आयपीएल भारतातच ; निवडणुकींमुळे 'हे' बदल होणार
महा एमटीबी   09-Jan-2019मुंबई : जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेली भारताची 'इंडियन प्रीमियर लीग' (आयपीएल) भारतामध्येच होणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. २०१९च्या निवडणुकांमुळे आयपीएलचे सामने नेहमीप्रमाणे भारताबाहेर खेळवण्यात येतील का? या प्रश्नावर बीसीसीआयने पडदा टाकला आहे. २३ मार्चपासून आयपीएलच्या १२ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

 

भारतामध्ये लोकसभा २०१९च्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये होणार आहेत. याच दरम्यान आयपीएललाही सुरुवात होणार आहे. यापूर्वी २००९ आणि २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएल भारताबाहेर खेळवण्यात आली होती. पण, यावेळी मात्र स्पर्धेच्या स्वरूपामध्ये थोडेफार बदल करून सामने भारतातच खेळणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

 

काय आहे बदल?

 

स्पर्धेच्या स्वरूपानुसार, प्रत्येक संघ एक सामना हा घरच्या मैदानामध्ये तर दुसरा सामना हा प्रतिस्पर्धिच्या मैदानात खेळवण्यात येतो. मात्र, यावेळी या स्वरूपात बदल करण्यात आले असून सामने न्यूट्रल (तटस्थ) ठिकाणी खेळवले जाऊ शकतात. लोकसभा निवडणूक होत असल्यामुळे जुन्या स्वरूपानुसार सामने खेळवले तर सरकारला मुबलक सुरक्षा देणे अशक्य होऊ शकते, त्यामुळे काही सामने या न्यूट्रल ठिकाणी खेळवल्या जातील. बीसीसीआयने सगळ्या संघांना त्यांच्या घरच्या मैदानात ३ सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. उरलेले सामने या न्यूट्रल ठिकाणी खेळवले जातील, अशी माहिती मिळत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक घोषित करण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/