी पुष्प, परिमळ द्रव्य, धूपदीप, कापूर, निरांजने या अनेक उपचारांचा समावेश असावा. या अनेक प्रकारांनी केलेले पूजन अर्चन भक्तिप्रकारात मोडते. हे सर्व पाहिले, ऐकले की, सामान्य माणसाला वाटेल की, हा भक्तिप्रकार आपल्या आर्थिक कुवतीत नाही. ही सारी श्रीमंतांची कामे आहेत. यासाठी स्वामी लगेच ‘मानसपूजे’चे महत्त्व सांगतात. ही विविधांगी षोडपोचार पूजा केली किंवा केली नाही तरी, मानसपूजा अवश्य करावी, असे स्वामींचे मत आहे. मानसपूजा करताना उपचाराचे कोणतेही साहित्य पूजेसाठी लागत नाही. मनाने जे जे उत्तम प्रकारचे पूजा साहित्य आहे, त्याची कल्पना करून ते भगवंताला मनोभावे अर्पण करावे. असा मानसपूजेचा सोपा सरळ विधी सांगितला आहे. येथे बाह्यांगाला महत्त्व नसून भक्ताचा भाव महत्त्वाचा आहे. त्या मागील समर्पणाची भावना महत्त्वाची आहे. सर्व पूजा साहित्य प्रत्यक्षात असून अर्चनात समर्पणाची भावना नसेल, तर सर्व व्यर्थ जाते. देवतार्चनाबरोबर गुरुभक्तीचे महत्त्वही स्वामींनी स्पष्ट केले आहे.

या पुढील भक्तिप्रकार म्हणजे ‘वंदनभक्ती.’ त्यासाठी सर्व देव व गुरू यांना वंदन करावे असे सांगितले आहे. हिंदू धर्मात देवदेवतांची कमतरता नाही. जो तो आपल्या आवडीप्रमाणे व परंपरेनुसार उपासना करून आपल्या देवाला भजतो. आपला देव श्रेष्ठ मानून भेदाभेद निर्माण करीत असतो. तथापि, स्वामींनी सर्व देवांना नमस्कार करायला सांगितला आहे. कोणत्याही देवाला केलेला नमस्कार अखेरीस त्या भगवंताला पोहोचतो, असे स्वामींचे मत आहे. मनाच्या श्लोकात स्वामींनी त्याला ‘थोरला देव’ म्हटले आहे. सर्व देवांना केलेले वंदन अखेरीस त्या ‘थोरल्या देवा’कडे जाणार आहे. कारण, ते अविनाशी परब्रह्म आहे. या पुष्ट्यर्थ स्वामींनी या समासात एक संस्कृत श्लोक उद्धृत केला आहे.

आकाशात्पतितं तोयं । यथा गच्छति सागरं।सर्वदेव नमस्कार:। केशवं प्रतिगच्छति॥

देवांमधील भेदाभेदाला स्वामींनी स्थान दिले नाही. वंदनभक्तीतील नमस्काराचे महत्त्व स्वामी पुढे सांगतात. नमस्काराने अंगी नम्रता येते, ताठा कमी होतो आणि समाधान मिळते. नमस्काराने विकल्प नाहीसे होऊन सख्य निर्माण होते. नमस्काराला द्रव्याची किंवा अन्य सामुग्रीची गरज लागत नाही. नमस्कारासारखे दुसरे साधन नाही. परमार्थात नमस्काराचे महत्त्व स्वामींनी पुढील ओवीत सांगितले आहे.

नमस्कारे कृपा उचंबळे ।

नमस्कारे प्रसन्नता प्रबळे ।

नमस्कारे गुरुदेव वोळे ।

साधकांवरी ॥ (दा. ४.६.१७)

परमार्थाप्रमाणे प्रपंचातही व्यावहारिकदृष्ट्या नमस्काराचे महत्त्व आहे. या पुढील भक्तिप्रकार म्हणजे ‘दास्यभक्ती.’ या भक्तिप्रकारात देवाचे वैभव सांभाळण्यासाठी पडेल ते काम करायला भक्ताने तयार असले पाहिजे. त्यात मंदिरांचा जीर्णोद्धार करावा असे सांगून मंदिर व त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे, तेथील साधनसामुग्री, अलंकार, द्रव्य यांचेही रक्षण करायला या दास्यभक्तीत सांगितले आहे. हे सांगत असताना कदाचित समर्थांच्या मन:चक्षू समोर मुसलमानी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे, देवालयांतील केलेली संपत्तीची लूट असावी. त्यासाठी या समासात ते स्पष्टपणे सांगतात की, ‘पडिले प्रसंगी सावध असावे। सर्वकाळ।’ या भक्तिप्रकारात इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात आलेल्या भक्तांचे स्वागत करणे, त्यांची सर्वप्रकारे सोय करणे, त्यांच्याशी प्रेमळ मधुर भाषेत बोलणे यांचा समावेश आहे. हे परमेश्वराचे दास्य आहे, असे स्वामींचे मत आहे. स्वामींनी १२ वर्षांच्या तीर्थाटनाच्या काळात अरेरावी करणार्‍या पुजार्‍यांचा, मंदिरचालकांचा अनुभव घेतला होता. असं म्हणतात की, तीर्थाटनाच्या काळी तेथील आयोजकांनी समर्थांना काशिविश्वेश्वराच्या मंदिरात प्रवेश नाकारला होता. दास्यभक्तीमध्ये देवाच्या दास्याप्रमाणे सद्गुरूंचेही दास्य करावे, असे सांगितले आहे. आपल्या सर्व साधू-संतांनी गुरूच्या ‘दास्यभक्ती’ला महत्त्वाचे मानले आहे. सद्गुरूंचे दास्य पत्करल्याशिवाय भक्तियोगाची पूर्तता होत नाही.

पुढे ‘सख्यभक्ती’ सांगितली आहे. या भक्तिप्रकारात देवाशी सख्य करावे, त्याला प्रेमाने बांधून ठेवावे, असे स्वामी म्हणतात. देवाला आवडते तसे आपण वागले पाहिजे, म्हणजे देवाशी सख्य जोडले जाते. देवाला काय आवडते, तर भक्ती, भाव, भजन, निरूपण आणि प्रेमळ भक्तांनी केलेले गायन देवाला आवडते. भगवंताच्या कथा गायल्याने अंत:करण निर्मळ होते. आपण भगवंतावर निरपेक्ष प्रेम केले, तर तोही तसेच प्रेम आपल्यावर करतो. या दृष्टीने अर्जुनाने खर्‍या अर्थाने ‘सख्यभक्ती’ केली असे म्हणता येईल. आपण अनन्यभावाने देवाची भक्ती केली, तर देवही भक्ताला तसेच सांभाळतो. यासाठी समर्थ भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायातील श्लोकार्थ (श्लोक ११) देतात. ‘ये यथा मां प्रपद्यते तांस्यथैव भजाम्यहम।’ म्हणजे भगवंत सांगतात, जे मला जसे भजतात, त्यांना मीही तसाच भजतो. (फळ देतो) देवाची इच्छा आणि आपली इच्छा एक झाली पाहिजे. हे विधान गुरूलाही लागू आहे.

स्वामी सांगतात

देवाच्या इच्छेने वर्तावे ।

देव करील ते मानावे ।

मग सहजचि स्वभावे ।

कृपाळू देव ॥ (दा. ४.८.२३)

नवविधा भक्तिप्रकारातील शेवटची भक्ती म्हणजे ‘आत्मनिवेदन.’ या भक्तिप्रकारात साधक पूर्णपणे देवात विलीन झाल्याने त्याचे वेगळे अस्तित्व शिल्लक राहत नाही. स्वामी सांगतात, ‘ऐका निवेदनाचे लक्षण । देवासी वाहावे आपण ।’ भक्ताने यात स्वत:ला पूर्णपणे देवाला वाहिलेलेे असते. त्यामुळे ‘विभक्त नव्हे तो भक्त’ अशी भक्ताची व्याख्या स्वामी करतात. देव कोण, आपण कोण याचा शोध घेताना जेव्हा शोध घेणारा उरत नाही, तेव्हा आत्मनिवेदन झाले असे समजावे. ‘एक परमेश्वर आणि दुसरी ही जगदाकार प्रकृती, मग ‘मी’ हा चोर मध्येच कोणी आणला?’ असे समर्थ विचारतात. विवेकाने सूक्ष्म विचार केला, तर ‘आपण’ किंवा ‘मी’ उरतच नाही. ‘आत्मनिवेदन’ हा भक्तिप्रकार साध्य झाला, तर साधकाला सायुज्य मुक्ती मिळते. तेथून साधक परत फिरत नाही. स्वलोकता, समीपता आणि स्वरूपता या मुक्तीत देवाच्या सान्निध्यात जाता येते, पण पुण्यकाल संपल्यावर तेथून माघारी फिरावे लागते. तसे सायुज्य मुक्तीत होत नाही, हे शास्त्रवचन सत्य आहे, असे स्वामी सांगतात.

भक्ति आत्मनिवेदन ।

न होतां न चुके जन्ममरण ।

हे वचन सत्य प्रमाण ।

अन्यथा नव्हे ॥ (दा. ४.९.२५)

 
-सुरेश जाखडी 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat