'त्या' वक्तव्यासाठी हार्दिक पांड्याला नोटीस
महा एमटीबी   09-Jan-2019


 


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल यांना बीसीसीआयने वादग्रस्त व्यक्तव्याबद्दल नोटीस बजावली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांनी प्रसिद्ध टीव्ही कार्यक्रम 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये दोघांना त्यांच्या आवडी-निवडी आणि खासगी आयुष्यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये मनमोकळ्यापणाने गप्पा मारताना हार्दिक पंड्याने महिलांबद्दल धक्कादायक वक्तव्य केले होते.

 

करण जोहरने खासगी आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना हार्दिक म्हणाला होता की, "मी माझ्या कुटुंबासोबत मोकळेपणाने सेक्सबद्दल चर्चा करतो. एकदा आईसोबत पार्टीला गेलो होतो. त्यावेळी आईने मला कोणत्या मुलीसोबत संबंध ठेवले असे विचारले असता, मी अनेक मुलींकडे बोट दाखवले. त्याबरोबर मी जेव्हा माझे कौमार्य गमावले होते, तेंव्हा अगदी बिनधास्तपणे मी घरच्यांना सांगितले होते." या विधानावर नेटकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पांड्याने ट्विटरवरून सर्वांची माफीही मागितली.

 
 
 

महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाची बीसीसीआयने गंभीर दखल घेतली असून या दोघांना नोटीस पाठवली आहे. येत्या २४ तासांत स्पष्टीकरण द्या, असे या बीसीसीआयच्या नोटीसीमध्ये सांगितले आहे. १२ जानेवारीपासून सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. याआधी बीसीसीआय हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर कोणती कारवाई करणार याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/