विमानदार पुत्र...!
महा एमटीबी   10-Feb-2019

 
 
 
काही गोष्टी खूप जुन्या असतात आणि काही जुन्या असूनही नव्याच वाटतात. जसे अमिताभ बच्चन, हे जुने आहेत, मात्र सतत नवे वाटतात. काही गोष्टी नव्याच असतात आणि नेहमी जुन्याच वाटत राहतात. त्या कधी तरुण वाटतच नाहीत. आता याचे उदाहरण वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. तरुण असूनही त्यांचे लग्न झालेले नाही... हा झाला त्या उदाहरणाचा क्लू; पण त्यामुळे एकदम उत्तर गाठता येत नाही. सलमान खानपासून अनेक पर्याय डोळ्यासमोर येतात. तेही अगदी अचूक असे नाही. कारण, सलमान पन्नाशीतला तरुण वाटतो आणि आपले अचूक उत्तर असलेली व्यक्ती चाळीशीतला म्हातारी वाटते. सलमानच्या मागे अजूनही ललना फिरतात अन् आपल्या या अचूक उत्तराची त्याच्याशी तुलनाही होत नाही. त्या दोघांचेही लग्न झालेले नाही, इतकेच काय ते साम्य. हे मात्र नक्की की महाभाग नवे असूनही जुनेच वाटतात. सलमान अगदी चिडणी गुळगुळीत दाढी करून राहतो अन् हे दाढी न करता तरुण दिसू शकतात तर मुद्दाम जरड आणि बेडर वाटावे आपण म्हणून दाढी करत नाही. आता वयानुसार त्यांच्या दाढीने काही केस पिकलेले दिसत आहेत. आता दाढी असली की पीएम होता येते, असे कुणीसे त्यांना सांगितले असावे. त्यातही वैवाहिक जीवन नसले की आपण एकदम लोकप्रिय आणि प्रामाणिक वाटू लागतो, असाही काहीसा गैरसमज या विमानदार पुत्राचा झाला असेल.
 
त्यांचे वडील इमानदार होते. म्हणजे राजकारणातला सच्चा चेहरा म्हणून ऐंशीच्या दशकांत यांचे वडील समोर आले होते. सच्चा है, लेकीन कच्चा है, असे वाजपेयी त्यांच्या वडिलांच्या बाबत म्हणाले होते. या आपल्या साठा उत्तराचे वडील वैमानिक होते पूर्वाश्रमीचे. त्यांनी अगदी शास्त्रशुद्ध विमान उडविण्याचे शिक्षण घेतले होते. वैमानिक म्हणून नोकरीही केली होती. आई नंतर राज्य सांभाळायचे म्हणून विमान लँड करून ते जमिनीवर आले अन् देशाचे विमान त्यांनी काही काळ उडविले. बर्यापैकी भरारी घेतली. मात्र विमानाचे ज्ञान असलेले अन् कथित प्रामाणिक असलेले ते त्यांना तोफांनी अडचणीत आणले. आपल्या मराठी भाषेत, काय तोफ माणूस आहे, असे म्हणतात. कुणी चांगला वक्ता असेल तर, काय मुलूखमैदानी तोफ आहे, असेही म्हणतात. हा तोफ माणूस अनेकांना पुरून उरत असतो. तसे या आपल्या बाळ उत्तराचे वडील तोफ होते, असा प्रचार त्यांच्या अनुयायांनी केला होता. ते त्यांच्याच पक्षातल्या काही लोकांना अडचणीचे वाटू लागले. मग ‘मच्छर मारने के लिए तोफ कायकू?’ असे विचारले जाते, मात्र त्यावेळी राजकारणातले हे बिग विमान उडविण्यासाठी त्यांच्याच सख्यासोबत्यांनी तोफेचा वापर केला. तोफा खरेदीचा तोफखानाच त्यांच्यावर लावला. म्हणजे अक्षरश: त्यांना राजकारणात तोफेच्या तोंडीच दिले. तेव्हा हे उत्तर असलेले आपले नायक बाळ खूपच लहान होते.
 
 
 
म्हणजे त्यांचे वडील विमान उडवायचे खरोखर तेव्हा त्यांचा जन्मच व्हायचा होता अन् त्यांच्या वडिलांना तोफेच्या तोंडी दिले तेव्हा हे खेळण्यातले विमान उडवित होते. तेव्हापासून त्यांना विमानाचा शौक लागला. अर्थात खर्या नाही तर खेळण्याच्या. आता त्यांना विमानाची भार्रीच ओढ आहे. हातात खेळण्याचे विमान घेऊन ते आईच्या मागे उडण्याची प्रॅक्टिस करत असतात, मात्र ज्या वयांत अदृश्य पंखांनी तरुण हवेतच तरंगत असतात, त्याही वयांत हे भिजल्या चिमणीसारखे आईच्या पदराआडच राहायचे. नंतर त्यांच्या आईने रीमोट कंट्रोलने राज्य चालविले. त्यावेळीही या बाळराजेंना विमानाचा इतका छंद की कागदाची विमाने तयार करून ते हवेत उडवित. तशी कागदी विमाने आपला प्रेम संदेश लिहून नेमक्या दिशेने फेकण्याचे कसब त्या वयांत असते, मात्र यांनी तेही केले नाही, म्हणून त्यांच्या आईला आपल्या मुलाचे लग्नाचे वय झाले, असे अजीबातच वाटले नाही. मग या मुलाचे खेळण्याचे विमान अन् खेळण्यातल्या विमानाशी खेळणे इतके वाढले की मग त्यांच्या राज्य कारभार करण्यासाठी ठेवलेल्या कारभार्याने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाच्या कागदाची विमाने करून या बाळराजांनी ऐन पत्रपरिषदेत उडविली होती...
 
 
 
कालांतराने त्यांची सत्ता गेली. ती जाणारच. सत्ता काही अक्षय आणि अविनाशी नसतेच. ती जशी येते तशी जातही असते. यांना मात्र वाटत होते की आपल्याकडे सत्ता म्हणजे कायमच्याच मुक्कामाला आली आहे. त्यामुळे ती गेल्यावर यांच्या हातात केवळ कागदी विमानेच राहिली. ही कागदी विमाने म्हणजे खयाली पुलाव सारखी असतात. केवळ कल्पनेतच असतात. कल्पनेत ती उडविता येतात. सत्ता गेल्यावर त्याच्या आईने त्याला पदोपदी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आता ही कागदी विमाने उडविणे बंद कर, कारण आताशा कागदही महाग झाला आहे. तोही आपल्याला परवडत नाही. आधी हे बाळराजे काळ्या पैशांच्या नोटांचीही विमाने करून उडवायचे. ती उडायचीही अन् त्यामुळे त्यांची सत्ता यायची. आता नव्या राज्यकारभार्यांनी नोटाच बदलून टाकल्या. या नव्या नोटांची विमाने करून उडविता येत नाहीत, म्हणून बाळराजे संतापले. आधी कागदांवर हवे ते छापून देत लोक यांना. मग हे त्या छापील कागदांची विमाने करून देशभर उडवित. ते मग लोकांच्या हाती पडत अन् बाळराजेंनी पाठविलेला संदेश खराच आहे, असे वाटून लोक त्यावर विश्वास ठेवत. मग मतांच्या पट्ट्यांवर लोक बाळराजेंचेच नाव लिहित. त्या मतांच्या पट्ट्यांची खूपसारी विमाने कपट्यांसारखी उडवून बाळराजेंनी खूप खूप मज्जा मज्जा केली. नंतर मतांचे कागद किंवा कागदी मतही बंद झाले. यांत्रिक मतदान आले. त्यामुळे विमाने बनवून उडवायला मतांचे कागद कमी पडू लागले म्हणून बाळराजेंना खूप राग आला. त्यांनी पुन्हा कागदी मतांची पद्धत सुरू करा, असे म्हटले. त्यांचे आता कुणी ऐकेना.
 
 
 
 
मग त्यांना आणखी एका विमानाचा मुद्दा सापडला. सापडला म्हणजे त्यांना कुणीतरी सांगितले की नव्या राज्यकर्त्याच्या विरोधात काहीतरी शोधून काढ. तुझ्या वडिलांच्या विरोधात तोफा आणल्या होत्या त्यांच्याच सहकार्यांनी. तुमच्या विरोधांत हेलिकॉफ्टर आणण्यात आले होते, तसे तू यांच्या विरोधांत काहीतरी आण. आता बाळाला विमाने अन् तोफांच्या पलिकडे काही कळत नव्हतं. तेही कागदी विमाने. त्यामुळे त्याला विमानाचाच मुद्दा बरा वाटला. नव्या राज्यकर्त्यांनी विमाने खरेदी केली, अशी वार्ता त्याला कळली. आता देशासाठी ती खरेदी करावीच लागतात ना! मात्र याचा अनुभव आणि संस्कार हाच की देशासाठी काहीही खरेदी केले की त्यात कमी शेण खायचे असते. त्यामुळे त्याला वाटले की या विमान खरेदीतही शेण खाल्लेच असेल. देशात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती आणि सगळीच घाण साफ केली आहे. (अगदी मनोवृत्तीचीही) हेही त्याला कळले नाही. त्यामुळे त्याने विमानांत पैसे खाल्ल्याचा कांगावा सुरू केला. त्याचे कुणी ऐकना. त्याला वाटले की आपल्या आजोबांपासून खरेदीत पैसे खाण्याचा प्रघात आहेच अन् मग त्यावर कल्ला करण्याचीही पद्धत आहे. त्यावरून लोक मग सत्ताबदलही करतात. मग आताच का बरे लोक विमान खरेदीत पैसे खाल्ल्याचे ऐकत नाहीत? आपण इतके वडिलोपार्जित विमानदार आहोत, आपण सांगतो आहोत की पैसे खाल्ले तर लोकांनी विश्वास ठेवायला हवा ना... त्या विमानदार पुत्राचे कुणी ऐकतच नाही. आता त्याने काय करावे? ...तर मंडळी नवा असूनही जुनाच वाटतो असा तो कोण, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता यावे यासाठी इतका मोठा क्लू दिला आहे. आतातरी नेमके उत्तर द्या. नाहीतर तुमच्या डोक्याची शंभर शकले होतील (विरोधकांची झाली आहेत तशीच) आणि तुमच्याच पायाशी लोळू लागतील.