स्वीडन व्हाया नगर
महा एमटीबी   12-Feb-2019 
 
 
नीला विखे-पाटील हे मराठमोळं नाव सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतेय. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवन यांची सल्लागार म्हणून अहमदनगरच्या अवघ्या तिशीतल्या या तरुणीची निवड झाली आहे.
 

मराठी माणूस आज जगभरातील सर्वच ठिकाणी पोहोचला असून त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अशात एखाद्या मराठी बांधवाची कर्तृत्वाची कथा आपल्या कानावर पडली की, आपला उर अभिमानाने भरून येतो. अशीच एक मराठी माणसाचे उर भरून टाकणारी घटना घडली आहे. नीला विखे-पाटील हे मराठमोळं नाव सध्या जगभरात चर्चेचाविषय ठरतेय. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवन यांची सल्लागार म्हणून अहमदनगरच्या अवघ्या तिशीतल्या या तरुणीची निवड झाली आहे. नीला विखे-पाटील या अहमदनगर जिल्ह्याचे सहकार महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलराव विखे-पाटील यांची नात व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. अशोकराव विखे यांच्या कन्या आहेत. एवढंच नाही, तर नीला या राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची पुतणी आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी एखाद्या पंतप्रधानांचे सल्लागार होणे ही मोठी बाब असल्याने नीला यांच्यावर जगभरातून कौतुकाचा मोठा वर्षाव होत आहे. म्हणूनच आजच्या ‘माणसं’ या सदरात या मराठमोळ्या तरुणीची अहमदनगर ते स्वीडन वारीची गोष्ट...

 

तुम्हाला पहिलाच प्रश्न पडला असेल की, नीला या मराठी आणि थेट स्वीडनच्या पंतप्रधानाच्या सल्लागार कशा काय? त्या मागील कारण असं आहे. नीला यांचे वडील नगर येथील व आई ईवा या स्वीडिश नागरिक आहेत. १९८१ साली डॉ. अशोकराव विखे हे व्यावसायिक कारणासाठी स्टॉकहोमला गेले होते. यावेळी त्यांची ओळख नीला यांच्या आई ईवा यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर नंतर मैत्रीत आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात व प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. ईवा यांच्याशी लग्न झाल्यानंतर डॉ. अशोकराव विखे यांनी स्वीडनचे नागरिकत्त्व स्वीकारले. डॉ. अशोकराव विखे हे जागतिक कृषी व आरोग्य संघटनेचे अध्यक्ष आहेत. स्विडीश सरकारच्या आरोग्यविषयक समितीचे ते सल्लागारदेखील आहेत. तसेच अशोक विखे-पाटील हे ‘विखे-पाटील फाऊंडेशन’चे अध्यक्ष असून या फाऊंडेशनच्या महाराष्ट्रात तब्बल १०२ शिक्षणसंस्था आहेत.

 

नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला. त्यानंतर त्या एक वर्षाच्या असताना आपल्या आई-वडिलांसोबत अहमदनगर येथील लोणी या गावी आल्या. नीला या अवघ्या आठ वर्षांच्या असताना त्यांचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर त्या आपली आई ईवा यांच्यासमवेत स्वीडनला परत गेल्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण लोणी येथेच झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी स्वीडन, स्पेन व युरोपात घेतले. त्यांनी ‘गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस’मधून अर्थशास्त्र आणि कायद्याच्या पदवीचे शिक्षण घेतले. तसेच त्यांनी स्पेनमधील माद्रीद विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. आर्थिक व्यवस्थापन, लेखा, व्यापार कायदा इत्यादी विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षणदेखील घेतले आहे. त्यांना स्पॅनिश, स्वीडिश, इंग्लिश व काहीप्रमाणात मराठी भाषा अवगत आहेत. विशेष म्हणजे शिक्षणानंतर त्यांनी पुण्यात एक वर्ष कामदेखील केले आहेनीला या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी-ग्रीन पार्टी या पक्षांच्या आघाडीचे नेते लोफवन यांच्यासोबत काम करणार आहेत. त्यांच्यावर वित्तीय बाजार, बांधकाम, अर्थ, अर्थसंकल्प, करप्रणाली इ. जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. तसेच स्वीडनच्या संसदेत त्यांच्या ग्रीन पार्टीकडून त्या फर्स्ट रिझर्व्ह आहेत. म्हणजेच संसदेत त्यांच्या पक्षाचा एखादा खासदार आजारी पडला अथवा निवृत्त झाला, तर त्याची भूमिका त्या निभावू शकतात. नीला यांनी स्टॉकहोम महानगरपालिका निवडणुकीत समिती सदस्य व स्टॉकहोम जिल्हा न्यायालयात ज्युरी म्हणूनदेखील काम पहिले आहे.

 

नीला यांचा इथपर्यंतचा प्रवास जरी सोप्पा दिसत असला तरी, हा प्रवास त्यांच्यासाठी कठीण राहिला. अगदी लहान वयात त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी ग्रीन पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. यानंतर त्यांचा हा प्रवास सुरू झाला तो आजतागायत चालू आहे. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून सुरू झालेला हा प्रवास खऱ्या अर्थाने वयाच्या तिसाव्या वर्षीपासून सुरू झाला असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ त्यांची पहिल्यांदा स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. त्यावेळीदेखील स्टीफन लोफवन हेच स्वीडनचे पंतप्रधान होते. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून काम करण्याची नीला यांची ही दुसरी वेळ असणार आहेनीला यांचे आजोबा व सहकारमहर्षी अशी ओळख असलेले बाळासाहेब विखे-पाटील आणि भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्यांचे आदर्श आहेत. आपल्या आजोबांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव असल्याचे त्या कबूल करतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वीडन दौऱ्यात नीला यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्या स्वीडनमध्ये राहत असल्या तरी त्यांची भारत व आपल्या गावाशी नाळ आजही जोडलेली आहे. म्हणूनच नीला यांचा हा प्रवास महाराष्ट्रातील तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/