गूढ उकलणारा साधनामार्ग
महा एमटीबी   01-Feb-2019दृश्य सृष्टीपेक्षा अदृश्य सृष्टी जास्त शक्तिशाली आहे. ही शक्ती अफाट, अचाट, अनाकलनीय आहे. ती डोळ्यांनी दिसत नाही. साधनेने, तपाने जाणवते. तीच शक्ती अंर्तबाह्य खेळत असते व खेळवतदेखील असते. या सकल गोष्टींचा सातत्यानं अभ्यास करणाऱ्या साधकांवर अदृश्य सृष्टीतील शक्ती प्रसन्न होते. मग अशा साधकाला शक्तीच्या प्रचितीने संतुष्टता व समाधानाची प्राप्ती होते.


आकाशाचा निळा रंग अधिकच निळा झाला. सूर्यनारायणाने रथामधून डौलदारपणे प्रवेश केला. अवनीवर पक्षी किलबिलाट करू लागले. पवन मुग्ध कलिकांवर हळूवार फुंकर घालू लागला. सूर्यनारायणाच्या दर्शनाची अनावर ओढ लागली आणि कळीचं बघता बघता फुलात रूपांतर झालं. अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे जाण्याचा निसर्ग नियम आहे. पूर्णपणे संपूर्ण अवनी दिनकराच्या आगमनाने पुलकीत झाली. किरणांचा कोवळेपणा हा हवाहवासा वाटणारा! उबदारपणाची शाल पांघरलेली वसुंधरा सूर्यनारायणाला मनोभावे वंदन करू लागली. पंचमहाभूतांचा पसारा म्हणजेच हा संपूर्ण निसर्ग! सकल सृष्टी पंचमहाभूतांनी भरलेली. सगळा निसर्ग हे एक न उलगडणारे कोडे आहे. सृष्टीची उत्पत्ती त्यानंतरची स्थिती आणि अंतिम लय हे एक सुस्पष्ट सत्य आहे. निसर्गाचं सूक्ष्म निरीक्षण केलं की, परमात्मा परमेश्वराची अगाध करणी बघून मन थक्क होतं. पंचमहाभूतांचा सकल जीवयोनींचा देह, त्यांची वाढ आणि त्याचा शेवट हे अभ्यासण्याजोगं आहे. चल आणि अचल सृष्टीमध्ये परमात्मा परमेश्वर भरून उरलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी अचल अशा भिंतीला चल केलं, तिला चालवलं! म्हणजेच जड, अचलमध्येदेखील चैतन्य भरून राहिलेलं आहे, हे सिद्ध केलं. समाज त्याला ‘चमत्कार’ म्हणतो. असामान्य गोष्ट घडवून आणण्याला चमत्कारामध्ये गणलं जातं. मग नमस्कार आपोआप केला जातो. ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे संत गजानन महाराजांनी ठणठणीत कोरड्या विहिरीमध्ये जलाची निर्मिती केली. गजानन महाराजांचा शिष्य पितांबर याने वाळलेल्या, वठलेल्या आंब्याच्या झाडाला पालवी आणली. त्याचप्रमाणे श्रीनृसिंह सरस्वती स्वामींनी एका ब्राह्मणाला वाळलेल्या झाडास पाणी घालायला सांगितले. त्याने नियमित जलसिंचन केल्यावर त्याला संजीवनी प्राप्त झाली. संतांना सकल सृष्टीमधील चैतन्याचं ज्ञान होतं. त्यांच्या साधनेमधून त्यांना शक्ती प्राप्त झाली.

 

गूढ, गहन चैतन्याचं ज्ञान झाल्यावर ‘अशक्य’ हा शब्द त्यांच्या जीवनकोशात उरत नाही. चैतन्याला जाणून घेऊन त्याचं व्यापक, विशाल अस्तित्व जाणवणं हीच साधना होय. चैतन्यामध्येच अफाट ऊर्जाशक्ती आहे. मन विश्वमनाशी एकरूप करणं, ही साधना. मग अशा व्यापक मनाचं विश्वमनात विरघळून जाणं हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. संकुचित मन मग उरतच नाही. ते ‘अ-मन’ होऊन जातं. अग्नितत्त्वाचं पूजन करून त्यातील ऊर्जा जाणून घेणं. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले. ही एक योगसाधना आहे. गजानन महाराजांनी अग्निशिवाय चिलीम पेटवली. साईबाबांनी दिवे प्रज्वलित केले. अग्नितत्त्व ताब्यात ठेवणारे महान संत! पंचमहाभूतांवर आपली सत्ता स्थापन करून त्यांच्यावर ताबा मिळवणारे संत आजच्या काळातही आहेत. पाऊस न पडता कोरडा दुष्काळ येण्याची चिन्ह दिसल्यावर भृगू ऋषींची मातीची प्रतिमा ठेवून जलाभिषेक करून पावसाला पृथ्वीवर येण्यास भाग पाडणारे प. पू. विष्णुदास महाराज! अतिवृष्टी थोपवू शकणारे संत. पावसाळा काही वेळाकरिता रोखून ठेवणारे संत. असे अनेक संत, महंत चैतन्याला जाणून, त्यामधील ऊर्जेच्या अफाट स्रोताची अनुभूती घेत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाच तत्त्वं आहेत. ती महाभूतं आहेत. ही भूतं समतोल साधतात. ध्यान, नाम, जप, पारायणं अशा अनेक साधनांचा अवलंब करून साधना साधली की, या पाचांचे रहस्य उकलते. पाच वायू, पाच प्राण, पाच देह आणि पंचमहाभूतांची पंचारती करणारे साधक! संत आणि भक्त, गुरू आणि शिष्य आपलं अवघं आयुष्य अशा गूढ, गहन, अनाकलनीय, अगम्य गोष्टी समजून घेण्यात व्यतीत करतात. त्यांची चिकाटी, निग्रह थक्क करणारा!

 

परमात्मा, चैतन्य, परब्रह्म यांचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी भक्ती, ज्ञान व कर्म असे तीन मार्ग आहेत. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी या श्रेष्ठ ग्रंथांमध्ये ते प्रत्यक्ष भगवंताने विस्तारपूर्वक सांगितले आहे. या मार्गाद्वारे जाणारा साधक परब्रह्माला जाणू शकतो. प्रत्येक मार्गामध्ये अडथळे असतातच. अडथळे पार करण्यासाठी दृढ निर्धार हवा. निश्चय, निग्रह, निर्धार या तीन ‘नि’च्या बळावर सामान्य जीवाचा साधक होतो. हळूहळू साधकाचा संत होतो. हे संत सदैव सावध तसेच संयमी असतात. अकारण प्रेम करणं, हा त्यांचा स्वभाव होतो. दृश्य सृष्टीपेक्षा अदृश्य सृष्टी जास्त शक्तिशाली आहे. ही शक्ती अफाट, अचाट, अनाकलनीय आहे. ती डोळ्यांनी दिसत नाही. साधनेने, तपाने जाणवते. तीच शक्ती अंर्तबाह्य खेळत असतेव खेळवतदेखील असते. या सकल गोष्टींचा सातत्यानं अभ्यास करणाऱ्या साधकांवर अदृश्य सृष्टीतील शक्ती प्रसन्न होते. मग अशा साधकाला शक्तीच्या प्रचितीने संतुष्टता व समाधानाची प्राप्ती होते. त्याला साधनामार्गावर चालताना प्रकाशाने उजळून गेलेलं अवघं दृश्य आणि अदृश्य जगत, ती अफाट शक्ती दिसते. त्या साधकाभोवती साधनेचं, प्रकाशाचं तेजोवलय तयार होतं, ज्याचे चित्त शुद्ध झाले असेल, त्याला ते तेजोवलय दिसते. हा सगळा सुंदर साधनामार्ग आहे. दैवी गुणांचा अंगीकार करून विवेक, वैराग्याचे अलंकार घालून सदैव चालत राहणे महत्त्वाचे आहे. अनेक सिद्धी प्राप्त होऊन प्रसिद्धीच्या मोहाचे क्षण बाजूला सारणं हे यासाठी अत्यावश्यक आहे. हे जो साधतो त्याला सर्वच साध्य होतं. मनुष्यजन्माचं परमात्यानं दिलेल्या संधीचं सोनं करणारा श्रेष्ठ ठरतो, अशा साधक संतांचं जीवन सुवर्णाप्रमाणे लखलखीत होऊन जातं. आयुष्य लखलखीत करायचं की, मलिनतेने झाकोळून टाकायचं ते आपल्याच हातात आहे.

 

- कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/