समर्थ रामदास स्वामी आणि लिखित साहित्यातील चिह्नसंकेत
महा एमटीबी   02-Feb-2019भाषासौष्ठव, समृद्ध शब्दसंपदा आणि व्याकरण या भिंगातून पाहायचे झाले, तर मराठी आणि अन्य भारतीय भाषांमध्येसुद्धा समर्थांसारखी लेखनशैली एकमेवाद्वितीय आहे. समर्थांचे गणितप्रेम आणि प्राचीन भारतीय गणितावरील त्यांचे प्रभुत्व, त्यांच्या दासबोधात अनुभवता येते.


रामदासी साहित्याचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभ्यासक, पुण्याचे पु. ज्ञा. कुलकर्णी यांनी फार सखोल अभ्यासाने समर्थ रामदासांच्या लिखित साहित्यातील अनेक चिह्ने, त्यांचे चिह्नसंकेत आणि त्यांचा गूढार्थ किंवा सूक्ष्मार्थ याचे विज्ञाननिष्ठ विश्लेषण केले आहे. समर्थांचे विज्ञानप्रेम आणि विशेष करून गणितप्रेम या संदर्भात दासबोधातील समर्थांचे गणितातील पांडित्य, गणिते मांडताना त्यांनी वापरलेली लिखित साहित्यातील चिह्ने आणि चिह्नसंकेत यावर कुलकर्णी यांनी विस्ताराने लिहिले आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथांच्या चिह्न आणि चिह्न संकेतांपेक्षा, स्वामी रामदासांच्या लिखित साहित्यात अगदी वेगळी शैली अनुभवता येते. समर्थांचे सर्व लिखित साहित्य हे भारतीय लिखित वाड्मयातील एक अभिजात आणि नाविन्यपूर्ण चिह्नसंकेतांची शैली दर्शवणारे आहे. भाषासौष्ठव, समृद्ध शब्दसंपदा आणि व्याकरण या भिंगातून पाहायचे झाले, तर मराठी आणि अन्य भारतीय भाषांमध्येसुद्धा समर्थांसारखी लेखनशैली एकमेवाद्वितीय आहे. समर्थांचे गणितप्रेम आणि प्राचीन भारतीय गणितावरील त्यांचे प्रभुत्व, त्यांच्या दासबोधात अनुभवता येते. गणितशास्त्र हे सर्व विज्ञान शाखांच्या अग्रणी असते. समर्थांनी याच माध्यमातून खालील सहा चरणांतून, दासबोधाचे लिखाण केव्हा झाले, त्याचा नेमका कालावधी कोणता, हे सांगितले आहे. या सहा चरणांतील चिह्नसंकेत फार स्पष्ट आहे.

 

च्यारि सहस्त्र सातसें साठीं ।

इतुकी कलयुगाची राहाटी ।

उरल्या कलयुगाची गोष्टी ।

ऐसी असे ॥७॥

च्यारि लक्ष सत्ताविस सहस्त्र ।

दोनिसें चाळीस संवछर ।

 

याचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, समर्थांनी सहाव्या दशकातील चौथ्या समासात पहिल्या एक ते सहा या ओव्यांमध्ये प्रथम, कृतयुग-त्रेतायुग-द्वापारयुग आणि कलियुग या प्राचीन भारतीय गणित विज्ञानातील चारही युगांची कालगणना म्हणजे वर्षगणना सांगितली आहे. ४३.७ गुणिले १० या गुणाकारावर १६ शून्य अशी ही संख्या फक्त डोळ्यासमोर आणा. म्हणजे या संख्येची व्याप्ती समजेल. आता या पुढच्या सातव्या ओवीतील गणित समजून घेऊया. ‘च्यारि सहस्त्र सातसें साठीं । इतुकी कलयुगाची राहाटी।’ यातील पहिल्या चार शब्दांतील संख्या अशा लिहिल्या जातील- च्यारि सहस्त्र + सातशे + साठी म्हणजे ४ + ७ + ६० अशी संख्या तयार होते. पुढच्या तीन ओळीत, ४,७६० वर्ष ही कलियुगाची कालगणना आहे, हे लक्षात येते. याच आकड्यांचा दुसरा अर्थ होतो- चौथा समास + सातवी ओळम + सहावे दशक. प्रत्यक्षात खरोखरच ही ओवी सहाव्या दशकातील चौथ्या समासातील सातवी आहे. आता फक्त कलियुगाची शिल्लक वर्षे किती ते समर्थांनी आठव्या ओवीत सांगितली आहे. ती ओवी अशी- ‘च्यारि लक्ष सत्ताविस सहस्त्र । दोनिसें चाळीस संवछर।’ आकड्यात लिहून ही संख्या होते ४,२७, २४० वर्षे. ही संख्या समर्थांनी दासबोध लिहिला त्या संवत्सराची आहे. या संख्येची आणि कलियुगाच्या सरलेल्या ४,७६० वर्षांची बेरीज केली की, कलियुगाची निश्चित कालगणना ४ लाख, ३२ हजार कशी, ते नेमकेपणे समर्थांनी पहिल्या सहा ओव्यांतच सांगितले. आता यातील चिह्नसंकेत असे की, पंचांगातील संवत्सरफलावरून वर्तमानात २०१८ या सालातील म्हणजे शके १९३९च्या चैत्र महिन्यात कलियुगाची सरलेली वर्षे ५,११९ आहेत हे समजते. याच इसवी सन २०१८ वजा ३५९ या वजाबाकीच्या गणितातून, दासबोधाचे लेखन इसवी सन १६५९ मध्ये झाल्याचे लक्षात येते. या सगळ्या मांडणीमध्ये, याच ठिकाणी ही ओवी असावी हे समर्थांनी आधीच ठरवले होते, याची जाणीव आपल्याला होते. याचा अर्थ ७,७५१ ओव्यांचा, २० दशके - प्रत्येकी दहा समासांचा संपूर्ण दासबोध, समर्थांच्या व्यापक बुद्धीच्या जाणिवांमध्ये आधीच आखला गेला होता.

 

साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या पातंजल योगसूत्रात आणि सर्वच वेद संहितांमध्ये मानवी बुद्धी, मन आणि शरीर यांच्या सूक्ष्म आणि अमूर्त नात्याबद्दल फार विस्ताराने लिहिले गेले आहे. प्रत्येक मराठी घरांत आजही लोकप्रिय आणि मुखोद्गत असलेल्या समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’ या रचनेबद्दल कुलकर्णी यांनी सूक्ष्म अभ्यासाने नेमकी टिपणी केली आहे. मानवी मन आणि शरीर यासंदर्भात मूल्यवृद्धीचा, बाल आणि कुमार वयात मनाची योग्य मशागत करून उत्तम संस्कारित नागरिक बनण्यासाठी समर्थांनी दिलेला सल्ला हा फार वास्तव आणि लौकिक अर्थाने अनमोल आहे. समर्थांनी यातील श्लोकांचा विषय आणि त्याची केलेली क्रमवार मांडणी, त्यांचा क्रम आणि श्लोकातील विषयवस्तू याची केलेली विलक्षण जोडणी कुलकर्णी यांनी उलगडून दाखवली आहे. समर्थांचा सुंदर दृष्टांत फार सुरस असून वाचकाला अचंबित करतो. यातील प्रत्येक श्लोक लौकिक संस्कार करतानाच संपूर्ण मानवज्ञातीला पारलौकिक आणि वैश्विक मूल्यांचे अनुभव देतो. या लेखातील काही संदर्भ वापरण्याची परवानगी द्या, अशी विनंती करण्यासाठी कुलकर्णी यांना दूरध्वनी केला असता, “परवानगी नका मागू, हे समर्थांचे आहे, माझे नव्हे. हे ज्ञान सर्व वाचकांसाठी विनाअट, नि:शुल्क उपलब्ध आहे,” असा निर्व्याज सल्ला त्यांनी दिला. रामदास स्वामींवरील अढळ निष्ठा आणि श्रद्धा, त्यांच्या तत्त्वज्ञानाचा सूक्ष्म अभ्यास, दैनंदिन जीवन व्यवहारात केलेला त्याचा निरपेक्ष वापर, याचा जाणीवपूर्वक उल्लेख या लेखात केला आहे. कुलकर्णी यांना सादर-सस्नेह धन्यवाद...!!

 

‘मनाचे श्लोक’ या रचनेत श्रीगणेश-देवी शारदा-श्रीराम या त्यांच्या आराध्य दैवतांना, समर्थ पहिल्या श्लोकात वंदन करतात. यातील श्रीगणेश हा ईश्वरवाचक शब्द आहे, शारदा हा मायावाचक शब्द आहे, तर अनंत-राघव हा शब्द ब्रह्मवाचक आहे. या पहिल्या श्लोकात समर्थांनी या मनोबोधाचा पाया स्पष्ट केला आहे. भुजंगप्रयात या वृत्तात मनाच्या श्लोकांची म्हणजेच मनोबोधाची मांडणी समर्थांनी केली आहे. आपले मन हे परस्पर विरोधी गुणांनी युक्त आहे. आपल्या मनात एकाच वेळी विरोधी विचार येत असतात. कधी चंचल, तर कधी निश्चयी. कधी सुष्ट, कधी दुष्ट. कधी क्रौर्य, कधी शौर्य. कधी मित्रत्व, कधी शत्रुत्व. शरीराचे सर्व व्यापार हे मनच नियंत्रित करते. अशा या मनाला एका शिस्तीत कसे ठेवायचे त्याचे मार्गदर्शन या मनोबोधातूनच समर्थ करून देतात. यातील सर्वच श्लोक सूत्रबद्ध आहेत. निरहंकार, विवेक, वैराग्य, शुद्धाचरण, संतसंगती आणि नामस्मरण या मार्गाने मनाला शिस्त कशी लावावी, याचा उत्तम परिपाठ म्हणजे ‘मनाचे श्लोक.’ एक गोष्ट नेमकेपणाने समजून घ्यायला हवी की, ‘प्रभाते मनी राम चिंतीत जावा’ हा श्लोक याच्या विषयवस्तूचे चार चरणात वर्णन करणारा महत्त्वाचा श्लोक समर्थांनी क्रमवारीने तिसर्‍या क्रमांकावर ठेवला आहे. या श्लोकातील मजकूर आणि तीन ही संख्या याला फार सूक्ष्म चिह्नसंकेत आहे. तीन ही संख्या त्रिगुणांचे रूपक आहे. त्रिगुण म्हणजे मानवी जीवनातील वेगवेगळ्या अभिव्यक्तीचे अथवा स्वभावधर्माचे तीन जन्मदत्त-स्थायी मूल्यसंचय किंवा स्वभावधर्म. राजस गुणधर्म आणि तामसी वृत्ती याचा समतोल साधून सत्वगुण प्राप्त करावा, असा संकेत समर्थ या श्लोकात देत आहेत. काम-क्रोध-लोभीवृत्ती हे राजस गुणधर्माचे वैशिष्ट्य आहे; तर निद्रा-आळस-असत्य-कपटनीती हा तामसी वृत्तीचा गुणधर्म आहे. या दोन्ही गुणवत्तांचे संतुलन म्हणजे शरीर-मन-बुद्धी आणि चेतना यावर योग्य नियंत्रण असणे म्हणजेच सत्वगुण. उत्तम प्रगती, उत्तम शारीरिक आरोग्य व संतुलित मानसस्वास्थ्य हे सत्वगुण साधनेचे फायदे आहेत. सकाळच्या प्रहरी काही बोलण्याआधी रामनामाचा जप करावा. या जपामुळे वर वर्णन केल्याप्रमाणे सत्वगुण प्राप्तीची साधना होतेच, शिवाय जनमानसात आपली उत्तम प्रतिमा निर्माण होते असा या श्लोकाचा गूढार्थ आहे.

 

मनाचे श्लोक यातील सहावा श्लोक आहे- ‘नको रे मना क्रोध हा खेदकारी।’

 

प्राचीन भारतीय मनोविज्ञानानुसार, काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर हे मानवी शरीर-बुद्धी-मनाचे षड्रिपू मानले गेले आहेत. याचा अतिरेक केल्याने जीवनमूल्यांचा र्‍हास निश्चितपणे होतो. आधीच्या ३, ४ आणि ५ या श्लोकांत अयोग्य मूल्य आणि दुर्गुणांची चर्चा करून नेमक्या सहाव्या श्लोकात समर्थ, सहा म्हणजे षड्रिपूंचा संदर्भ देऊन असे दुर्गुण टाळावे, असा सल्ला देतात. अनेक कुटुंबात आणि काही शाळांमध्ये आजही, बाल- कुमार वयातील मुलांना आणि मुलींना मूल्यवृद्धी आणि स्मरणशक्ती संवर्धनासाठी ‘मनाचे श्लोक’ मुखोद्गत करण्याचे पाठ दिले जातात. पुढील लेखांत समर्थांनी शिवाजीराजांना पाठवलेल्या एका पत्राचा आणि त्यातील चिह्नसंकेतांचा परिचय आपण करून घेणार आहोत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/