नवविधा भक्ती
महा एमटीबी   01-Feb-2019प्रल्हादाला अनेक संकटात टाकले, त्याच्या जीवावर उठला. पण, प्रल्हाद डगमगला नाही. नारायणाचे नामस्मरण त्याने थांबवले नाही. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला शाळेत पाठवून त्याच्या शिक्षकाला त्याला नास्तिकतेचे धडे देण्यास सांगितले.


दासबोध ग्रंथात समर्थांनी लिहिलेल्या पहिल्या दशकातील पहिला समास हा प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. दासबोधात कोणते विषय मांडायचे आहेत, त्यासाठी कोणते अध्यात्म निरूपण करायचे आहे, याची थोडक्यात माहिती समर्थांनी या प्रास्ताविक समासात दिली आहे. त्यानंतर स्वामींनी या ग्रंथाची फलश्रुतीही सांगितली आहे. दासबोध ग्रंथाच्या श्रवणाने देहबुद्धीचे धोके टाळता येतात. अध्यात्मविषयक जे संशय असतील, त्यांचे निराकरण होते. थोडक्यात, या ग्रंथाच्या श्रवणाने मानवाची अधोगतीपासून सुटका होते आणि मनाला विश्रांती मिळून ते समाधानी होते. परंतु, हा लाभ सर्वांना होईल असे नाही. कारण, या ठिकाणी विश्वास, भाव महत्त्वाचा असतो. स्वामींचे या संदर्भात मत असे आहे की,

 

जयाचा भावार्थ जैसा ।

तयास लाभ तैसा ॥

 

शिवथर घळीत काही वर्षे राहण्याचा विचार करून समर्थ आपल्या निवडक शिष्यांसह घळीत मुक्कामाला आले. तेथे त्यांना दासबोधाचे लेखन करायचे होते. त्या ठिकाणी राहून समर्थांनी दासबोध ग्रंथाचे पहिले सात दशक सलग लिहिले असावेत, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. कारण, सातव्या दशकाच्या दहाव्या समासात ग्रंथ समाप्तीची ओवी येते. ‘सरली शब्दांची खटपट ।आला ग्रंथाचा शेवट॥’ ही ती ओवी आहे. परंतु, समर्थ सातव्या दशकाच्या शेवटी थांबले नाहीत हे आमचे भाग्य. हा ग्रंथ स्वामींनी २० दशकं, २०० समासांपर्यंत अनेक विषयांना स्पर्श करीत वाढवत नेला. त्यात त्यांनी अनेक विषयांचा ऊहापोह केला आहे. त्यांचा उल्लेख समर्थांनी प्रास्ताविकाच्या समासात केला आहे. त्यावरून असे अनुमान काढता येते की, वर सांगितलेला प्रास्ताविक समास, पूर्ण ग्रंथ लिहून झाल्यावर लिहिला असावा आणि नंतर तो सुरुवातीस जोडला असावा. अशा रीतीने स्वामींनी शिष्यांसाठी अनेक विषयांचा, अध्यात्म निरुपणाचा ऊहापोह दासबोध ग्रंथात केला असला तरी, त्यांनी भक्तिमार्गाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. रामदासस्वामींनी निवेदन केलेली भक्ती ही भोळीभाबडी भक्ती नसून ती ज्ञानीभक्ती आहे. तेच सर्व ग्रंथातील विवेचनात दिसून येते. भगवंताच्या भक्तीला स्वामींनी किती महत्त्व दिले आहे. पाहा-

 

ग्रंथा नाम दासबोध ।

गुरूशिष्यांचा संवाद ।येथ बोलिला विशद ।

भक्तिमार्ग ॥ (१.१.२)

भक्तिचेन योगे देव ।

निश्चय पावती मानव ।ऐसा आहे अभिप्राव ।

इये ग्रंथीं ॥ (१.१.४)

 

दासबोध ग्रंथात काय सांगितले आहे हे विशद करताना भक्ती व ज्ञान यांना एकत्र जोडले आहे.

 

‘नवविधा भक्ति आणि ज्ञान ।

बोलिले वैराग्याचे लक्षण ॥

 

यानंतर पुन्हा अकराव्या दशकातमुख्य हरिकथा निरुपण । दुसरे ते राजकारण ॥असे सांगत हरिभक्तीला महत्त्वाचे स्थान दिले आहे. मनाच्या श्लोकातही स्वामींनी असेच मत व्यक्त केले आहे.

 

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ (२)

 

परमार्थ मार्गात प्रगती होण्यासाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, योगमार्ग व भक्तिमार्ग असे अनेक मार्ग सांगितले आहेत. स्वामींनी या सर्व मार्गांचा अभ्यास केला होता. साधना केली होती आणि त्यांचा अनुभव घेतला होता. आत्मप्रचिती आल्यावर स्वामींनी आपल्या अनुभवांतून भक्तिमार्गाचे विवरण केले आहे. सर्व शिष्यांना भक्तिमार्ग अवलंबण्यास सोपा आहे, असे त्यांचे मत आहे. तथापि आजकाल विज्ञाननिष्ठा व बुद्धिप्रामाण्य यांचा फार बोलबाला झाला असल्याने भक्तिमार्ग बुद्धीच्या कसोटीवर टिकत नाही असे अनेकदा वाटते. जे भक्तिमार्गाबद्दल टीका करतात त्यांनी हे लक्षात घ्यावे की, भक्तिमार्ग हा काही बोलण्याचा किंवा शब्दच्छल करण्याचा अथवा तर्काचा विषय नसून तो अनुभूती घेण्याचा विषय आहे. तो एक निखळ समाधान प्राप्तीचा मार्ग आहे. अध्यात्मशास्त्रात देहबुद्धी व आत्मबुद्धी या संकल्पनांची चर्चा येते. आपण सारे देहबुद्धीत अडकलेले असतो. देहबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा आपण सहसा प्रयत्न करीत नाही. आमचे सुख-दु:ख हे सारे देहाशी निगडीत असते, देहावर अवलंबून असते. थोडक्यात, देहबुद्धी सोडल्याशिवाय आम्ही खर्‍या अर्थाने समाधानी होऊ शकत नाही. स्वामींनी मनाच्या श्लोकातही ‘देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी ।’ (१७०) असे सांगून ‘देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी ।’ (१६३) असा समाधानाचा मार्ग सांगितला आहे. येथून खरा भक्तिमार्ग सुरू होतो. परंतु, त्यासाठी सातत्य, चिकाटी आणि दृढविश्वास यांची आवश्यकता असते. हा अभ्यास सातत्याने अनेक वर्षे करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांनी भगवंताच्या भक्तीचा अनुभव घेऊन पाहावा. आपण म्हणतो, ते बुद्धिप्रामाण्य व्यवहारात अत्यंत आवश्यक आहे. बुद्धी ही मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परंतु, बुद्धी, भावना या पलीकडील अनुभव घेण्यासाठी बुद्धीच्या कक्षा ओलांडून पलीकडे जावे लागते. बुद्धीचा प्रांत ओलांडल्यावर देहबुद्धी कमी होते, गर्व नाहीसा होतो आणि भक्तीच्या प्रांतात प्रवेश होतो. दासबोधाचे अभ्यासक प्रा. के. वि. बेलसरे यांनी भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. ‘मी या देहाचा, जिवलगांचा, पैशाचा, प्रपंचाचा म्हणजे या जगाचा नसून मी भगवंताचा आहे. अशी खरी जाणीव होणे याचे नाव भक्ती. भगवंताच्या भावामधून उत्पन्न झालेले प्रेम हे आनंदमय असते आणि हे भक्तीचे खरे स्वरूप आहे,’ असे प्रा. बेलसरे यांनी म्हटले आहे.

 

दासबोधातील दशक ४ हे ‘नवविधा भक्तिनाम’ दशक आहे. या दशकाच्या सुरुवातीस समर्थांनी विद्यावैभव संपन्न श्रीगणेश, वेदजननी शारदा आणि ज्ञानविचार देणारा सद्गुरू यांचे स्मरण केले आहे. तेव्हा श्रोत्याने विचारले की, “भगवदभजन कसे करावे ते सांगा. तेव्हा स्वामींनी नवविधाभजन सुलभ करून सांगायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, या भक्ती प्रकारांनी माणूस पवित्र होतो, असे सत्शास्त्रात सांगितले आहे. त्यानंतर स्वामींनी एक संस्कृत श्लोक उद्धृत केला आहे -

 

श्रवणं कीर्तनं विष्णोस्मरणं पादसेवनम् ।

अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥

 

हा श्लोक भागवतातील स्कंध ७, अध्याय ५ मध्ये प्रल्हादाच्या तोंडून निघाला आहे. या श्लोकाची मजेशीर हकिगत ल. रा. पांगारकरांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या ग्रंथात वाचायला मिळाली. भक्त प्रल्हाद हा हिरण्यकशिपू या दैत्याच्या घरात जन्माला आला. हिरण्यकशिपू आणि त्याचा मुलगा प्रल्हाद म्हणजे विचारांच्या बाबतीत दोन टोके होती. प्रल्हादाला नारायणाविषयी नैसर्गिक प्रेम होते, तर हिरण्यकशिपू हा नास्तिक म्हणजे पाखंडी होता. तो देव मानत नसे. देव न मानणारा पाखंडी कसा असतो याचे वर्णन संत तुकाराम महाराजांनी एका अभंगात केले आहे -

 

देह तोचि देव, भोजन ते भक्ती ।

मरण ते मुक्ती । पाखंड्याची ॥

 

प्रल्हाद हा उपजत भक्त असून त्याच्या मुखात सतत नारायणाचे नाव असे. ते बापाला सहन होत नसे. त्यापासून प्रल्हादाला परावृत्त करण्यासाठी हिरण्यकशिपूने अनेक प्रयत्न केले. प्रल्हादाला अनेक संकटात टाकले, त्याच्या जीवावर उठला. पण, प्रल्हाद डगमगला नाही. नारायणाचे नामस्मरण त्याने थांबवले नाही. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला शाळेत पाठवून त्याच्या शिक्षकाला त्याला नास्तिकतेचे धडे देण्यास सांगितले. एक दिवस बाप स्वत: शाळेत गेला आणि प्रल्हादाला म्हणाला, “बाळ प्रल्हादा, तू जे काही शिकलास त्यापैकी एखादा चांगला पाठ म्हणून दाखवं बरं.” प्रल्हाद उद्गारला,

 

‘श्रवणं कीर्तनम् विष्णोस्मरणं.....’

 

(भागवत स्कंध ७, अध्याय ५, श्लोक क्र. २३) अशा रीतीने श्रवण, कीर्तन, विष्णूस्मरण, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन हे भक्तीचे नऊ प्रकार प्रल्हादाने जगाला दिले. समर्थांनी दासबोधात (दशक ४) ही भक्तिप्रकाराची संस्कृत नावे तशीच ठेवली आहेत. परंतु, ‘विष्णोस्मरण’ या भक्तिप्रकाराला विवेचनाच्या ओघात ‘नामस्मरण’ असे यथार्थ नाव दिले आहे. समर्थांच्या निवेदनाचा परिसस्पर्श झाल्याने नवविधा भक्तीचे विशेष विवेचन दासबोधात वाचायला मिळते.

 

- सुरेश जाखडी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/