पुलंनी रसिकांचा रोजचा दिवस गोड केला !
महा एमटीबी   10-Feb-2019वाई : 'शेवटचा दिस गोड व्हावा' असे आपल्याकडे म्हटले जाते. पु. ल. देशपांडे म्हणत की शेवटचा कशाला, रोजचाच का नसावा? यालाच अनुसरून पुलंनी मराठी साहित्य-कला रसिकांचा रोजचा दिवस गोड केला, अशी भावना ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केली.

 

वाई येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय 'त्रिवेणी साहित्य संगमा'त रविवारी 'पु. ल. देशपांडे यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मंगला गोडबोले यांच्यासह चित्रपट समीक्षक गणेश मतकरी, ज्येष्ठ लेखक दिनकर गांगल, ज्येष्ठ नाट्यअभिनेत्री-गायिका फैय्याज शेख आदींनी सहभाग घेतला तसेच सूत्रसंचालन अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. यावेळी पुलंच्या विविध आठवणींना व कार्यकर्तृत्वाला मान्यवरांनी उजाळा दिला. गणेश मतकरी यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भाई' चित्रपटामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, भाई चित्रपटातून आम्ही पुलंचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा प्रयत्न केला. पुलंचे अष्टपैलूत्व, सुनीताबाईंसोबतचा त्यांचा जीवनप्रवास यांना आम्ही केंद्रस्थानी ठेवले. यासाठी भरपूर वाचन करावे लागल्याचे आणि पुलंच्या प्रकाशित-अप्रकाशित साहित्याचा धांडोळा घ्यावा लागल्याचे मतकरी यांनी सांगितले. पुलंचे बरेचसे लिखाण हे सूक्ष्म निरीक्षणातून आले आहे. त्यामुळे भाई चित्रपटात 'व्यक्ती आणि वल्ली'मधील भाग चित्रपटातील प्रसंगात वापरल्याचे मतकरी यांनी सांगितले.

 

मंगला गोडबोले म्हणाल्या की, 'तुझे आहे तुजपाशी'मधून खरे पुल सापडतात. पुलंच्या नावावर बऱ्याच गोष्टी खपवल्या जातात. विनोदी लेखक असल्याची ही किंमत असावी. विशेषतः कालक्रमामध्ये खूप गडबड केली जात असल्याचे सांगत ते होऊ नये यासाठी आम्ही 'अमृतसिद्धी' या ग्रंथाची निर्मिती केली, असे त्या म्हणाल्या. माणूस जसजसा मोठा होत जातो, तसा तो जनसामान्यांपासून दुरावत जातो. मात्र, पुलंच्या बाबतीत असे घडले नाही. ते जनसामान्यांच्या अधिकच जवळ येत गेले, असे मत गोडबोले यांनी नोंदवले. दिनकर गांगल म्हणाले की, व्यापकता आणि खोली एकाच व्यक्तीत दिसत नाही. मात्र, पुलंमध्ये ती दोन्ही दिसून येते. पुलंच्या पत्रव्यवहाराचा मोठा अभ्यास केल्याचे सांगित त्यातून त्यांची अफाट प्रतिभा जाणवल्याचे त्यांनी सांगितले. एखादे पौराणिक, काल्पनिक वाटावी, अशी पुलंची प्रतिमा होती. पुलं यांची खरी शक्ती त्यांच्या कानांत होती, असेही गांगल यांनी नमूद केले.

 

अभिनेत्री फैय्याज म्हणाल्या की, मला पुलं, गदिमा आणि बाबुजी या तिघांचाही सहवास मिळाला, आणि तो माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. पुलंना आपण साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संगीतकार, संवादिनी वादक आदींसाठी ओळखतोच. परंतु, वठवठ या नाटकात त्यांनी बासरीही वाजवली तसेच ढोलकीही वाजवली, अशीही आठवण फैय्याज यांनी सांगितली तसेच आता पुन्हा वठवठचा प्रयोग करायचा झाला तर असा कलाकार पुन्हा मिळेल काय, असा भावूक प्रश्न फैय्याज यांनी विचारताच उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुल, डॉ. वसंतराव देशपांडे आणि बेगम अख्तर या त्रिकोणातील मी एक बिंदू आहे स अशीही भावना फैय्याज यांनी व्यक्त केली.

 

पुल म्हणजे टीव्हीपूर्वीचा टीव्ही !

 

पुलंच्या काळात आजच्या इतकी प्रसारमाध्यमे नव्हती. त्यावेळी पुलंच्या डोळ्यातून आम्ही जग पाहत होतो. त्यामुळे पुल हे टीव्हीपूर्वीचे टीव्ही होते, असे मत मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. पुलंच्या मागे कोणतेही राजकीय आणि धार्मिक पीठ नव्हते तरीही त्यांनी जवळपास अर्धे शतक जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले, त्यामुळे पुल महान ठरतात, असे मत मंगला गोडबोले यांनी यावेळी व्यक्त केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/