पुण्यश्लोक युगपुरूषाची गाथा
महा एमटीबी   13-Feb-2019

 

 
 
 
अनेक महत्त्वपूर्ण तिथींचे संशोधन ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथाद्वारे झालेले आहे. संपूर्ण समाजाला सदैव प्रेरणा देणारे असे हे शिवचरित्र आहे. राष्ट्राचं क्षात्रतेज जागे करण्याचे कार्य या ग्रंथाने केले व अजूनही करत आहे. काळाची पावले ओळखून राष्ट्राविषयीची तळमळ, राष्ट्रप्रेम यांची ओजस्वी निर्मिती करणारा हा ग्रंथ आहे. राष्ट्रपुरुषाची गौरवगाथा सच्चेपणानं मांडणारं हे शिवचरित्र असून जाती-जातीच्या राजकारणाला फाटा देणारे आहे. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, विवेक, वैराग्याचा भगवा झेंडा हिंदवी स्वराज्यावर डौलाने फडकणे, नि:स्पृहता, त्यागाचा मेरुमणी, रयतेच्या हिताचा सदैव विचार करणं, अशा अलौकिक गुणांना या चरित्रामधून लोकांसमोर आणण्याचे कार्य या ग्रंथाने केलं आहे.
 

आपल्या देशामध्ये अनेक ऋषी, मुनी होऊन गेले. आचार्य व संतांची उज्ज्वल परंपरा निर्माण झाली. शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना मठाची स्थापना केली. हे मठ म्हणजे आपल्या हिंदू राष्ट्र, हिंदू धर्माची शक्तिपीठं आहेत. परकीय संस्कृती, परधर्मापासून राष्ट्राचं रक्षण करण्याची शक्ती असलेली ही पीठं आहेत. शंकराचार्यांनी आचरणाचा आदर्श लोकांसमोर ठेवला. ७०० वर्षांपूर्वीचे दत्तपरंपरेतील श्री नृसिंह सरस्वती स्वामीदेखील आचार्य परंपरेमधील होते. लोकांना स्वआचरणामधून योग्य मार्गाने वाटचाल करण्यास त्यांनी शिकवले. तसेच सुमारे ४०० वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी हेच कार्य केले. संपूर्ण मराठी जनता मुस्लिम आक्रमकांच्या छळाने त्रस्त झाली होती. गुलामगिरीमध्ये खितपत पडली होती. जीवाची, शेतीची,संपत्तीची, स्त्रियांची असुरक्षितता... अस्थिरता आली होती. अशा अवघड वेळी समर्थ रामदास स्वामींनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, राष्ट्र उभारणीसाठी महंत निर्माण करून अकराशे मठांची स्थापना केली. हे अकराशे मठ म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्मितीस साहाय्य करणारी केंद्रे होती.

 

स्वराज्य निर्माण करण्याच्या अवघड कार्यामध्ये समर्थ रामदास स्वामी शिवाजी महराजांच्या पाठीशी भक्कमपणानं उभे राहिले. संन्यासी असणाऱ्या समर्थांनी राष्ट्राच्या रक्षणासाठी आपल्या शिष्य असलेल्या शिवाजीला शक्ती प्रदान केली. सद्गुरूंची शक्ती, प्रेरणा, आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. शिवरायांच्या कार्याचा सत्यकथन करणारा ग्रंथ समाजासमोर येणं ही काळाची गरज आहे, हे ओळखून दत्तपरंपरेतील संत विष्णुदास महाराजांनी त्यांच्या शिष्याला प्रेरणा दिली. ते शिष्य म्हणजे विजयराव देशमुख होत. आपल्या शिष्याला आठ वर्षे संशोधन करण्याची शक्ती दिली. अनेक बखरी, शिलालेख, ताम्रपटांचा अभ्यास करण्यासाठी ताकद प्रदान केली. ज्या ज्या स्थानी शिवाजी महाराज गेले, ती सगळी स्थाने प्रत्यक्ष जाऊन बघण्याची प्रेरणा दिली. या अवघड कार्यामध्ये अडचणी, अडथळे आले. संकटं, समस्या निर्माण झाल्या. या सगळ्यामधून बाहेर काढून विष्णूदास महाराजांनी आपल्या शिष्याकडून अस्सल असं शिवचरित्र लिहून घेतलं. ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथाच्या दोन खंडांची निर्मिती शिष्याकरवी करवून घेतली. मातोश्री जिजाऊसाहेबांची जयंती या ग्रंथाद्वारे महाराष्ट्राला प्रथम ज्ञात झाली. शक निर्माण करणारे शिवाजीमहाराज त्यांची जयंती म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया, १९ फेब्रुवारी, १६३० याला शासनाने मान्यता दिली. अनेक महत्त्वपूर्ण तिथींचे संशोधन ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथाद्वारे झालेले आहे. संपूर्ण समाजाला सदैव प्रेरणा देणारे असे हे शिवचरित्र आहे. राष्ट्राचं क्षात्रतेज जागे करण्याचे कार्य या ग्रंथाने केले व अजूनही करत आहे. काळाची पावले ओळखून राष्ट्राविषयीची तळमळ, राष्ट्रप्रेम यांची ओजस्वी निर्मिती करणारा हा ग्रंथ आहे. राष्ट्रपुरुषाची गौरवगाथा सच्चेपणानं मांडणारं हे शिवचरित्र असून जाती-जातीच्या राजकारणाला फाटा देणारे आहे. शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, विवेक, वैराग्याचा भगवा झेंडा हिंदवी स्वराज्यावर डौलाने फडकणे, नि:स्पृहता, त्यागाचा मेरुमणी, रयतेच्या हिताचा सदैव विचार करणं, अशा अलौकिक गुणांना या चरित्रामधून लोकांसमोर आणण्याचे कार्य या ग्रंथाने केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी शिष्याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले.

 

शिवरायास आठवावे।

जीवित तृणवत मानावे।

इहलोकी परलोकी रहावे।

कीर्तिरुपे॥

शिवरायांचे आठवावे रुप।

शिवरायांचा आठवावा प्रताप।

शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी॥

 

विष्णुदास महाराजांसारख्या थोर संतांनी त्यांचे शिष्य विजयराव देशमुख यांच्याकडून अलौकिक कार्य करवून घेतलं. रामदास स्वामींनी शिष्य शिवाजीराजे यांच्याकडून स्वराज्य स्थापनेचे कार्य करवून घेतले. तसंच कार्य शिवाजीमहाराजांचं स्फूर्तिदायक, प्रेरणादायक असणारं अस्सल शिवचरित्र ग्रंथलेखन विजयरावांकडून करवून घेतलं. या शक्तिदायक, राष्ट्राला एकसंघ ठेवण्यास साहाय्यक असणाऱ्या शिवचरित्राच्या ‘शककर्ते शिवराय’ या ग्रंथाची चौथी आवृत्ती काढण्याची आज्ञा केली आहे. संतांना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते. संपूर्ण समाजाला, राष्ट्राला एकसंघ ठेवण्यास उपयुक्त असणाऱ्या या मौलिक ग्रंथाची सध्या फार गरज असल्याचे लक्षात आले. म्हणूनच हा ग्रंथ अत्यंत प्रकाशमान अशा प्रकाशनाच्या मार्गावर वाटचाल करतो आहे.

 

संतांचं कार्य हे विशाल, विस्तृत आहे. त्याची व्यापकता सामान्य माणसाच्या आकलनापलीकडील आहे. संत गजानन महाराजांनी लोकमान्य टिळकांना भाकरीचा प्रसाद प्रदान करून ‘गीतारहस्य’ या श्रेष्ठ ग्रंथांच्या लिखाणाची प्रेरणा दिली. या ग्रंथामुळे टिळक अजरामर झाले. पारतंत्र्य, गुलामगिरी याला दूर सारून हिंदू राष्ट्र सर्वार्थाने एकसंघपणाने, ऐक्याने, एकतेने उभे राहण्यासाठी प्रेरणादायी, स्फूर्तिदायी असणाऱ्या ग्रंथांची निर्मिती होणे महत्त्वाचे असते. असे ग्रंथ अमूल्य कार्य करून राष्ट्रतेजाची अलौकिक झळाळी प्राप्त करून देतात. धन्य ते संत आणि धन्य ते सद्गुरू! त्याचप्रमाणे धन्य त्यांचे शिष्य जे आपल्या सद्गुरू व्रतस्थ शिष्याद्वारे व्रतस्थ लेखणी चालवतात. समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज, विष्णुदास महाराज आणि विजयराव देशमुख या गुरु-शिष्यांच्या जोडीला मन:पूर्वक नमस्कार! आपली महाराष्ट्रभूमी मोठी भाग्यवान आहे. ती अशा श्रेष्ठ, अलौकिक कार्याची परंपरा जतन तर करतेच, शिवाय त्या गुणांचा कृतिशील गौरवदेखील करते. या समस्त पुण्यश्लोक युगपुरुषांच्या जीवनगाथेला त्रिवार वंदन करावंसं वाटणं स्वाभाविक आहे.

 

- कौमुदी गोडबोले