बिग बी आणि तापसीच्या ‘या’ रहस्यपटाचा ट्रेलर पाहिलात का?
महा एमटीबी   12-Feb-2019

 

 
 
 
मुंबई : अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू हे दोघे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘बदला’ या सिनेमाच्या निमित्ताने हा योग त्यांच्या चाहत्यांसाठी जुळून आला आहे. यापूर्वी ‘पिंक’ या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले होते. ‘बदला’ हा सिनेमा एक रहस्यपट आहे. सुजॉय घोष यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
 

अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात एका वकिलाची भूमिका साकारली आहे. खूनाच्या गुन्ह्यात अडकलेल्या अभिनेत्री तापसी पन्नूला त्यातून सोडविण्याचा बिग बी प्रयत्न करतात. बिग बी यांनी केलेला हा प्रयत्न यशस्वी होतो का? हे सिनेमा पाहूनच कळेल. दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी यापूर्वी ‘कहानी’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. सस्पेन्स थ्रिलर सिनेमा तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. अभिनेता शाहरुख खानचे होम प्रोडक्सन रेड चिली एंटरटेनमेंटने अजूर एंटरटेनमेंटसोबत मिळून ‘बदला’ या सिनेमाची निर्मिती केली आहे.

 
 
 

‘पिंक’ सिनेमामध्ये बिग बी आणि तापसीने केलेल्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यामुळे आता ‘बदला’ या सिनेमात या दोघांचे काम पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘बदला’ या सिनेमाची कथा लिहिण्यासाठी १० वर्षांचा काळ लागला, अशी माहिती मिळाली आहे. या सिनेमाचे बहुतांश चित्रिकरण परदेशात झाले आहे. येत्या ८ मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/