सचिन कुंडलकर पुन्हा वादात
महा एमटीबी   09-Jan-2019

 

 
 
 
 
मुंबई : सतत काहीना काही कारणाने चर्चेत राहण्यासाठी टीकात्मक फेसबुक पोस्ट करणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मुद्दा ऐरणीवर असताना सचिन कुंडलकर यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती.
 
मराठी साहित्य संमेलनावर टीका करत “यवतमाळ कुठे आहे हेच मला माहित नाही” अशी फेसबुक पोस्ट त्यांनी लिहिली होती. परंतु महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शकालाच महाराष्ट्रात यवतमाळ नेमके कुठे आहे, हे माहित नसणे ही अत्यंत लांच्छनास्पद बाब आहे. असे म्हणत अनेकांनी फेसबुकवरून सचिन कुंडलकर यांना तिखट शब्द ऐकवत चांगलेच झोडपले.
 
साध्या इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांलाही महाराष्ट्राच्या नकाशात यवतमाळ कुठे आहे, हे दाखवता येईल. असे म्हणत अनेक फेसबुक यूजर्सनी कुंडलकरांच्या टीकेचा निषेध केला. तसेच यावरून दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा भूगोल किती कच्चा आहे, आम्ही इयत्ता चौथी पास आहोत, पण कुंडलकरांचे काय? अशा अनेक प्रतिक्रिया फेसबुक यूजर्सनी दिल्या. परिणामी दिग्दर्शक सचिन कुंडलकरांनी आपली फेसबुक पोस्ट डिलीट केली. असे जरी असले तरी त्यांच्या या फेसबुक पोस्टचे स्क्रीनशॉट्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.
 
 

 
 

दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे आपल्या वादग्रस्त फेसबुक पोस्ट्ससाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वी देखील मराठी सिनेसृष्टील दिग्गज दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या मराठी कलाकारांवर फेसबुक पोस्टद्वारे सचिन यांनी टीका केली होती. विजय चव्हाण जिवंत असताना त्यांची कोणी चौकशी केली होती का? असे म्हणत त्यांनी मराठी कलाकारांवर निशाणा साधला होता. परंतु अभिनेता जितेंद्र जोशी याने कुंडलकरांच्या या टीकेला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या या पोस्टविषयी नाराजी व्यक्त केली होती.

 
आता मात्र यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनावरून कुंडलकरांनी नवा वाद निर्माण केला आहे. कुंडलकरांनी यवतमाळचा उल्लेख आपल्या फेसबुक पोस्टमध्ये Unknown जागा असा केला. तसेच पुणे आणि मुंबईला यवतमाळपेक्षा चांगले निसर्गरम्य ठिकाण म्हणून त्यांनी संबोधले. यवतमाळला कमी लेखल्यामुळे कुंडलकरांवर सर्व स्तरांतून सध्या टीकेचे झोड उठत आहेत. दरम्यान, सचिन कुंडलकर यांनी आपली ही वादग्रस्त फेसबुक पोस्ट डिलीट करून या वादातून काढता पाय घेतला असल्याचे दिसून येते.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/