‘हिंदुस्थान समाचार’ वृत्तसंस्थेचे अध्वर्यू-आबा बर्वे
महा एमटीबी   14-Feb-2019

 

 
 
 
 
हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेच्या कामात दादासाहेब आपटे, वसंतराव देशपांडे यांच्या साथीने काम करणाऱ्या वि. स. बर्वे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्याविषयी वाचकांना अल्पपरिचय करून देत आहोत...
 

कल्याणहून जुन्नरला जाताना मुरबाड, सरळगाव, धसईमार्गे माळशेज घाट लागतो. ३० वर्षांपूर्वी या घाटातून जाण्याचा रस्ता रूंद, थोडी वाकडी वळणे काढून नीट झाला तेव्हापासून कोकणातून या मार्गे घाटावर जाण्या-येण्याची वाहतूक बरीच सुरक्षित झाली. १९६३ च्या ऑगस्टमध्ये या घाटातील डोंगरात इटालियन कंपनीचे प्रवासी विमान कोसळले होते. त्यात १३२ लोक मृत्युमुखी पडले. त्या दिवसात हा आशिया खंडातील सर्वात भीषण व मोठा विमान अपघात होता. हे विमान मुंबईस येत होते. तसा विमानतळावर स्पष्ट संदेश होता. पण अचानक वैमानिक व विमानतळ अधिकार्‍यांचा संपर्क तुटला. त्याकाळी संपर्क-सुविधा एवढ्या प्रगत नव्हत्या. त्यामुळे विमान नेमके आकाशात कुठे आहे हे समजणे अवघड होते. तशात भरपूर पाऊस व ढगांची दाटी त्यामुळे सर्वत्रच दिवसाही अंधार वाटायचा. बेपत्ता विमान नेमके कोठे आहे, हे कळतच नव्हते. महाराष्ट्राच्या हद्दीत, डोंगरात कुठेतरी पडले असावे, असा एक अंदाज होता. विश्वनाथ सदाशिव तथा आबा बर्वे त्यांचे मित्र रघुनाथ कर्वे यांच्यासह कल्याणहून शहापूरला जाण्यासाठी निघाले असताना वाटेत एका मालवाहू ट्रकच्या ड्रायव्हरने आपणास काल सायंकाळी धसईच्या पुढे घाटात आग व धूर दिसल्याचे सांगितले. पावसाच्या सरी कोसळत असलेल्या दिवसात डोंगर झाडीत अशी आग कशी लागते, हे नक्कीच काहीतरी गूढ समजून त्याचा मागोवा घेण्याचे या दोघांनी ठरविले. त्याच दोन दिवसात विमान बेपत्ता झाल्याचे वृत्तही वाचनात आल्याने ते तपास करण्यासाठी सरळ गावाच्या दिशेने गेले. हे दोघे युवक पुढे धसईपर्यंत दिवसभराचा १२ मैलांचा प्रवास करून त्यांचे मित्र टिकाराम देशमुख यांच्याकडे पोहोचले. संघामुळे देशमुखांची पूर्वीची ओळख होती. देशमुख जनसंघाचे कार्यकर्ते होते. आबा बर्वे यांनी डोंगरात कुठेतरी हे अलिटालिया विमान कोसळले असण्याची शंका व्यक्त केली व तपास करण्यासाठी जाण्याचा निर्धार केला.

 
कर्वे, देशमुख या दोन्ही तरुण मित्रांनी हे आपले काम नव्हे, म्हणून बर्वे यांना सांगितले पण, त्याचा उपयोग झाला नाही. देशमुखांकडील १-२ गडी वाटाडे म्हणून घेऊन आबा मार्गस्थ झाले. पाच मैल पायी डोंगरातून पुढे गेल्यावर पोलीस पथक भेटले. तेही कालपासून विमानाचा शोध घेत असल्याचे समजले. आता मात्र आबांनी अपघात झाल्याची केवळ आपली शंका नसून तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला, त्याप्रमाणे याच डोंगर-कपारीत विमान कोसळल्याची मनोमन खात्री करून घेऊन डोंगर चढून जाण्याचे त्यांनी ठरविले व प्रत्यक्ष गर्द झाडा-झुडपातून, मधून येणाऱ्या पावसाच्या सरी चुकवत तपास सुरू केला. सकाळी १० च्या सुमारास त्यांना यश आले. त्यांना या विमानाचे काही भाग तुटलेला, अर्धा जळका झालेला मोठा पत्रा पाहायला मिळाला. तेथून पुढे घाण वास आला व काहीतरी धुमसत असल्याचे दिसले. म्हणून तसेच मार्गक्रमण करीत ते गेले तो एक प्रवासी अर्धमेल्या अवस्थेत विव्हळत असताना पडलेला दिसला. तात्काळ आबाने आपल्याबरोबर असलेल्या एकाला खाली गावात जाऊन ही अपघाताची वर्दी देण्यास सांगून मदत घेऊन येण्याची सूचना केली. त्यानुसार तो साथीदार परतला. हा विमान अपघात झाल्याची खात्री झाली पण, त्याकाळी संपर्काची कोणतीच साधने नव्हती. फोन-मोबाईलअसे काहीही नसल्याने एकट्यानेच पुढे पुढे जात तपास घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. आबांनी तेच केले. अतिशय भीषण आणि त्यामुळेच भयाण असा हा अपघात होता. विमानाचे अवशेष झाडा-झुडपात पडलेले व त्याला चिकटून अनेक प्रवाशांचे मृतदेह त्यांनी पाहिले. सायंकाळी ४ च्या सुमारास खाली गेलेल्या माणसांबरोबर १०-१५ व्यक्ती, दोन डॉक्टर्स, थोडीफार औषधे असे घटनास्थळी पोहोचले. सात-आठ पोलीसही त्यांच्यासह होते. आता शोधकार्याला वेग आला. मोठ्या वृक्षांवर लटकलेले विमानाचे अवशेष व मृत प्रवासी आढळले. ती रात्र तशीच गेली. त्यातल्या त्यात जखमींना एका बाजूला करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी खालून अधिक पोलीस आले. त्यांच्या समवेत ग्रामस्थही होते. सर्वांच्या मदतीने तब्बल पाच-सहा तासांत मृत व बचावलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थानी हलविले.
 

जिल्हाधिकारी आणि विमानतळ अधिकारी धसई येथे आले. त्यांनी आबा बर्वे यांची भेट घेतली. बर्वे यांच्या हाता-पायाला जखमा झाल्या होत्या. शिवाय ते खूप दमले होते. तात्काळ त्यांना कल्याणला रेल्वेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळच्या वर्तमानपत्रात व आकाशवाणीवर दुर्घटनाग्रस्त प्रवासी, विमानाचे अवशेष यांच्या छायाचित्रांसह भीषण अपघाताचा शोध ज्यांनी घेतला, त्या आबा बर्वे यांची मुलाखत व फोटोही प्रसिद्ध झाला. त्यावेळचे गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी आबा बर्वे यांना मंत्रालयात बोलवून त्यांचा सत्कार केला. तेव्हाचे संघाचे सरकार्यवाह एकनाथजी रानडे यांनीही आबांची भेट घेऊन कौतुक केले.

 

बर्वे यांच्या पत्रकारितेचा हा शुभारंभ होता. त्याच्या पुढे आपली रेल्वेतील नोकरी सांभाळून त्यांनी काही वर्षे हे वार्ताहराचे काम केले. प्रारंभी ‘गोमांतक’त ते माधव गडकरींसह काम करीत होते. त्यामुळे आदरणीय भाऊसाहेब बांदोडकरांशी त्यांचा जवळून संबंध आला. याच पत्रकारितेतून ‘हिंदुस्थान समाचार’चे संस्थापक व नव्यानेच विश्व हिंदू परिषदेचे विस्तार कार्य हाती घेतले, त्या दादासाहेब आपटे यांची १९६८ मध्ये आबांची भेट झाली. संघ प्रेरणेतूनच परस्पर संवादाचे वर्तमानपत्राचे माध्यम निवडून कार्य करणाऱ्या या वृत्तसंस्थेसाठी आबांनी काम करावे, असा आग्रह आपटे यांनी केला. त्याला सत्वर मान्यता देऊन आबा मुंबईत १९७० मध्ये आले. तेव्हा ‘समाचार’च्या कामात बापूराव लेले, यशवंत मुळ्ये, नारायण दात्ये, वसंतराव देशपांडे, अनंत करंबेळकर, वसंत उपाध्ये, पुरुषोत्तम मिश्रा अशी मंडळी कार्यरत होती. अर्थात, बापूराव व यशवंत मुळ्ये हे बरेच वेळा दिल्लीत असायचे. मुंबई कार्यालय वसंतराव देशपांडे पाहत असत. आबा बर्वे समाचारमध्ये पुढे सुमारे ३० वर्षे काम करीत होते. बातम्या मिळवून त्या ‘समाचार’चे माध्यमातून सर्व मराठी वृत्तपत्रांना देण्यापासून स्तंभ लेखनापर्यंत पडेल ते या प्रसिद्धी माध्यमासाठी, त्यांनी अगदी अत्यल्प वेतनावर व निष्ठेने काम केले. ‘समाचार’नंतर पुणे सकाळ, सातारा-नाशिक-सोलापूर येथील स्थानिक वर्तमानपत्रेही त्यांनी हाताळली. मंत्रालयाचे वृत्तपत्र प्रतिनिधी दालनात आबा बर्वे हे नाव आदराने घेतले जात असे. ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे आठ वर्षे सचिव होते. तेव्हा विद्याधर गोखले, कृ. पा. सामक, पानवलकर, दि. वि. गोखले, चित्तरंजन पंडित असे ज्येष्ठ पत्रकार अध्यक्ष होते. शंकरराव चव्हाणांपासून शरदराव पवारांपर्यंतच्या सर्व ज्येष्ठ मंत्र्यांचा त्यांच्या जवळून संबंध होता. अत्यंत मृदुभाषी, समोरच्याला भरपूर बोलू देणे, अगदी न कळत त्याचे काही चुकत असेल, तर ते ध्यानी आणून देण्याची त्यांची एक विशिष्ट लकब होती. नि:स्वार्थ आणि स्वीकृत कार्य लक्ष देऊन पूर्ण करण्याचा त्यांचा स्वभाव होता.

 

विश्वनाथ सदाशिव तथा आबा बर्वे ते मूळचे रोहा तालुक्यातील मेढे येथील. त्यांचा जन्म १२ डिसेंबर, १९३० रोजी झाला. वडील भिक्षुकी व थोडी शेती करीत असत. दोन भाऊ व एक बहीण असे त्यांचे कुटुंब होते. मोठ्या बंधूंच्या मुंबईतील नोकरीमुळे आबा मॅट्रिकनंतर शिक्षणासाठी बंधूंकडे कल्याणला आले. प्रारंभी गावातच हिशोब लेखनाची लहान कामे करू लागले. नंतर रेल्वेत नोकरी लागली. नोकरी करून रुईया महाविद्यालयात आर्टस्ला प्रवेश घेतला. दोन विषयांत त्यांनी पदवी मिळवली. तेथे त्यांचा विद्यार्थी परिषदेशी संबंध आला. तेव्हा मुंबईत शशिकांत गाडगीळ, लखन भतवाल, पद्मनाभ आचार्य, मधुकर देवळेकर, डॉ. माधव परळकर इ. कार्यकर्ते परिषदेच्या कामात होते. त्यांच्याशी आबांचा संबंध आला. पुढे ही मैत्री कायम होती. परिषदेच्या कामात ते व कल्याणचे बापू लिमये (हेही रेल्वेत नोकरीत होते) लक्ष देत असत. काही वर्षे आबांनी रेल्वेत नोकरी केली. पण १९७० पासून ‘समाचार’मध्येच पूर्णवेळ काम करू लागले. मित्रांच्या सल्ल्यावरून त्यांनी १९७२ मध्ये विवाह केला. पत्नी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. पुढे त्यांना मुंबई सेंट्रल भागात गील्डर लेनच्या महानगरपालिका वसाहतीत निवासासाठी एक ब्लॉक मिळाला. आबांचा निवास याच जागेत पुढे सुमारे २० वर्षे होता. पत्नीचे अल्प आजाराने १९९५ मध्ये अचानक निधन झाले. या दोघांनी कन्या दत्तक घेतली. कन्या कांचन खरे ही एम.ए. होऊन नोकरी करायची. पण आता पूर्णवेळ पडेल ते सामाजिक कार्य तसेच भाजप महिला आघाडीचे काम करीत आहे. पत्नी निधनानंतर दोन वर्षांनी मुंबईची जागा सोडून आबा पुन्हा कल्याणला आले. ‘हिंदुस्थान समाचार’ची ३० वर्षांची नोकरी सोडून २००० पासून काही वर्षे ‘मुक्त पत्रकारिता’ केली. २००२ मध्ये पुण्यात एका समारंभात त्यांना सकाळचे दिवंगत संपादक ‘नानासाहेब परुळेकर पत्रकारिता पुरस्कार’ त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री मा. लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते मिळाला.

 

आबा बर्वे यांची अजून एक आठवण म्हणजे १९९२ चे सुमारास मंत्रालयाजवळील हटमेंटस् मध्ये ‘समाचार’चे कार्यालय बंद करून ती जागा शासनाला परत करण्याची नोटीस देण्यात आली. त्याच रांगेत अन्यही वृत्तपत्रसंस्थांची कार्यालये होती. तीही हटविण्याचा सरकारी आदेश झाला. या जागा मोकळ्या करण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्य संघटना, राजकीय पक्ष, सार्वजनिक ट्रस्ट इ. ना त्या देण्याचा सरकारचा इरादा होता. हे वृत्त बर्वे यांना कळले. त्यांनी वसंतराव पटवर्धन, प्रमोद महाजन यांची समक्ष भेट घेऊन त्यांना ’समाचार‘ची जागा ताब्यात घेण्याची खटपट करण्यास सांगितले. त्यावेळचे भाजपचे प्रदेश कार्यालय प्रमुख प्रभाकर खेर, शरद चव्हाण, बाबा सावईकर आदी कार्यकर्त्यांनी नेकीने प्रयत्न करून ही जागा अनुमतीशिवाय कार्यालयासाठी वापरण्यास सुरुवातही केली. त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना प्रदेश अध्यक्ष मोतीराम लहाने, आ. हशू अडवाणी, वामनराव परब प्रभृतींनी भेटून ही जागा पक्षासाठी मिळविली. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अटलजी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ‘समाचार’चे वसंतराव देशपांडे, आबा बर्वे, नारायणराव दात्ये यांचा जागा मिळवून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. हेच नरिमन पॉईंटचे ‘योगक्षेम’ (विमा कंपनी) इमारती समोरील भव्य प्रदेश कार्यालय सर्व कार्यकर्त्यांचा आधार आहे. ते मिळवून देण्यासाठी बर्वे यांचे व त्यांच्या सहकार्याचे अथक परिश्रम कारणीभूत आहेत. विश्वनाथ सदाशिव तथा आबा बर्वे यांच्यासारखी अनेक व्यक्तिमत्त्वे तळमळीने, नि:स्वार्थपणे त्याकाळी कार्य करीत होती म्हणूनच संघ परिवाराचा विविध क्षेत्रांतील विस्तार वृद्धिगंत झालेला आपण पाहत आहोत. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे विशेष सभेत आबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे अल्प आजाराने दि. २९ जानेवारी, २०१९, कल्याण येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कल्याणकरांनी एका सभेत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.

 
 
- सुरेश द. साठे