आशियाई चित्रपट महोत्सव जळगाव 17 फेब्रुवारी पासून
महा एमटीबी   10-Feb-2019
 

 
 
जळगाव :
समर्पण संस्था, आयोजित १ला आशियाई चित्रपट महोत्सव १७ फेब्रुवारीपासून जळगावात सुरु होत आहे. पर्यटन वा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील चित्रपटांचे स्क्रिनिंग नियोजन भवन सभागृहात करण्यात आले आहे.
 
 
संकल्पना :
एकविसावे शतक आशियाई सिनेमाचे म्हणून ओळखले जाते. अनेक प्रतिथयश आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये ‘आशियाई चित्रपट’ लक्षवेधी ठरले आहेत. अगदी ‘ऑस्कर’ नामांकनामधेही आशियाई चित्रपटांचे वर्चस्व जाणवणारे आहे. मराठी चित्रपटही जगभर आशियाई महोत्सवात झळकू लागले आहेत. युरोप-अमेरिकन सिनेमापेक्षा स्वतंत्र शैली व अगदी वेगळ्या स्वरूपाच्या कथा यामुळे या सिनेमांनी जगभर वेगळा ठसा उमटविला आहे. मराठी चित्रपटही आता जगभर कुतूहल निर्माण करत आहेत.
 
 
भारत, चीन, जपान व इराण हे ‘आशियाई सिनेमाच्या’ क्षेत्रातले बिनीचे शिलेदार. त्याच्या बरोबरीने कोरिया, इस्रायल, तैवान, थायलंड, श्रीलंका, कझाकिस्तान, बांग्लादेश, व्हिएतनाम अशा अनेक आशियाई देशातले सिनेमे युरोपियन सिनेमाला मागे टाकत आपला स्वतंत्र ठसा उमटवत आहेत. असे असले तरी आशियाई राष्ट्रांमध्येच चित्रपट विषयक उदासीनता दिसते. आपल्या चित्रपटांची ओळख चित्रपटरसिकांना व्हावी या हेतूने दिल्ली, मुंबई व पुणे येथे आशियाई चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. प्रथमच फेब्रुवारीमध्ये महोत्सव जळगावकरांच्या चित्रपट रसिकांच्या भेटीला येत आहे.
 
 
महोत्सवाचे वैशिष्टे :
• २५ पेक्षा अधिक चित्रपट या महोत्सवात दाखविले जातील.
• 15 आशियाई देशातील चित्रपटांचा या महोत्सवात समावेश असेल.
• नवीन इराणी चित्रपट हे महोत्सवाचे खास आकर्षण असेल.
• ऑफबीट बॉलिवूड : या विभागात २०१७/१८मधील काही वेगळ्या धाटणीचे दाखविण्यात येतील.
• माय मराठी : या विभागात गतवर्षात गाजलेले व नव्याने प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट दाखविले जातील.
• इंडियन रिजनल सिनेमा : गेल्यावर्षी राष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारतीय प्रादेशिक भाषांतील चित्रपट या दालनात (कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी, ओरिया व मणिपुरी इ.) दाखविण्यात येतील.
• यंदाचे वर्ष बाबूजी, गदिमा व पु.लं.चे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांना आदरांजली म्हणून या त्रयींचा गाजलेला ‘संतपट’ या महोत्सवात दाखविण्यात येनात आहे. अर्काइव्हने नुकताच या चित्रपटाचा पुनउ॑द्धार (डीजीटायझेशन) केले आहे.
 
या महोत्सवात लीफ ऑफ लाइफ (इराण), लेडी ऑफ द लेक (मणिपूर), तासफिया (ताजिकिस्तान), लीना (अफगाणिस्तान), सिन्सियरली युवर्स (ढाका), ख्यानिका – द लॉस्ट आयडिया (ओडिया), टाईड हॅन्ड्स् (इस्त्रायल), गेईओनी – व्हॅली ऑफ स्ट्रेन्थ (इस्त्रायल), तीन मुहूर्त (हिंदी), रानाज् सायलेन्स् (इराण), आक्रीत (मराठी), जोहार मायबाप जोहार (मराठी), मदरिंग (इराण), बेन्स बायोग्राफी (इस्त्रायल), रजनीगंधा (हिंदी), पुष्पक विमान (मराठी), भोर (हिंदी), अंडरपॅन्ट थिफ (श्रीलंका), बंदिशाला (मराठी), तालन (काझीकीस्तान), भयकंम (मल्याळम), द बॅड पोइट्री (जपान), अॅन्ड वन्स अगेन (इंग्रजी), हान्दुक द हिडन कॉर्नर (असमिया), मरमेड (इराण) आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त चित्रपटांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. मोफत प्रवेशिका १२ फेब्रुवारीपासून शारदाश्रम विद्यालय, ७९ / १ व २, कोल्हे नगर (प.), शिव कॉलनीमागे आणि पर्यावरण शाळा, ३९, शाहू कॉम्प्लेक्स् येथे उपलब्ध होतील असे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. अधिक माहिती साठी राहुल सोळुंके (९८५०९३११६५), संदीप झोपे (९४०४०४७०३४), अजय पाटील (८३०८७०६८८२) यांचेशी संपर्क साधावा.