मंगळावरची ‘अपॉर्च्युनिटी’
महा एमटीबी   19-Feb-2019
 


मंगळावरची 'अपॉर्च्युनिटी' हे वाचून कदाचित प्रश्न पडेल की आता मंगळावर कोणती आली हो ही नवी 'अपॉर्च्युनिटी'? होय, पण हे खरं आहे. ही कुठल्या कामाची ‘अपॉर्च्युनिटी’ नाही, तर ‘नासा’ने मंगळ ग्रहावर सोडलेल्या 'अपॉर्च्युनिटी रोवर’ या अंतराळ यानाचा विषय आहे. कारण, मंगळ ग्रहाच्या शोधासाठी निघालेल्या 'अपॉर्च्युनिटी रोवर’ या यानाच्या ऐतिहासिक सफरीचा नुकताच अंत झाला.

 

‘नासा’ने काही दिवसांपूर्वीच हे यान संपर्कात नसल्याचे जाहीर करत ‘एका युगाचा अंत झाला’ असे म्हटले होते. १५ वर्षांच्या आपल्या ऐतिहासिक कार्यकाळात या यानाने मंगळावरील अनेक रहस्यांचा शोध लावला होता. गेल्या वर्षी जून महिन्यात मंगळ ग्रहावर मोठे वादळ आले होते. हेच वादळ 'अपॉर्च्युनिटी रोवर' या यानासाठी संकट ठरले. त्यानंतर त्या यानाने पृथ्वीवर संदेश पाठवणे बंद केले. या यानाने अखेरचा संदेश १० जून, २०१८ रोजी पाठवला होता. त्यानंतरही अनेकदा या यानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अखेर ‘नासा’ने काही दिवसांपूर्वीच या यानाचा संपर्क तुटल्याचे सांगत त्याचा अंत झाल्याचे घोषित केले. 'अपॉर्च्युनिटी रोवर’ यानाची महत्त्वाची बाब म्हणजे, हे यान सौरऊर्जेवर चालणारे होते. मंगळावरच्या या वादळाने हवेची नोंद घेणार्‍या सेंसर सर्कीटला निकामी केले. परंतु, त्यामुळे या अभियानावर फारसा परिणाम होणार नसल्याचे ‘नासा’च्या वैज्ञानिकांचे म्हणणे होते. त्यानंतरही अनेकदा ‘नासा’ने यानाला पुनर्कार्यान्वित करण्याचे अनेक प्रयत्न केले. यासाठी ‘नासा’कडून यानाला एक हजारांपेक्षा अधिक संदेश पाठवण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही ‘नासा’च्या वैज्ञानिकांना या यानाला पुनर्कार्यान्वित करण्यात अपयश आले.

 

अपॉर्च्युनिटी रोवरया यानाची निर्मिती मंगळावरील पृष्ठभागावर एक किलोमीटरपर्यंतच्या भूभागाच्या संशोधनासाठी झाली होती. परंतु, एक किलोमीटर तर दूर, या यानाने मंगळावर तब्बल ४५ किलोमीटरचा ऐतिहासिक प्रवास केला. ‘रोवर’ आणि त्यापूर्वी सोडण्यात आलेला ‘रोवर स्पिरिट’ या यानांनी मंगळावर पाणी असल्याचा पुरावादेखील दिला होता. तसेच मंगळावर सूक्ष्मजीवांचा वावर असल्याच्याही शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. नुकतेच या यानाने मंगळावरील खडकांचे काही नमुने एकत्र केले होते. त्यानंतर त्या नमुन्यांचे परीक्षणही करण्यात आले होते. ‘नासा’च्या या यानाला अनेक दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले होते.

 

‘नासा’च्या सर्वात वजनदार आणि मोठ्या प्रकारच्या यानाच्या रुपात 'अपॉर्च्युनिटी रोवर’कडे पाहिले जाते. या यानाची दुसरी विशेष बाब म्हणजे, ‘नासा’च्या विशेष आणि अत्याधुनिक १० उपकरणांना हे यान आपल्यासोबत मंगळावर घेऊन गेले होते. यामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या सॉफ्टवेअरची मदतदेखील घेण्यात आली होती. त्या सॉफ्टवेअरच्या मदतीने वैज्ञानिकांच्या मदतीशिवाय यानाला सहज यशस्वीरित्या पृष्ठभागावर उतरवणे शक्य होते. मंगळ ग्रहावर उतरल्यानंतर या यानाने आपला सर्वाधिक कालावधी मंगळाच्या पृष्ठभागावरील नवे शोध लावण्यात घालवला होता. सपाट पृष्ठभागावर वावरताना एकदा हे यान त्या ठिकाणी असलेल्या वाळूत अडकले होते. तेव्हा भूगर्भीय उपकरणांच्या मदतीने या यानाने मंगळावर द्रवरूपात पाणी असल्याचा महत्त्वपूर्ण शोध लावला. दुसर्‍या टप्प्यात या यानाने ‘पॅरानॉमिक छायाचित्रे’ घेण्याचे महत्त्वाचे काम केले. यामुळे मंगळवार ‘जिप्सम’ असल्याचा शोध लागला. त्याचप्रमाणे मंगळावर एकेकाळी वाहत्या पाण्याचे स्रोतही होते, या विचारांना अधिक बळकटी मिळाली. या यानापूर्वी सोडण्यात आलेले ‘रोवर स्पिरीट’ हे यान २०१० सालापर्यंत कार्यरत होते. सध्या केवळ ‘क्युरिऑसिटी’ हे एकमेव यान मंगळवार कार्यरत आहे. परंतु, हे यान पूर्वीच्या यानापेक्षा वेगळे असून ते सौरऊर्जेवर चालत नसून, अणुऊर्जेवर चालणारे आहे. आता २०२० साली ‘युरोपियन रशियन एक्सोमार्स मिशन’मध्ये ‘रोजलिंड फ्रँकलिन रोबो’ मंगळाच्या दुसर्‍या भागावर उतरवण्याचा विचार सुरू आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat