माथेरानची सफर अनुभवा काचेच्या डब्यातून
महा एमटीबी   11-Feb-2019


मुंबई : विस्टाडोमचे नवे डबे जोडलेली मिनी ट्रेन येत्या २३ फेब्रुवारीपासून पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून लवकरच सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांना खुले आभाळ आणि आजूबाजूची धावणारी झाडे पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष अशी विस्टाडोम बोगी तयार केली आहे.

सध्या अशा प्रकारच्या विस्टाडोम बोगी डेक्कन क्वीन, मांडवी, कोकणकन्या, जनशताब्दी आणि पंचवटी या एक्‍स्प्रेस गाड्यांना जोडण्यात येणार असून पारदर्शक काचा असलेल्या मोठ्या खिडक्‍या हे या कोचचे वैशिष्ट्ये आहे. या वैशिष्ट्यांमुळे प्रवाशांना आजूबाजूचे निसर्गसौंदर्य न्याहाळता येणार असून नेरळ ते माथेरान या मिनी ट्रेनला जोडण्यात येणार आहे.

माथेरानला जाण्यासाठी पर्यंटकांना नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनचा प्रवास हे आकर्षण असते. आता या मिनी ट्रेनला विशेष विस्टाडोम कोच जोडण्यात येणार असल्याने खऱ्या अर्थाने पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. या संदर्भात गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्यासोबत बैठक घेऊन नेरळ-माथेरान विस्टाडोमवर सकारात्मक चर्चा झाल्याची रेल्वे सुत्रांनी माहिती दिली.

 

पर्यटकांची संख्या वाढणार

मुंबईपासून जवळ असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान प्रसिद्ध आहे. त्यामुळे माथेरानला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांमध्ये नेरळ ते माथेरान धावणाऱ्या मिनी ट्रेनबद्दल मोठे कुतूहल आहे.. नेरळ ते माथेरान असे सात किलोमीटर इतके अंतर धावणाऱ्या मिनी ट्रेनमधून पर्यटकांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येते. त्यामुळे या ट्रेनला पर्यटकांची मोठी पसंती मिळते. आता नव्याने दाखल होणाऱ्या विस्टाडोम बोगीमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून, महसूल वाढण्‍यासाठी मदत होईल, अशी रेल्वे अधिकाऱ्यांना आशा आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/