पंतप्रधानांवर टीका करणाऱ्यांचा हिशोब चुकता करा
महा एमटीबी   10-Feb-2019भाजपच्या ठाणे-पालघर शक्तीप्रमुखांची बैठक

 

भिवंडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्यांचा हिशोब चुकता करण्यासाठी शक्तीप्रमुखांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे नेते व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केले. युतीबाबतचा प्रश्न वरिष्ठांवर सोपवून आपण नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण शक्तीने कार्यरत व्हा, असे तावडे म्हणाले. भाजपच्या ठाणे व पालघर विभागातील चार लोकसभा मतदारसंघांतील शक्तीप्रमुखांची अंजूर येथे रविवारी बैठक झाली. या बैठकीत शिक्षण मंत्री विनोद तावडे बोलत होते. या वेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, राजेंद्र गावित, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, महेश चौघुले, नरेंद्र पवार, पास्कल धनारे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, दिगंबर विशे, संघटन मंत्री सतीश धोंड, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, संतोष शेट्टी, संदीप लेले आदी उपस्थित होते. या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील शक्तीप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

लोकसभेच्या निवडणुकीला अवघ्या ७० दिवसांचा कालावधी राहिला आहे. आपल्याला पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना आणण्यासाठी प्रत्येक शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुखाने कार्यरत राहावे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका केली जाते. या टीकेला कार्यकर्त्यांनी चोख उत्तर द्यावे. या नेत्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची मतदारांना आठवण करुन द्यावी, असे आवाहन तावडे यांनी केले. गेल्या साडेचार वर्षांत अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या. त्यातून हजारो नागरिकांना लाभ झाला. याबाबत नागरिकांना माहिती द्यावी, असे तावडे म्हणाले. रावणाने बहीण शुपर्णखा, हिरण्यकश्यपूने होलिका यांना उतरविल्याचा इतिहास आहे. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तर आता राहूल गांधी यांनी प्रियंकाला प्रचारात उतरविले असून, त्यांनाही पराभवालाच सामोरे जावे लागेल, असे भाकीत तावडे यांनी केले. काही वर्षांनी आपल्याला प्रियंकांचा मुलगाही प्रचारात उतरलेला पाहावयास मिळेल, असे ते म्हणाले.

 

राफेल करारासंदर्भात आरोप करणारे राहूल गांधी व कॉंग्रेस देशद्रोही आहेत, अशी जोरदार टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली. पूर्वी हिंदी चित्रपटात व्हीलन म्हणून रॉबर्ट असे. आताच्या रॉबर्टनेही लूट चालविली आहे, अशी उपरोधिक टीका भातखळकर यांनी केली. केंद्र सरकारने आयुष्मान भारत सारखी कल्याणकारी योजना राबविली. या माध्यमातून केवळ भिवंडी लोकसभा मतदारसंघात दोन महिन्यांत पाच हजार लाभार्थींना फायदा झाला. अशा योजना सामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन खासदार कपिल पाटील यांनी केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/