चंद्रबाबूंचे आज दिल्लीत उपोषण
महा एमटीबी   11-Feb-2019


 

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू दिल्लीत उपोषणाला सुरुवात करत आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा तसेच ‘राज्य पुनर्रचना कायदा २०१४’ अंतर्गत केंद्राद्वारे देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करावीत, या मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.

 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी या ठिकाणी भेट दिली. राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. आंध्र जनतेला आश्वासन दिलेल्या मागण्या केंद्राने पूर्ण केले नाहीत, असा आरोप चंद्रबाबू यांनी केला आहे.

 

तेलुगु देसम पक्षाने राज्याचे विभाजन झाल्यानंतर आंध्र प्रदेशवर अन्याय झाल्याचे म्हटले होते. याचा निषेध म्हणून भाजपसोबतच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून टीडीपीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. टीडीपी अध्यक्ष नायडू सोमवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत आंध्र भवनमध्ये उपोषण करतील.

 

चंद्रबाबू १२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक निवेदन देणार आहेत. त्यांच्यासह पक्षातील विधानसभा व विधानपरिषद आमदार, खासदार हेही आंदोलनाला बसणार आहेत. तसेच, राज्य कर्मचारी संघटना, सामाजिक संघटना आणि विद्यार्थी संघटनांचे सदस्यही यात सहभागी होणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/