हिंदू धर्माचा वेगाने प्रसार होत देशांत प्रभाव वाढतोय : रवीकुमार अय्यर
महा एमटीबी   17-Feb-2019
 
 


 
 
जळगाव, 16 फेब्रुवारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जळगाव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात ‘हिंदुत्वाचा जगभरात वाढता प्रभाव’ या विषयावर रवीकुमार अय्यर यांचे बौद्धिक आयोजित केले होते. रवीकुमार यांनी जनजाती समूहांमध्ये सेवाकार्य केले असून रा. स्व. संघाचे केंद्रीय संपर्क मंडळाचे सदस्य अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे. जगभरातील विविध देशांमध्ये त्यांनी प्रवास करून हिंदुत्वाचा गाढा अभ्यास केला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचे इंडोनेशियातील हिंदू समाजाचे पुनरुत्थान हे पुस्तक महेश त्रिपाठी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. तसेच, कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली. आपल्या बौद्धिकाची सुरुवात करतानाच त्यांनी सर्वप्रथम नेताजी पालकरांना स्वधर्मात घेऊन एक उच्च विचार हिंदू समाजाला देणार्‍या छत्रपती शिवरायांना स्मरण केले. जळगावातील वैशिष्ट्य सोन्याचे व्यापारी व केळी उत्पादन तर आहेच पण कवयित्री बहिणाबाई या खान्देशाला मिळालेलं खरं रत्न असल्याचं ते म्हणाले. देशाला भास्कराचार्य, सारंगदेव व ब्रह्मेंद्रस्वामींसारखे थोर वैज्ञानिक मिळाल्याचे गौरवोद्गार काढले. जगभरातील हिंदुत्वाचा व हिंदू धर्माचा प्रसार व प्रचारविषयक बोलताना रवीजी म्हणाले की, जगभरात हिंदू धर्माप्रति लोकांची श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. लोक गीतेच्या तत्त्वज्ञानास आपलेसे करत आहे. श्रीराम, श्रीकृष्ण व भगवान शंकर यांची उपासना करत आहे. कधी योगाच्या माध्यमातून तर कधी गीतेच्या विचारांतून तर कधी आयुर्वेदाच्या माध्यमातून जगभरात हिंदू धर्म वेगाने प्रसारित होत आहे. लोकांना हिंदू जीवनपद्धती अन्य धर्मांपेक्षा सहज सोपी व आनंददायी वाटत आहे. त्यामुळे लोक हिंदू विचारांकडे आकर्षित होत आहे. हाच विचार पुढे मांडताना त्यांनी अबुधाबीचे सुलतान व नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा दाखला दिला. तसेच मुरारी बापू यांच्या अबुधाबी भेटीचाही दाखला दिला. या भेटीमध्ये अबुधाबीच्या युवराजांची पत्नीने आपल्या डोक्यावर रामायण ग्रंथ विराजीत केला होता. युवराजांनी आपल्या भाषणाची सुरुवात जय श्री राम म्हणून केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी अबुधाबीत भव्य हिंदू मंदिराचा शिलान्यास केला असल्याचेही त्यांनी आठवण करून दिली. इंडोनेशिया, जावा, रशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका व अमेरिकासारख्या ठिकाणी हिंदू धर्माकडे लोक वळत आहेत. पुढच्या 15/20 वर्षांनंतर लोक आपल्याकडे मोठ्या संख्येने हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी येणार आहेत. आपण त्यांच्या स्वागताची तयारी करा, असे सांगत त्यांनी आपल्या वाणीला विराम दिला. कार्यक्रमाप्रसंगी केसीई संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच आ. सुरेश भोळे सहपत्नी उपस्थित होते. व्यासपीठावर मा. महेश त्रिपाठी, शरदराव ढोले, जिल्हा संघचालक राजेश पाटील, शहर संघचालक विलास भोळे, देवगिरी प्रांत प्रचारक रामानंद काळे, देवगिरी प्रांत प्रचार प्रमुख स्वानंदजी झारे, जळगाव विभाग कार्यवाह अविनाश नेहते व संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक उपस्थित होते.