'तुमचं आमचं'ची 'लाली' महाराष्ट्र रंगवतेय!
महा एमटीबी   09-Jan-2019


 


अहमदनगर : ग्रामीण भागातील विद्यार्थी दशेतील नाट्यरसिक कलाकारांनी एकत्र येऊन सुरु केलेल्या तुमचं आमचं' या संस्थेची 'लाली' ही एकांकिका सध्या महाराष्ट्रभर धुमाकूळ घालते आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या स्पर्धा या एकांकिकेने गाजविल्या आहेत. अशातच दौंड येथे नुकत्याच पार पडलेल्या अभिरंग महाएकांकिका स्पर्धेत या एकांकीने सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान मिळविला. रोख रक्कम ५१ हजार रुपये व मानचिन्ह असे या स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप होते. यासोबतच 'लाली'च्या कलाकारांनी वैयक्तिक पाच बक्षिसे आपल्या नावावर कोरली. लालीने यापूर्वीही विविध नामांकित एककांकिका स्पर्धेमधून ७ राज्यस्तरीय व ३५ वैयक्तिक पुरस्कार पटकावले आहेत. 'तुमचं आमचं' संस्थेच्या हरहुन्नरी कलाकारांच्या कष्टाचे हे मोठे यश मानले जात आहे.

 

दौंड येथील रचना संस्थेने स्वातंत्र्यसैनिक किसनदास कटारिया यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या या एकांकिका स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामांकित एकांकिकेचे प्रयोग सादर झाले होते. मात्र, यामध्ये 'लाली'ने सर्व एकांकिकेला मागे टाकत स्पर्धेवर आपले नाव कोरले. यासोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिरंग अभिनेता प्रथम, सवोत्कृष्ट संगीत, स्त्री अभिनेत्री उत्तेजनार्थ व अभिरंग उपविजेता प्रकाशयोजना या वैयक्तिक पुरस्कारांवर आपल्या नावावर केले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व लेखक प्रवीण तरडे यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी 'लाली'चा दिग्दर्शक कृष्णा वाळके व टीमचे कौतुक केले.

 

वैयक्तिक बक्षिसे

 

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - कृष्णा वाळके

सर्वोत्कृष्ट अभिरंग अभिनेता प्रथम - संकेत जगदाळे

सर्वोत्कृष्ट संगीत - शुभम घोडके

अभिरंग उपविजेता प्रकाशयोजना - अभिषेक रकटे

स्त्री अभिनेत्री उत्तेजनार्थ - रेणुका ठोकळे

 
 
'लाली' ही आजच्या समाजाला आरसा दाखवून देणारं नाटक आहे. हरवलेली माणुसकी ही किती हरवत चाललीय ह्याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. ही खरी काळाची गरज आहे असं मला वाटत. 'लाली'च्या टीममुळे मी हे करू शकलो. लेखक-दिग्दर्शक म्हणून 'लाली' उभा करताना अनेक अडचणी आल्या पण संकेत जगदाळे ने साकारलेली किसण्या ही प्रमुख भूमिका, रेणुका ठोकळेने संभाळलेली आवली, ऋषभ कोंडावरने वठवलेला अण्णा, योगीराज मोटे ने केलेला नाम्या आणि रितेश डेंगळे ने केलेले काम हे त्या नाटकाला खूप उंचीवर नेवून ठेवतो. विराज अवचितेने सांभाळलेली निर्मिती, अभि रकटेची प्रकाश योजना,शुभम घोडकेचे संगीत, ऋषी हराल आणि बाकी सर्व टीमचे नेपथ्य आणि संदीप दंडवते यांचे मार्गदर्शन हेच खऱ्या यशाचे गणित आहे. 'नाट्यमल्हार' या हौशी संस्थेने तुमचं-आमचं हा वेगळा निर्णय घेऊन संस्था चालू केली. 'तुमचं आमचं'च्या माध्यमातून या रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं होणार आहेत.
 

- कृष्णा वाळके

लेखक-दिग्दर्शक

लाली
 

 

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/